लेख-समिक्षण

दुर्धर आजारांवर मात करत यशोशिखरावर

राकेश चंदोला यांचे बालपण सामान्य मुलांसारखे आनंदी नव्हते, तर ते आरोग्याच्या विविध समस्यांनी आणि वेदनांनी वेढलेले होते. एका टप्प्यावर त्यांना तब्बल 17 आजारांनी ग्रासले होते, ज्यामध्ये अँकायलोझिंग स्पॉन्डिलायटिससारख्या अत्यंत गंभीर आणि वेदनादायी आजाराचाही समावेश होता. या आजारामुळे त्यांना वारंवार रुग्णालयात जावे लागत असे. प्रदीर्घ उपचार आणि शारीरिक कमजोरीमुळे त्यांचे वजन झपाट्याने कमी झाले होते, ज्यामुळे अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे त्यांच्यासाठी खूप कठीण बनले होते.
आरोग्याच्या समस्यांसोबतच राकेश यांना मोठ्या आर्थिक संकटाचाही सामना करावा लागला. त्यांचे एक स्टार्टअप अपयशी ठरल्यामुळे मोठे नुकसान झाले होते आणि याच कठीण काळात त्यांच्या वडिलांचे निधन झाले, ज्यामुळे त्यांना मोठा मानसिक धक्का बसला. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना दीर्घकाळ अंथरुणाला खिळून राहावे लागले होते. मात्र, अशा परिस्थितीतही त्यांनी पुस्तकांची साथ सोडली नाही. त्यांच्या आईने त्यांना नेहमीच खंबीर साथ दिली आणि पुढे जाण्यासाठी प्रेरित केले.
आयुष्यातील या सर्वात कठीण टप्प्यावर राकेश यांनी केवळ औषधांवर अवलंबून न राहता स्वतःला अंतर्मनातून बरे करण्याचे मार्ग शोधण्यास सुरुवात केली. त्यांनी स्वतःला एकांतात ठेवून मन, शरीर आणि भावना समजून घेण्यासाठी सखोल आत्मचिंतन केले. हा त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण टर्निंग पॉईंट ठरला, जिथे त्यांनी वेदनेला घाबरण्याऐवजी ती समजून घेण्यावर भर दिला. त्यांच्या विचारांमधील हा बदलच त्यांच्या यशाचा पाया ठरला.
शारीरिक स्थिती अत्यंत बिकट असताना आणि अंथरुणावर खिळून असतानाही त्यांनी राकेश एलएलबी, सीएफए, सीएमए, सीएस, एमबीए आणि एमकॉम अशा उच्च पदव्या मिळवल्या. त्यानंतर त्यांनी भारतीय सनदी लेखापाल संस्थेची म्हणजेच आयसीएआयची कठीण परीक्षा उत्तीर्ण करून ‌’सीए‌’ बनण्याचे आपले स्वप्न साकार केले. आज राकेश चंदोला हे एक प्रमाणित एनएलपी कोच, क्वांटम हीलर आणि संशोधक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या नावावर सलग 24 तास गायत्री मंत्राचा जप करण्याचा विक्रमही नोंदवला गेला आहे.
एकेकाळी असह्य वेदना सहन करणारे राकेश आज हजारो लोकांना आरोग्य आणि आनंदाचा मार्ग दाखवत असून, त्यांचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Check Also

मिमांस वामकुक्षीची

अनेकजण दुपारी जेवणावर आडवा हात मारून लगेचच आडवे होतात. दुपारची ‌‘वामकुक्षी‌’ या नावाने अनेक लोक …