15 दिवसांपृर्वी शिवसेना ठाकरे गटातून सहा खासदारांनी बंडखोरी करत शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर, शिवसेना (ठाकरे)ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी आणखी एक धक्का दिला आहे. ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर विधानपरिषद उपसभापतीपदाच्या मोबदल्यात शिंदेसेनेत सहभागी झाले आहेत. अहिर यांनी शिंदेंच्या शिवसेनेकडून विधानपरिषद उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानतंर, त्यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली.
सचिन अहिर हे ठाकरेंचे अत्यंत विश्वासू नेते मानले जात असत. वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांना निवडून आणण्यात आ. सचिन अहिर यांचा मोलाचा वाटा होता. शिवसेनेच्या ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत सहा खासदार ठाकरेंचे शिवबंधन सोडून शिवसेनेत गेले असतानाच आता आ. अहिर यांच्या पक्षांतराने ठाकरे गटाला भगदाड पडले आहे. उद्धव ठाकरे फुटीर खासदारांच्या मतदारसंघात दौरे करत असतानाच त्यांच्या सुपुत्राच्या मतदारसंघात हा राजकीय भूकंप झाला आहे. ठाकरेसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी शिंदेसेनेकडून उपसभापतिपदासाठी मंगळवारी अर्ज भरला. विधिमंडळाच्या अधिवेशनात विधान परिषदेच्या उपसभापतिपदासाठी निवडणूक झाली. या पदासाठी शिंदेसेनेकडून नीलम गोऱ्हे व कृपाल तुमाने यांची नावे समोर आली होती. परंतु ऐनवेळी ठाकरेसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी महायुतीकडून उमेदवारी अर्ज भरला आहे. आ. अहिर हे वरळी विभागातील आमदार होते. आदित्य ठाकरे पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवणार होते तेव्हा सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर अहिर यांना विधान परिषदेची आमदारकी देण्यात आली होती.
आता शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत विधानपरिषद उपसभापतीपदासाठी सत्ताधारी पक्षाकडून सचिन अहिर यांचा प्रस्ताव तर महाविकास आघाडीकडून ज.मो. अभ्यंकर यांचा प्रस्ताव निवडणुकीसाठी आला होता. मात्र, सभागृहाची इच्छा आहे सर्वानुमते निवड व्हावी. त्यामुळे आम्ही आमचा प्रस्ताव मागे घेत आहोत, असे शिवसेना (उबाठा) आमदार अनिल परब यांनी म्हटले. त्यानंतर, सचिन अहिर यांची उपसभापती बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय खोडके यांनी सचिन अहिर यांच्या निवडीचा प्रस्ताव मांडला, विक्रम काळे यांनी अनुमोदन दिले. भाजपकडून प्रवीण दरेकर यांनी प्रस्ताव मांडला, त्याला धैर्यशील कदम यांनी अनुमोदन दिलं, शिवसेनेकडून मनीषा कायंदे यांनी प्रस्ताव मांडला त्याला रविंद्र फाटक यांनी अनुमोदन दिलं. त्यानंतर, बहुमताने हा प्रस्ताव मंजूर झाला आणि आमदार सचिन अहिर यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी निवड जाहीर करण्यात आली.
सचिन अहिर यांनी 1993 मध्ये राष्ट्रीय मिल मजदूर संघात आपल्या कामाला सुरुवात केली. सचिवपद भूषवल्यानंतर ते या संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. 1996 पासून ते महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचेही प्रमुख राहिले. त्यांनी माझगाव डॉक, महिंद्रा अँड महिंद्रा युनियन इत्यादींचेही नेतृत्व केले होते. या सर्व उद्योगांमधील कामगारांच्या पगारात वाढ करण्यासाठी करार घडवून आणून त्यांनी कामगार चळवळीवर प्रभाव टाकला. 1999 मध्ये सचिन अहिर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले. पुढे 2004 आणि 2009 मध्येही त्यांनी आमदारकी राखली. 2009 काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये त्यांची गृहनिर्माण राज्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली. 2014 मध्ये त्यांना शिवसेनेचे उमेदवार सुनील शिंदे यांच्याकडून पराभवाचा धक्का बसला. 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शरद पवार यांना मोठा धक्का दिला. त्यांनी एकसंध शिवसेनेत प्रवेश केला.2020 मध्ये शिवसेनेच्या उपनेतेपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. तर शिवसेनेत फूट पडल्यानंतरही ते ठाकरेंशी एकनिष्ठ राहिले होते. त्यांच्यावर पुणे संपर्क प्रमुख पदाची धुरा सोपवण्यात आली होती. आदित्य ठाकरेंना वरळी मतदारसंघाचे मैदान मोकळे केल्याची बक्षिसी म्हणून 2022 मध्ये ठाकरेंकडून त्यांची विधान परिषदेवर निवड करण्यात आली.
शिंदेसेनेचे नेते अब्दुल सत्तार म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा उठाव करण्यात आला होता, त्या वेळी नियोजनाची जबाबदारी ज्यांच्याकडे देण्यात आले होती, त्याच्यात 33 नंतर जे 7 लोक आले होते, ते सात लोक असेच जबाबदारी देण्यात आलेले होते. सचिन अहिर यांनी गेल्या काही दिवसांतील काळात जे काही काम केले, कदाचित ही त्याच सर्व कामांची पावती आहे. एकनाथ शिंदे यांनी दिलेली जबाबदारी पार पाडली असेल म्हणून त्यांना उपसभापति पद देण्यात आले, असा गौप्यस्फोट त्यांनी केला.
Check Also
द्विपक्षीय लोकशाहीकडे?
वर्तमान राजकारणात देशातील प्रादेशिक पक्ष ज्या प्रकारे फुटून विखुरत चालले आहेत, त्याचे सर्वात मोठे कारण …
पांचजन्य वृत्तपत्र