सीईटी घोटाळ्याचा 25 लाखांचा रेट?

रोहित पवारांच्या आरोपाने शिक्षण क्षेत्रात खळबळ
महाराष्ट्रातील सीईटी परीक्षेच्या माध्यमातून होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेत मोठा घोटाळा होत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांनी केला आहे. टॉप इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी 25 लाख रुपयांचा रेट सांगितला जात असल्याचा दावा करत त्यांनी स्टिंग ऑपरेशनमधील माहिती समोर आणली. या प्रकरणामुळे राज्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या आरोपांदरम्यान काही शिक्षकांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
डेटा लीकचा संशय
रोहित पवार यांनी सीईटी परीक्षेतील कथित डेटा लीकचा मुद्दा उपस्थित केला. या प्रकरणी तक्रार करण्यात आली असून, सरकारने विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे. मात्र, तपासात पुढे ठोस हालचाल दिसत नसल्याचा आरोप त्यांनी केला. ‌‘एज्युस्पार्क‌’ नावाच्या कंपनीकडून डेटा लीक झाल्याचा संशय असल्याचे रोहित पवार म्हणाले. या कंपनीला सुमारे 2,300 कोटी रुपयांची कामे देण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. कंपनीला विविध मंत्र्यांच्या कार्यकाळात कामे मिळाल्याचा उल्लेख करत, या कामांच्या प्रक्रियेवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
स्टिंग ऑपरेशनमध्ये 25 लाखांचा दावा : यावेळी रोहित पवार यांनी स्टिंग ऑपरेशन दाखवले. शिक्षक नारायण शिंगारे यांनी सीईटी परीक्षेतील कथित गैरप्रकारांविषयी माहिती दिल्याचे सांगण्यात आले. टॉप इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी 25 लाख रुपये मागितले जात असल्याचा दावा शिंगारे यांनी केला. या प्रकरणात स्थानिक पोलीस ठाणे आणि एसआयटीकडे गेल्यानंतरही गुन्हा दाखल झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, स्टिंग ऑपरेशनमधील दावे आणि कथित व्यवहारांची स्वतंत्रपणे पडताळणी होणे आवश्यक आहे. संबंधित व्यक्ती किंवा संस्थेची बाजूही समोर येणे महत्त्वाचे आहे.
रोहित पवार यांच्या आरोपानुसार, सदर कंपनीला राज्यात विविध कामे देण्यात आली आहेत. मंत्री उदय सामंत यांच्या कार्यकाळात कंपनीला पहिल्यांदा काम मिळाल्याचा दावा त्यांनी केला. त्यानंतर चंद्रकांत पाटील आणि दीपक केसरकर यांच्या कार्यकाळातही कंपनीला कामे देण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. रोहित पवार यांनी या प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केले. या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
‌‘चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घ्या‌’
सीईटी प्रवेश प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांवरून शिक्षक नारायण शिंगारे यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली. चंद्रकांत पाटील मंत्री झाल्यापासून शिक्षणाची वाट लागली आहे. ते विद्यार्थ्यांना न्याय देऊ शकत नाहीत. ही शिक्षण व्यवस्था किडलेली आहे. हे तात्काळ थांबवले पाहिजे, अशी टीका शिंगारे यांनी केली. सीईटीसारख्या महत्त्वाच्या परीक्षेतील प्रवेश प्रक्रिया पारदर्शक असावी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी मागणीही त्यांनी केली. या प्रकरणात पुढे काय कारवाई होते, याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागले आहे.

Check Also

मतािधकाराचा बळी नको!

देशातील 31 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (एसआयआर) प्रक्रियेतून तब्बल 13 कोटी …