उच्चशिक्षण घेऊन चांगल्या पगाराची नोकरी मिळवणे आणि शहरात स्थिरस्थावर होणे, हे अनेक तरुणांचे स्वप्न असते. मात्र, पुणे जिल्ह्यातील दोन भावांनी याच्या अगदी उलट मार्ग निवडला. बँकेतील चांगल्या नोकऱ्या सोडून त्यांनी गावाकडच्या शेतीची वाट धरली. पारंपरिक शेतीला आधुनिक व्यावसायिक दृष्टिकोनाची जोड देत त्यांनी आज कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेला ब्रँड उभा केला आहे. ही यशोगाथा आहे सत्यजित आणि अजिंक्य हंगे या दोन भावांची!
पुणे जिल्ह्यातील भोडणी गावचे रहिवासी असलेले सत्यजित आणि अजिंक्य हंगे यांनी 2012 च्या सुमारास बँकेतील नोकऱ्या सोडून कुटुंबाच्या शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. शेतीकडे केवळ उदरनिर्वाहाचे साधन म्हणून न पाहता त्यांनी त्यामध्ये व्यवसायाच्या नव्या संधी शोधल्या. रासायनिक घटकांचा वापर कमी करून मातीचे आरोग्य जपणे, नैसर्गिक पद्धतीने पिकांचे उत्पादन घेणे आणि ग्राहकांना दर्जेदार अन्नधान्य उपलब्ध करून देणे, या उद्देशाने त्यांनी काम सुरू केले.
या प्रयत्नांतून 2014 मध्ये ‘टू ब्रदर्स ऑर्गेनिक फार्म्स’ या ब्रँडची स्थापना झाली. सुरुवातीला स्वतःच्या शेतात नैसर्गिक पद्धतीने उत्पादन घेणाऱ्या या भावांनी पुढे शेतमालावर प्रक्रिया करून त्यापासून विविध खाद्यपदार्थ तयार करण्यास सुरुवात केली. 2016 मध्ये त्यांच्या शेतीला सेंद्रिय प्रमाणपत्र मिळाले. त्यामुळे त्यांच्या उत्पादनांना ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यास मदत झाली.
आज त्यांच्या ब्रँडअंतर्गत तूप, खाद्यतेल, तांदूळ, गूळ, मसाले, डाळी आणि विविध धान्यांची विक्री केली जाते. उत्पादनांचा नैसर्गिक दर्जा टिकवण्यासाठी लाकडी घाण्यावर तेल काढणे आणि दगडी गिरणीत धान्य दळणे अशा पारंपरिक प्रक्रियांना त्यांनी प्राधान्य दिले. काही उत्पादनांसाठी आवश्यक यंत्रसामग्रीही विशेष तयार करून घेतली. पारंपरिक शेतीपद्धती आणि आधुनिक बाजारपेठ यांची सांगड घालणे, हे त्यांच्या व्यवसायाचे वैशिष्ट्य ठरले.
विशेष म्हणजे, या दोन भावांचा व्यवसाय आता केवळ त्यांच्या स्वतःच्या शेतीपुरता मर्यादित राहिलेला नाही. त्यांच्या उपक्रमाशी 5,000 हून अधिक शेतकरी जोडले गेले आहेत. आर्थिक वर्ष 2025 मध्ये व्यवसायाचा वार्षिकीकृत महसूल दर 250 कोटी रुपयांहून अधिक झाला होता. शेतीवर आधारित व्यवसाय किती मोठ्या प्रमाणावर विस्तारू शकतो, याची कल्पना त्यातून येते.
Check Also
कहाणी ‘योद्धा मगर’ ची
यनासोरच्या युगापूर्वी, सुमारे 240 दशलक्ष वर्षांपूर्वी ट्रयासिक कालखंडात, ब्राझीलमध्ये वावरणाऱ्या एका महाकाय ‘योद्धा सरड्याचा’ शोध …
पांचजन्य वृत्तपत्र