दिवाळी हा भारतीय संस्कृतीतील आनंद, समृद्धी आणि कौटुंबिक स्नेहाचा उत्सव आहे. या सणातील प्रत्येक दिवसाला स्वतंत्र धार्मिक आणि सामाजिक महत्त्व आहे. दिवाळी म्हणजे केवळ दिव्यांची रोषणाई किंवा लक्ष्मीपूजन नव्हे, तर संपत्तीच्या विविध रूपांची आराधना करण्याचे पर्व आहे. गोधन, आरोग्यधन, धनसंपत्ती यांच्याबरोबरच कौटुंबिक आणि सामाजिक संबंधांचे जतन करण्याची शिकवणही या सणातून मिळते. त्यामुळे दिवाळीचे महत्त्व धार्मिक परंपरांपुरते मर्यादित न राहता सामाजिक आणि आर्थिक जीवनाशीही जोडलेले आहे.
दिवाळीच्या उत्सवाची सुरुवात वसुबारसेपासून होते. प्राचीन काळात गोधन हे संपत्तीचे महत्त्वाचे प्रतीक मानले जात असे. ही एक प्रकारे गोधनरूपी लक्ष्मीचीच आराधना आहे.धनत्रयोदशीला धन्वंतरीचे पूजन केले जाते. धन्वंतरी ही आरोग्याची देवता मानली जाते. उत्तम आरोग्य हीदेखील मोठी संपत्ती असल्यामुळे या दिवशी आरोग्यसंपन्न जीवनासाठी प्रार्थना केली जाते. नरक चतुर्दशीचा संबंध श्रीकृष्णाने केलेल्या नरकासुराच्या वधाशी जोडला जातो. धार्मिक कथेनुसार श्रीकृष्णाने नरकासुराच्या बंदिवासातील स्त्रियांची मुक्तता केली. या दिवशी पहाटे अभ्यंगस्नान करण्याची विशेष परंपरा आहे. शरीरशुद्धी, प्रसन्नता आणि मंगलतेची भावना या प्रथेमागे आहे.
आश्विन अमावास्येला लक्ष्मीपूजन केले जाते. इतर अमावास्यांपेक्षा ही अमावास्या लक्ष्मीच्या आराधनेसाठी विशेष शुभ मानली जाते. घरातील धनसंपत्ती, व्यापाराच्या वह्या, दुकाने आणि व्यवसायासाठी उपयोगी पडणाऱ्या साधनांचे पूजन या दिवशी केले जाते. सूर्यास्तानंतरच्या प्रदोषकाळात लक्ष्मीपूजन करण्याची परंपरा आहे. या काळात लक्ष्मीचे घरात आगमन होते, अशी श्र्द्धा आहे.
कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा किंवा दिवाळी पाडवा. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. अनेक व्यापारी परंपरांमध्ये या दिवसापासून नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात मानली जाते. नवीन व्यवहार, खरेदी आणि व्यवसायाच्या शुभारंभासाठी हा दिवस महत्त्वाचा असतो. पती-पत्नीच्या नात्यातील स्नेह वृद्धिंगत करण्यासाठी पत्नीने पतीला ओवाळण्याची परंपराही आहे.भाऊबीज हा बहीण-भावाच्या नात्याला उजाळा देणारा दिवस आहे. यमाची बहीण यमी हिने आपल्या भावाला ओवाळल्याची पौराणिक कथा यामागे सांगितली जाते. म्हणूनच या दिवसाला यमद्वितीया असेही म्हणतात. या दिवशी यमपूजन आणि तर्पण करण्याची धार्मिक परंपरा आहे.
दिवाळीचे सामाजिक महत्त्वही मोठे आहे. नातेवाईकांच्या भेटीगाठी, फराळाचे कार्यक्रम, कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या भेटवस्तू आणि बोनस यांमुळे परस्पर संबंध अधिक दृढ होतात. मतभेद विसरून एकत्र येण्याची संधी या उत्सवातून मिळते. दिवाळीमुळे बाजारपेठेतही मोठी आर्थिक उलाढाल होते. सोने-चांदी, वस्त्रे, सजावटीच्या वस्तू, फुले, रांगोळी आणि इतर अनेक व्यवसायांना चालना मिळते. अशा प्रकारे दिवाळी हा आरोग्य, संपत्ती, व्यवसाय आणि मानवी नातेसंबंध या सर्वांचे महत्त्व अधोरेखित करणारा उत्सव आहे. व्यक्तीपासून कुटुंबापर्यंत आणि कुटुंबापासून समाजापर्यंत आनंद व स्नेह वृद्धिंगत करणे, हेच या आनंदपर्वाचे खरे वैशिष्ट्य आहे. – मोहन दाते,पंचांगकर्ते
Check Also
मतािधकाराचा बळी नको!
देशातील 31 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (एसआयआर) प्रक्रियेतून तब्बल 13 कोटी …
पांचजन्य वृत्तपत्र