महाराष्ट्रात अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफडीए) पदावर तुकाराम मुंडे यांची नियुक्ती झाल्यापासून राज्यातील भेसळखोरीच्या साम्राज्याला सुरुंग लागला आहे. दूध, पनीर, औषधे, वेफर्स, गुटखा, चहापत्ती, खाद्यतेल अशा सर्वसामान्यांच्या रोजच्या आहारातील पदार्थांमध्ये बिनदिक्कतपणे भेसळ करून लोकांच्या जीवाशी अत्यंत घातक खेळ सुरू होता. आपल्या धाडसत्रांनी या निर्ढावलेल्या भेसळखोरांच्या मुसक्या आवळण्याचे काम ज्या तडफदारपणाने सुरू आहे त्याबद्दल आयुक्त तुकाराम मुंडे यांचे सर्व स्तरातून कौतुक होणे स्वाभाविकच. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची या विभागासाठी त्यांची केलेली नियुक्ती ही एक प्रकारची शुद्धीकरणाची मोहीमच म्हणायला हवी.आपण सेवन करत असलेले पदार्थ कितपत सुरक्षित आहेत हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असला तरी शासन आणि प्रशासन यासाठी कार्यरत आहे, असा एक सुप्त विश्वास सर्वसामान्यांच्या मनात असतो. याच विश्वासाचा गैरफायदा घेत भेसळखोर आपले काळे साम्राज्य उभे करतात.
तुकाराम मुंडे यांनी घातलेल्या धाडींमधून समोर आलेले वास्तव अत्यंत भेदक आणि सुन्न करणारे आहे. पुणे, मुंबई आणि नाशिक परिसरातील धाडसत्रात मोठ्या प्रमाणावर बनावट पनीर जप्त करण्यात आले. हे पनीर तयार करण्यासाठी दुधाऐवजी वनस्पती तेल, डिटर्जंट आणि स्टार्च पावडरीचा वापर केला जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. अनेक हॉटेल्स आणि पिझ्झा सेंटर्समध्ये अस्सल चीजऐवजी स्वस्त ‘चीज ॲनालॉग’ ज्यात दुधाच्या फॅटऐवजी पामतेलाचा वापर केला जातो, ते वापरून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे उघडकीस आली आहे. सर्वसामान्यांची रोजची सकाळ ज्या चहापानाने होते, त्यामध्ये भेसळ केली जाते, याची कल्पनाही कधी कुणी केली नसेल. पण त्यात आरोग्याला घातक असणारा कृत्रिम रंग मिसळणारा एक मोठा कारखाना एफडीएने उद्ध्वस्त केला. या चहापत्तीमध्ये कायद्याने ठरवून दिलेल्या 200 पीपीएम या मर्यादेपेक्षा तब्बल सहापट जास्त म्हणजे 1200 पीपीएम रासायनिक रंग आढळला. हा रंग जो मानवी आरोग्यासाठी, विशेषतः यकृत आणि पोटासाठी अत्यंत घातक आहे. लाल तिखट आणि हळदीमध्ये विटांची पूड, लाकडाचा भुसा आणि ‘मेटानिल यलो’ सारख्या रासायनिक रंगांची भेसळ केल्याची प्रकरणेही समोर आली आहेत.
बदलत्या काळात आरोग्याविषयीची जागरूकता वाढल्यामुळे आणि मधुमेह, स्थूलपणा, उच्च रक्तदाब, हृदयविकार यांसारखे आजार बळावत चालल्याने फलाहाराला मोठे महत्त्व आले आहे. पण मुंबई, वाशी मार्केट आणि पुण्याच्या मार्केट यार्डात मोठ्या प्रमाणावर कॅल्शियम कार्बाइड आणि इथिलिन गॅसचा वापर करून आंबा, केळी यांसारखी फळे कृत्रिमरित्या पिकवल्याची प्रकरणे समोर आली आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला प्रचंड मोठा धोका निर्माण झाला होता. दीर्घकाळ अशा रसायनांनी पिकवलेली फळे खाल्ल्याने शरीरात कर्करोगाच्या पेशी निर्माण होण्याची शक्यता असते. तुकाराम मुंडे यांनी केवळ 30 दिवसांत राज्यभरात 900 हून अधिक धाडी टाकून गुटखा, भेसळयुक्त अन्न, अवैध औषधे असा सुमारे 35 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 457 जणांना अटक केली आहे.
महाराष्ट्रात गुटखाबंदी लागू होऊन अनेक वर्षेझाली, तरीही गल्लीबोळातील टपऱ्यांवर गुटखा उघडपणे विकला जात होता. कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा या राज्यांमधून विविध ट्रक्स आणि खाजगी वाहनांचा वापर करून हा माल मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिकसारख्या प्रमुख शहरांमधील गोदामांमध्ये साठवला जात होता. तिथून किरकोळ विक्रेत्यांना याचा पुरवठा केला जायचा. हा संपूर्ण व्यवहार गुंतागुंतीच्या साखळीद्वारे आणि सांकेतिक शब्दांचा वापर करून सुरू होता. कारण आजवरची कारवाई केवळ दंडात्मक स्वरूपाची होती. भेसळखोर किंवा तस्कर दंड भरायचे आणि पुन्हा आपला काळा धंदा सुरू करायचे. परंतु, मुंढे यांनी या संपूर्ण साखळीला संघटित गुन्हेगारी मानून थेट ‘मकोका’ लावला. इतकेच नव्हे तर 274 अस्वच्छ आणि नियमबाह्य आस्थापने तातडीने सील करण्यात आली असून कोट्यवधी रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
कोणतीही नवीन नियमावली नाही, नवीन कर्मचारी वर्ग नाही की कायद्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही; तरीही एफडीएला लाभलेल्या या खंबीर अधिकाऱ्याच्या नेतृत्वामुळे यंत्रणा गतिमान झाली आणि भेसळीच्या राक्षसाला सळो की पळो करून सोडण्यात आले. प्रशासनातील 17 वर्षांच्या सेवेत तब्बल 19 वेळा बदली झालेले आयएएस अधिकारी म्हणून मुंडे यांची ओळख महाराष्ट्राला आहे. कोणत्याही विभागाचा पदभार दिला तरी तेथे कायद्यांची अमलबजावणी करण्याचे आपले कर्तव्य काटेकोरपणाने पार पाडायचे हा त्यांचा शिरस्ता राहिला आहे. अशा अधिकाऱ्यांना सुजाण नागरिकांकडून नेहमीच सकारात्मक पाठिंबा मिळतो. नागपूर, नाशिकसह अन्य ठिकाणांवरुन त्यांची बदली झाली तेव्हा ती रोखण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले. ही बजबजपुरी आणि अवैध धंदे मोडून काढण्यासाठी निणर्याधिकार असणारा यंत्रणेतील अधिकारी जेव्हा पुढे सरसावतो तेव्हा समाजासाठी तो हिरो ठरतो. गेल्या महिन्याभरातील एफडीएच्या कारवायांमुळे तुकाराम मुंडे महाराष्ट्राचे हिरो बनले आहेत. मार्क ट्वेन यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे – जेव्हा आपण एखाद्या भ्रष्ट व्यवस्थेत प्रामाणिकपणे नियम लागू करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ती व्यवस्था त्या नियमाला नाही, तर तुम्हालाच बाहेर फेकण्याचा प्रयत्न करते. याच भीतीमुळे प्रशासनात स्वच्छतेची मोहीम राबवण्याबाबत अनेक अधिकारी बोटचेपी भूमिका घेताना दिसतात. पण तुकाराम मुंडे यांचा तो मूलतः पिंड नाही. अत्यंत शिस्तप्रधान अधिकारी म्हणून ते ओळखले जातात.
1990 च्या दशकात वरिष्ठ आयएएस अधिकारी अरुण भाटिया यांची बदली महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदी करण्यात आली होती. तोपर्यंत एफडीए हा विभाग अत्यंत सुस्त आणि थंड बस्त्यात पडल्यासारखा होता. 2010 ते 2014 या काळात एफडीएचे आयुक्त असणाऱ्या महेश झगडे यांनी राज्यात ऐतिहासिक गुटखा आणि पानमसाला बंदी केली. तोपर्यंत गुटखा कंपन्यांवर स्थानिक कायदे फारसे प्रभावी ठरत नव्हते. झगडे यांनी केंद्र सरकारच्या नवीन अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, 2006 चा सखोल अभ्यास केला. गुटख्यामध्ये आढळणारे मॅग्नेशियम कार्बोनेट आणि निकोटीन हे मानवी शरीरासाठी हानिकारक असून ते अन्नाच्या व्याख्येत बसत नाहीत, हा तांत्रिक मुद्दा त्यांनी न्यायालयासमोर भक्कमपणे मांडला. राज्यातील सर्व गुटखा उत्पादन कारखाने त्यांनी सील केले आणि शेजारील राज्यांतून येणारा पुरवठा रोखण्यासाठी रेल्वे स्थानके आणि सीमांवर स्वतः जाऊन छापे टाकले.ही शृंखला पुढे नेत तुकाराम मुंडे यांनी भेसळमाफिया आणि अवैध धंदे करणाऱ्यांवर जी जरब बसवली आहे ती पुढेही कायम राहायला हवी. – विश्वास सरदेशमुख,ज्येष्ठ पत्रकार-विश्लेषक
Check Also
शिंदेंचे संपूर्ण सरकारच बेकायदेशीर
शिवसेना कुरू आहे. ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे युक्तिवाद करत आहेत. कपिल सिब्बल …
पांचजन्य वृत्तपत्र