लेख-समिक्षण

कहाणी अष्टपैलू नायिकेची

फर्ज, रॉकी, बॉबी आणि लव्ह स्टोरीसारख्या गाजलेल्या अनेक चित्रपटात काम करणार्‍या अरुणा इराणी या दमदार अभिनयासाठी ओळखल्या जातात. अरुणा यांनी इंडस्ट्रीमध्ये सहा दशकांपेक्षा अधिक काळ काम केले. हिंदी, कन्नड, मराठी आणि गुजराती भाषेत पाचशेपेक्षा अधिक चित्रपटात काम करणार्‍या अरुणा इराणी यांच्या अभिनयाची ताकद लक्षात येते. फिल्मफेअर अवॉर्डसमध्ये सर्वोत्तम सहायक अभिनेत्रीच्या श्रेणीत त्यांना विक्रमी दहावेळेस नामांकन मिळाले होते. 1985 मध्ये ‘पेट प्यार और पाप’ आणि 1992 मध्ये ‘बेटा’ चित्रपटांसाठी पुरस्कार मिळाला. 2012 मध्ये अरुणा इराणी यांना 57 व्या फिल्मफेअर पुरस्कारात ‘जीवनगौरव’ने सन्मानित करण्यात आले होते.
———————-
ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी यांनी बॉलिवूडच्या पाच ते सहा दशकांच्या कारकिर्दीत एकाहून एक सरस भूमिका केल्या आहेत. संपूर्ण काळात आघाडीच्या भूमिका फारशा मिळाल्या नसल्या तरी त्यांनी अनेक प्रकारच्या भूमिका करत आपल्या अष्टपैलू अभिनयाची पावती दिली आहे. अमिताभ बच्चन यांची प्रेयसी ते माधुरी दिक्षितच्या खाष्ट सासूबाईची भूमिका करताना त्यांनी अभिनय कौशल्यातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. अरुणा इराणींचा दमदार अभिनय आणि नृत्याविष्काराची बॉलिवूडला अनेक काळापासून भुरळ पडली आहे. तारुण्यावस्थेतील त्यांच्या सौंदर्याने तरुणाई घायाळ झाली नसेल तर नवलचं. दुर्दैवाने अरुणा इराणी यांना आघाडीच्या भूमिका तुलनेने कमीच मिळाल्या. अर्थात नायिका होण्याची संधी मिळाली खरी परंतु त्यांना मोठ्या पडद्यावर खलनायिका म्हणनूच अधिक ख्याती मिळाली.
कौटुंबीक पार्श्वभूमी
अरुणा इराणी यांचा जन्म 3 मे 1946 रोजी मुंबईत झाला. त्यांचे वडिल फरिदुन इराणी हे मुळ इराणी आणि आई हिंदू धर्मिय होती. त्यांचे वडिल एक नाटक कंपनी चालवत असत आणि आई सगुणा या नायिका होत्या. अरुणा इराणी या बहिण भावंडांत सर्वात थोरल्या होत्या आणि नायिका बिंदू या त्यांच्या जवळच्या नातेवाईक. भाऊ इंद्रकुमार, अदी इराणी आणि फिरोज इराणी देखील चित्रपट उद्योगाशी संबंधित आहेत.
आर्थिक अडचणींशी सामना
अरुणा इराणी यांना सहावीतनंतर शिक्षणाला रामराम ठोकावा लागला. कारण सर्व मुलांना शिकवण्यासाठी इराणी कुटुंबांकडे फारसे पैसे नव्हते. वयाच्या नवव्या वर्षी त्यांच्यावर कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी चित्रपटात काम करण्याची वेळ आली. बाल कलाकार म्हणून दिलीप कुमार यांच्या गंगा जमुना (1961) मध्ये त्यांनी चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. 1962 मध्ये प्रदर्शित ‘अनपढ’मध्ये त्यांनी मालासिन्हांच्या बालपणाची भूमिका केली. त्यानंतर अनेक चित्रपटांत लहानसहान भूमिका केल्या. यादरम्यान त्यांनी नृत्याचे धडेही गिरविले.
साहाय्यक नायिकेच्याच भूमिका
प्रत्येक नव्या नायिकेला आघाडीची भूमिका हवी असते. अरुणा इराणी यांनी देखील प्रारंभीच्या काळात आघाडीची भूमिका मिळवण्याची इच्छा बाळगली. त्यांचे स्वप्न 1972 मध्ये साकार झाले. मेहमूद यांनी ‘बॉम्बे टू गोवा’ चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासमवेत नायिकेची भूमिका दिली. याप्रमाणे त्या ‘कारवा’ चित्रपटातही जितेंद्रच्या नायिका झाल्या. 1970 च्या दशकात झळकलेला हा चित्रपट यशस्वी ठरला. याउपरही अरुणा इराणी यांना नंतरच्या काळात बहुतांश नकारात्मक आणि सहायक भूमिकाच मिळाल्या. काळानुसार त्यांनी व्हँप (आयटम साँग) आणि चरित्र भूमिकाही केल्या. 1980-90 च्या दशकांत आईच्या भूमिकेत दिसू लागल्या. ज्येष्ठ कलाकार असरानी, कादरखान यांच्यासमवेत त्यांनी अनेकप्रकारच्या भूमिका साकारल्या. चित्रपटाव्यतिरिक्त 1995 ते 2019 या काळात दोन डझनापेक्षा अधिक टिव्ही मालिकेत काम केले आणि अनेक रियालिटी शोमध्येही त्या चमकल्या.
मेहमूद यांच्याशी अनोखे नाते
एकेकाळी अरुणा इराणी यांचे नाव प्रसिद्ध हास्य अभिनेते मेहमूद यांच्याशी जोडले गेले होते. मेहमूद विवाहित होते. एका मुलाखतीत त्यांनी मेहमूद यांना ‘ईश्वराने पृथ्वीवर पाठवलेला दूत’ असा उल्लेख केला होता. प्रारंभीच्या काळात मेहमूद यांनी नायिका म्हणून अरुणा इराणी यांना पहिला ‘ब्रेक’ दिला. मेहमूद विवाहित असल्याचे ठाऊक असतानाही इराणी आणि मेहमूद यांचे नाते मैत्रीपलिकडे गेले होते. परिणामी त्यांनी संबंधाची मर्यादा ओलांडली नाही.
विवाहित व्यक्तीशी विवाह
विवाहित असल्याने मेहमूद आणि अरुणा इराणी यांचे संबंध पुढे सरकले नाहीत. काही वर्षांतच त्यांनी एका विवाहित व्यक्तीशी विवाह केला. निर्माते कुकू कोहलीशी त्यांनी 1990 मध्ये विवाह केला. विवाहाच्या वेळी कोहली हे विवाहित आहेत आणि त्यांना मुली असल्याचे अरुणा इराणी यांना ठाऊक नव्हते. ही गोष्ट कळाली तेव्हा त्यांनी आई न होण्याचा निश्चय केला. कोहली यांच्या घराची ताटातूट होणार नाही, अशी अरुणा इराणी इच्छा होती. म्हणून त्यांनी या विवाहाची वाच्यता अनेक वर्षेकेली नाही. कारण कुकू कोहली यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिलेला नव्हता. यासंदर्भात त्या म्हणतात, कुकूआणि माझे संबंध हे कोणाला त्रास देण्यासाठी नव्हते किंवा एखाद्याचे हिरावून घेण्यासाठी नाहीत. कोहली यांची पहिली पत्नी रिटा यांचे निधन झाल्यानंतर अरुणा यांनी कोहली यांच्याशी असलेल्या संबंधाची माहिती उघड करण्यास सुरुवात केली. मात्र अरुणा इराणी यांच्या अभिनयाची गुणवत्ता पाहता त्यांना पुरेशा प्रमाणात यश मिळाले नाही. पण त्यांच्यातला अभिनय हा नेहमीच कौतुकास पात्र ठरला आहे.
अनेक पुरस्काराने गौरव
हिंदी, कन्नड, मराठी आणि गुजराती भाषेत पाचशेपेक्षा अधिक चित्रपटात काम करणार्‍या अरुणा इराणी यांच्या अभिनयाची ताकद लक्षात येते. फिल्मफेअर अवॉडॅसमध्ये सर्वोत्तम सहायक अभिनेत्रीच्या श्रेणीत त्यांना विक्रमी दहावेळेस नामांकन मिळाले होते. त्यात त्यांना दोनदा यश मिळाले. 1985 मध्ये ‘पेट प्यार और पाप’ आणि 1992 मध्ये ‘बेटा’ चित्रपटांसाठी पुरस्कार मिळाला. 2012 मध्ये अरुणा इराणी यांना 57 व्या फिल्मफेअर पुरस्कारात ‘जीवनगौरव’ने सन्मानित करण्यात आले होते.- सोनम परब

Check Also

रामायण, राम, रणबीर आणि वाद

सध्या बहुचर्चित, बहुप्रतिक्षित ‌‘रामायर्ण या चित्रपटाच्यानिमित्तान रणीबर कपूरने साकारलेल्या रामाच्या व्येितेखेवरुन वाद सुरू आहेत. वास्तविक …