सध्या बॉलिवूडची स्थिती खरोखरच चिंताजनक आहे. अलीकडच्या काळात अनेक मोठ्या चित्रपटांनी रसिकांना निराश केले आहे. सातत्याने होणार्या चित्रपटांच्या अपयशाने बॉलिवूडची पायाभूत रचना डळमळीत झाली आहे. यामागे अनेक कारणे सांगितली जात असली, तरी चित्रपट क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे की, याचे मुख्य कारण म्हणजे खुद्द चित्रपट तारेच आहेत. तेच प्रत्येक चित्रपटाचे भविष्य घडवू शकतात, पण ते तसे करत नाहीत.
मोठ्या नायकांची मनमानी ही बर्याच चित्रपटांच्या अपयशाचे प्रमुख कारण मानले जात आहे. हे नायक दिग्दर्शन, संगीत आदी क्षेत्रांत आपल्या लोकांना घेऊन येतात. त्यामुळे खर्या अर्थाने प्रतिभाशाली लोकांना संधी मिळत नाही आणि चित्रपटाची सर्जनशील बाजू कमकुवत होते. याशिवाय, कलाकारांची प्रचंड फी आणि मल्टिप्लेसमधील महागडी तिकिटे हे ही कारणीभूत ठरतात.
नव्या पिढीतील हिरोंपैकी आमिर खानला विश्वासार्ह कलाकार मानले जाते. अलीकडच्या काही चित्रपटांच्या अपयशातून त्याने धडा घेतला आहे. ‘सितारे जमीन पर’ या त्याच्या एका चित्रपटाने समाधानकारक प्रतिसाद दिला. या चित्रपटात केवळ आमिरशिवाय सर्व कलाकार नवीन होते. आमिरने निर्माता म्हणून या चित्रपटाचा बजेट फक्त वीस कोटी ठेवले, पण या चित्रपटाने शंभर कोटींची कमाई केली.
दुसरीकडे, काजोल प्रमुख भूमिकेत असलेला अजय देवगण बॅनरचा अलीकडील ‘आई’ नावाचा चित्रपटही बर्यापैकी चालला. विशेषतः जेव्हा बॉलिवूडमध्ये फ्लॉप चित्रपटांचा ओघ सुरू आहे, तेव्हा हा थोडासा दिलासा देणारा ठरला. या चित्रपटाचे बजेट विशेष प्रभावांसाठी २० कोटींवरून २५ कोटींवर गेले असले, तरी व्यापार विश्लेषकांचे म्हणणे आहे की हा चित्रपट चित्रपट ७०-७५ कोटींची कमाई करू शकते.
विविध सर्व्हेक्षणांनुसार असे दिसते की, कलाकारांच्या अनाठायी हस्तक्षेपामुळे चित्रपटाच्या प्रत्येक पैलूवर वाईट परिणाम झाला आहे. तांत्रिक पैलू सोडले तरी सर्जनशील बाजूकडेही त्यांच्या हस्तक्षेपामुळे दुर्लक्ष होते. बहुतांश चित्रपटांमध्ये चांगले संगीत, कथा, पटकथा, दिग्दर्शन दिसत नाही. मोठे तारे आपल्या माणसांना संधी देतात, त्यामुळे गुणी संगीतकार, पटकथालेखक किंवा दिग्दर्शक समोर येत नाहीत.
अक्षय कुमार अधूनमधून तरी कथांवर लक्ष केंद्रित करतो, पण इतर तारे यात कमी पडतात. जुबली कुमार, शम्मी कपूर, राज कपूर, मनोज कुमार यांसारखे जुने नायक हे आपल्या चित्रपटांच्या गाण्यांच्या बैठकांना खास हजेरी लावत असत. याउलट आजचे तारे केवळ आपली फी आणि भागीदारी वाढवण्यावर लक्ष केंद्रित करतात. ही फी इतकी प्रचंड असते की, इतर निर्मात्यांना फायदा होत नाही.
राजकुमार राव, कार्तिक आर्यन, आयुष्मान खुराना यांसारखे छोट्या बजेटचे नायकही थोडे यश मिळाल्यानंतर स्टारडमच्या भ्रमात आहेत. त्यांच्या चित्रपटांचे बजेट आता सहजपणे पन्नास कोटी ओलांडते. काही वर्षांपूर्वी त्यांच्या चित्रपटांचे बजेट चार-पाच कोटी असायचे आणि तेवढ्यावर त्यांना २५-५० लाख फी मिळत असे. पण आता त्यांनीही फी वाढवली आणि त्यांच्या चित्रपटांचे अपयश सुरू झाले. ‘भूल चूक माफ’ आणि ‘मालिक’सारख्या काही चित्रपटांची समीक्षाही चांगली नाही.
एक काळ असा होता की नायिकांची एक वेगळी ओळख होती. पण गेल्या काही वर्षांत नायिकांच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. बहुतांश चित्रपटांमध्ये नायिकांचा वापर फक्त नाममात्र म्हणून केला जातो. काही प्रतिभावान अभिनेत्री मोजकेच चित्रपट करत आहेत. दीपिका, अनुष्का आदी नायिका चित्रपटांपासून दूर आहेत. कियारा अडवाणी, सारा अली खान यांच्याकडे चित्रपट होते, पण त्यांनी इतर बाह्य गोष्टींमध्ये अधिक रस घेतला आहे.
बॉलीवूडच्या सद्य स्थितीसाठी अनेक व्यापार विश्लेषक कॉर्पोरेट जगताच्या अनावश्यक हस्तक्षेपालाही जबाबदार मानतात. चित्रपट निर्मितीसाठी लागणारा आर्थिक पाठिंबा कॉर्पोरेटमधूनच मिळतो. त्यामुळे ते चित्रपटाच्या प्रत्येक पैलूंमध्ये आपली मते लादतात. कथा, संगीत, दिग्दर्शन यामध्ये त्यांचे अतार्किक सल्ले प्रत्यक्ष सिनेमा करणार्यांना नकोसे वाटू लागले आहेत. बॉलीवूडमध्ये आज सक्षम आणि अनुभवी निर्माते आता क्वचितच आढळतात. अनेक वयोवृद्ध निर्माते चित्रपटच बनवत नाहीत. त्याशिवाय, मल्टिप्लेसमध्ये कमी बजेटच्या चित्रपटांचेही तिकिट दर जास्त असतात. त्यामुळेही प्रेक्षक दुरावले आहेत.
सध्या असे अनेक चांगले लेखक आहेत, जे कामासाठी संघर्ष करत आहेत. कमाल अमरोही, राही मासूम रज़ा, गुलजार यांसारख्या लेखकांचा चित्रपटांच्या यशात मोठा वाटा होता. त्याच पंक्तीत गुणी गीतकारांनाही स्थान देता येईल.
भारतीय चित्रपटसृष्टी म्हणजे फक्त मनोरंजनाचा उद्योग नव्हे, तर ती देशाच्या सामाजिक-सांस्कृतिक भावविश्वाचे आरसा आहे. त्यामुळेच बॉलिवूडमधील सातत्याने होणार्या अपयशांचा परिणाम केवळ व्यवसायिक पातळीवर मर्यादित राहत नाही, तर संपूर्ण समाजाच्या सांस्कृतिक समजुतींवर, अभिरुचीवर आणि युवा पिढीच्या कलात्मक दृष्टिकोनावरही प्रभाव टाकतो.
१९९० नंतर बॉलिवूडमध्ये ‘स्टार’ ही संकल्पना इतकी प्रभावी झाली की, एकट्या नायकाच्या नावावर चित्रपट चालेल असा गैरसमज पक्का झाला. पण ‘लाल सिंग चड्ढा’, ‘शमशेरा’, ‘अधिपुरुष’ आणि ‘राधे’ यांसारख्या चित्रपटांचे संपूर्णपणे कोसळणे हेच सिद्ध करतात की, आता प्रेक्षक फक्त नायक पाहायला थिएटरमध्ये येत नाही. यामुळे हे स्पष्ट होते की, स्टार संस्कृती ही आता कालबाह्य झाली असून, कथानक व आशयप्रधान निर्मिती हाच यशाचा पाया ठरतो. २०१९ नंतर ७० टक्क्यांहून अधिक बिग बजेट चित्रपट अपयशी ठरले आहे. २०२२ मध्ये फक्त १० टक्के हिंदी चित्रपटांनी उत्पादन खर्च ओलांडून नफा कमावला.
बर्याच हिंदी चित्रपटांमध्ये आजकाल सजीव कथा, समाजाभिमुख वास्तव, आणि सुबोध संवादांचा अभाव दिसतो. चित्रपट जणू काही एखाद्या ब्रँड प्रमोशनसारखे वाटतात. ग्रामीण वास्तव, निम्नमध्यमवर्ग, स्त्री जीवन, धर्म-जातीय विविधता या विषयांपासून बॉलिवूड लांब गेल्याने आपला चित्रपट ही भावना प्रेक्षकांमध्ये उरलेली नाही. ‘जवान’, ‘आरआरआर’, ‘कांतारा’, ‘थलैवी’ यांसारख्या प्रादेशिक चित्रपटांनी हिंदी भाषिक प्रेक्षकांमध्ये यश मिळवले कारण त्यांचं कथानक भावनिक सत्य, इतिहास वा लोकसांस्कृतिक गाभा यांच्याशी निगडित होतं.
दुसरीकडे, ‘नेटफ्लिस’, ‘हॉटस्टार’, ‘अॅमेझॉन’ यांसारख्या मंचांनी प्रेक्षकांना माफक दरात दर्जेदार आशय उपलब्ध करून दिला आहे. यात ‘फॅमिली मॅन’, ‘पंचायत’, ‘मिर्झापूर’, ‘ताजमहल १९८९’ यांसारख्या कथा प्रेक्षकांनी डोयावर घेतल्या. त्याच काळात मोठ्या नायकांचे चित्रपट ‘चिकट मसाला’ वाटू लागले. सध्याच्या सर्वेक्षणानुसार १५ ते ३५ वयोगटातील ६८ टक्के युवक प्रेक्षक सिनेमापेक्षा वेब मालिका प्राधान्याने पाहतात. यामुळेच आताची पिढी फक्त मोठ्या पडद्यावर चेहरा पाहून पैसे खर्च करत नाही, तर दर्जा आणि आशयाला महत्त्व देते.- सोनम परब
Check Also
कलाकारांचा आर्थिक संघर्ष
सिनेअभिनेते राजपाल यादव यांच्या आर्थिक संकटाची चर्चा अलीकडे बराच काळ चालली. न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही अनेकांनी …
पांचजन्य वृत्तपत्र