लहान मुलांना लिहिण्यास शिकवण्याची योग्य पध्दत

लहान मुलांना लिहिण्यास शिकवणे हे पालकांसाठी मोठे आव्हान असते. अनेकदा पालक थेट अक्षरे गिरवण्यापासून सुरुवात करतात, परंतु बालरोगतज्ज्ञ डॉक्टर अर्पित गुप्ता यांच्या मते ही पद्धत चुकीची आहे. मुलांचे हात आणि मेंदू अक्षरे लिहिण्यासाठी लगेच तयार नसतात. त्यामुळे त्यांना टप्प्याटप्प्याने आणि खेळाच्या माध्यमातून लिहिण्यास शिकवले पाहिजे, जेणेकरून त्यांच्यावर कोणताही ताण येणार नाही.
1. सुरुवातीला फक्त ओरखडे (स्क्रिबलिंग) काढू द्या डॉक्टर अर्पित यांच्या मते, लहान मुलाच्या हातात पेन्सिल किंवा क्रेयॉन दिल्यावर त्याला कागदावर हवे तसे ओरखडे काढू द्यावेत. याला ‌’स्क्रिबलिंग‌’ म्हणतात. यात कोणतेही नियम नसावेत. यामुळे मुलांच्या हाताची हालचाल सुधारेल आणि त्यांच्या मनातील लिहिण्याची भीती दूर होईल. मुलाचा हात आणि मेंदू यांचा ताळमेळ बसण्यासाठी हा पहिला टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे.
2. नियंत्रित ओरखडे (कंट्रोल्ड स्क्रिबलिंग) जेव्हा मूल मुक्तपणे कागदावर गिरवू लागेल, तेव्हा त्याला दुसऱ्या टप्प्याकडे घेऊन जावे. यात मुलाला एका मर्यादित जागेत, जसे की एखाद्या चौकोनात किंवा वर्तुळातच रंग भरण्यास किंवा रेषा ओढण्यास सांगावे. यामुळे मुलाच्या हातावर नियंत्रण येते आणि त्याला दिशेचे ज्ञान होऊ लागते.
3. रेषांचा सराव (लाईन्स प्रॅक्टिस) लिहिण्याचा पाया रेषांमध्ये असतो. पालकांनी मुलांना तीन प्रकारच्या रेषा शिकवाव्यात:
उभ्या रेषा (स्टँडिंग लाईन्स)
आडव्या रेषा (स्लीपिंग लाईन्स)
तिरप्या रेषा (स्लँटिंग लाईन्स)
जवळपास सर्व अक्षरे आणि अंक या तीन रेषांवर आधारित असतात. जेव्हा मूल या रेषा सहज काढू लागेल, तेव्हा त्याचा हात लिहिण्यासाठी तयार होत आहे असे समजावे.
4. वळणदार रेषा किंवा कर्व्ह (कर्व्हज) रेषांनंतर मुलांना वळणदार रेषा काढण्याचा सराव करून घ्यावा. यात गोल, अर्धगोल किंवा नागमोडी रेषांचा समावेश होतो. सुरुवातीला पालक मुलाचा हात धरून त्यांना मार्गदर्शन करू शकतात. वळणे काढता आल्यामुळे ‌‘अ‌’, ‌‘ब‌’, ‌‘क‌’ सारखी अक्षरे आणि अंक लिहिणे मुलांसाठी सोपे जाते.
5. डॉटस्‌‍ जोडणे आणि पॅटर्न (डॉटस्‌‍ अँड पॅटर्न्स) शेवटच्या टप्प्यात मुलांना लहान पॅटर्न तयार करायला शिकवावे. त्यानंतर दोन ठिपके (डॉट्स) जोडायला सांगावे. जेव्हा मूल यात सराईत होईल, तेव्हा त्याला अनेक विखुरलेले ठिपके देऊन ते एकमेकांना जोडायला सांगावे. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि ते अक्षरे लिहिण्याकडे वळण्यास सज्ज होतात.
सल्ला: मुलांना लिहिण्याची सक्ती करण्याऐजी या पद्धतींचा अवलंब केल्यास ते आवडीने शिकतील.

Check Also

‌‘पॅनेल इंटरव्ह्यू‌’मध्ये बाजी मारायचीय?

पॅनेल इंटरव्ह्यू म्हणजेच एकाच वेळी अनेक मुलाखतकारांसमोर (पॅनेल) सामोरे जाणे, हा बहुतांश उमेदवारांसाठी अत्यंत तणावाचा …