भारतीय टेलिव्हिजनवरील आपल्या भन्नाट विनोदशैलीने आणि अचूक कॉमिक टायमिंगमुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी भारती सिंग आज मनोरंजनविश्वातील मोठं नाव आहे. मात्र, तिचा हा यशाचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. प्रचंड गरिबी, वडिलांचे लहानपणीच झालेले निधन आणि अनेक अडचणींवर मात करत तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
पंजाबमधील अमृतसर येथे एका सामान्य कुटुंबात भारती सिंहचा जन्म झाला. ती अवघी दोन वर्षांची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी तिच्या आईवर आली. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे कुटुंबाला अनेक संकटांचा सामना करावा लागला.
अनेक वेळा घरात खाण्यासाठी पुरेसे अन्नही नसायचे. काही वेळा दुसऱ्यांचे उरलेले शिळे अन्न खाऊन दिवस काढावे लागत होते.
अशा कठीण परिस्थितीतही भारतीने हार मानली नाही. तिने शिक्षण सुरू ठेवले आणि स्वतःतील कला जपली. कॉलेजमध्ये असताना तिची भेट प्रसिद्ध विनोदी कलाकार सुदेश लहरी यांच्याशी झाली. त्यांनी भारतीच्या विनोद करण्याच्या शैलीतील क्षमता ओळखली आणि तिला या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले.
कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या यूथ फेस्टिव्हलमध्ये भारतीने सुवर्णपदक जिंकले. या यशामुळे तिचा आत्मविश्वास आणखी वाढला. याच काळात तिची ओळख लोकप्रिय कॉमेडियन कपिल शर्मा यांच्याशी झाली. कपिल यांनी भारतीची कॉमिक टायमिंग पाहून तिला ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’च्या ऑडिशनसाठी जाण्याचा सल्ला दिला.कपिल यांचा हा सल्ला भारतीच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’मधून तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आणि अनेक कॉमेडी शो, रिॲलिटी शो आणि विविध कार्यक्रमांमधून तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. विनोदशैलीमुळे तिला ‘लाफ्टर क्वीन’ म्हणूनही ओळख मिळाली.
आज भारती सिंह केवळ विनोदी कलाकार म्हणूनच नव्हे, तर यशस्वी सूत्रसंचालिका म्हणूनही ओळखली जाते. तिच्या विनोदबुद्धीमुळे आणि सकारात्मक स्वभावामुळे ती आजही प्रेक्षकांची आवडती कलाकार आहे.
गरिबीतून सुरू झालेला तिचा प्रवास आज लाखो चाहत्यांच्या प्रेमापर्यंत पोहोचला असून, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर कोणतेही स्वप्न पूर्ण करता येते, हे तिने आपल्या आयुष्यातून सिद्ध करून दाखवले आहे.
Check Also
पर्यावरणपूरक यशोगाथा
दरवर्षी टिश्यू पेपर, स्वयंपाकघरातील कागदी पुसणी आणि इतर कागदी वस्तूंच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर झाडांची तोड …
पांचजन्य वृत्तपत्र