महाराष्ट्रातील सत्ताकारण, गुन्हेगारी जगतातील धागेदोरे आणि सत्तेच्या अंधाऱ्या कोपऱ्यात शिजणारी कटकारस्थाने यावर थेट बोट ठेवणारा आगामी मराठी चित्रपट ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ सध्या प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित तिसरा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून, दिग्गज अभिनेते सुबोध भावे यांच्या करारी भूमिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. यापूर्वी प्रदर्शित झालेल्या दोन टीझर्सनी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली होती. आता तिसऱ्या टीझरमध्ये सुबोध भावे यांचा पांढराशुभ्र कुर्ता, बंद गळ्याचे काळे जॅकेट आणि चेहऱ्यावरील भेदक गांभीर्य पाहून ते एका तत्त्वनिष्ठ आणि मुरब्बी मुख्यमंत्र्याची भूमिका साकारत असल्याचे स्पष्ट संकेत मिळतात.
चित्रपटात सुबोध भावे यांच्या तोंडी असलेला एक संवाद विशेष लक्षवेधी ठरतो आहे. मंत्री असो वा आमदार, जो कोणी कायद्याचे उल्लंघन करेल किंवा गुन्ह्यात दोषी आढळेल, त्याला कायद्याच्या कचाट्यातून सुटता येणार नाही आणि त्याची गय केली जाणार नाही, असा सज्जड दम ते भरताना दिसतात. ही व्यक्तिरेखा व्यवस्थेतील बड्या धेंडांना इशारा देणाऱ्या प्रशासकीय प्रमुखाची असल्याचे दिसते. या चित्रपटात अभिनेत्री दिपाली सय्यद आणि ज्येष्ठ अभिनेते उदय टिकेकर यांच्याही अत्यंत महत्त्वाच्या भूमिका आहेत. मात्र कथानकाच्या केंद्रस्थानी असलेल्या अशोक खरात या वादग्रस्त पात्राची भूमिका पडद्यावर नेमका कोणता अभिनेता साकारणार, हे रहस्य निर्मात्यांनी अजूनही गुलदस्त्यात ठेवले आहे.
हा चित्रपट एका खऱ्याखुऱ्या गुन्हेगारी प्रकरणावर आधारित असल्याची चर्चा आहे. अद्भुत शक्ती असल्याचा बनाव करून महिलांचे शोषण करणे, बनावट रुद्राक्ष व मध विक्रीतून सुमारे 47 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा करणे या प्रकरणात तपास यंत्रणांनी केलेल्या कारवाईचे संदर्भ कथेत दिसतात. हे प्रकरण काही राजकीय नेत्यांशीही जोडले गेले होते. हा रहस्यमय आणि राजकीय थरारपट 20 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात दाखल होणार असून मराठी पडद्यावर एक धाडसी विषय मांडला जाणार आहे.- अपर्णा देवकर
Check Also
विजय आणि रश्मिकाचा ‘रणबाली’
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडा आणि आघाडीची अभिनेत्री रश्मिका मंदाना ही बहुचर्चित जोडी पुन्हा …
पांचजन्य वृत्तपत्र