लेख-समिक्षण

गांधीजी आणि करचोरी

महात्मा गांधी नेहमीच सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालण्याचे सांगत असत. पण धावपळीच्या जीवनात ही तत्त्वे फक्त बोलण्यापुरतीच राहतात. प्रत्यक्ष आयुष्यात त्यांची अंमलबजावणी करणं कठीण वाटतं. मात्र, जर आपण ती मनापासून जगलो, तर ती आपलं संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतात. याचं एक प्रत्यक्ष उदाहरण गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत दाखवून दिलं होतं.
गांधीजी त्या काळी दक्षिण आफ्रिकेत वकिली करत होते. एके दिवशी त्यांच्याकडे करचोरीचा एक खटला आला. त्यांनी कागदपत्रे नीट तपासून पाहिली, तर त्यात मोठमोठे घोटाळे आणि करचोरी उघड झाली. गांधीजींनी सरळ आपल्या लायंटला सांगितले, तुम्ही प्रचंड करचोरी केली आहे. या खटल्यात तुम्हाला कठोर शिक्षा होणार आहे. लायंट घाबरला आणि विचारू लागला, मग यातून वाचण्याचा काही उपाय नाही का?
गांधीजी शांतपणे म्हणाले, जर तुम्ही सत्य स्वीकारले, तर शिक्षा थोडी कमी होऊ शकते. पण खोटं बोलून वाचण्याचा कोणताही मार्ग नाही. लायंट अजूनही साशंक होता. तो म्हणाला, जर मी सगळं खरं-खरं कबूल केलं, तर मी तर बर्बाद होईन. गांधीजी ठामपणे उत्तरले, शिक्षा तर होणारच आहे. मग खोटं बोलून शिक्षा भोगण्यापेक्षा खरं सांगून ती स्वीकारलेली चांगली. सत्यात चमत्कार असतो, कदाचित ते तुम्हाला वाचवेल.
गांधीजींच्या निश्चयी शब्दांनी लायंटचे मन वळले. त्याने ठरवले की तो सत्य कबूल करेल. न्यायालयात गांधीजींनी खटला मांडला. त्यांनी प्रामाणिकपणे सांगितले की त्यांचा लायंट करचोरीचा दोषी आहे, पण आता तो मनापासून पश्चात्ताप करून भविष्यात अशी चूक पुन्हा कधीही करणार नाही, असे आश्वासन देत आहे. न्यायाधीश गांधीजींच्या सत्यनिष्ठेने खूप प्रभावित झाले. त्यांनी कठोर शिक्षा न देता फक्त थोडासा दंड ठोठावून त्याला मुक्त केले.
या अनुभवाने लायंटच्या जीवनात बदल घडला. त्याने गांधीजींचा सल्ला मनावर घेतला आणि आयुष्यभर सत्याच्या मार्गावर राहण्याचा संकल्प केला. आपल्या कंपनीतही कोणी खोटं बोलणार नाही, अशी शपथ त्याने घेतली. एवढंच नव्हे, तर त्या न्यायालयीन निर्णयाची प्रत चौकटीत बसवून त्याने आपल्या कार्यालयात लावून ठेवली, जेणेकरून सत्याच्या मार्गाचा तो धडा कायम स्मरणात राहील.
सत्याचे मार्गाने जाण्यासाठीचा पर्याय सर्वांसाठी नेहमीच उपलब्ध असतो, ही बाब वरील उदाहरणावरुन स्पष्ट होत नाही काय?

Check Also

जिद्दीच्या बळावर यशाला गवसणी

तमिळनाडूतील एका सर्वसामान्य तरुणानं सुरुवातीला 25 हजार रुपयांची नोकरी नाकारून अवघ्या 10 हजार रुपयांची इंटर्नशिप …