दहशतवाद्यांना खतपाणी घालून आणि पोसून त्यांना शेजारील देशांविरुद्ध हत्यार म्हणून वापरणाऱ्या पाकिस्तानसाठी आता हेच हत्यार सर्वात मोठा भस्मासूर ठरत आहे. हिंसक दहशतवादामुळे आज पाकिस्तानची अंतर्गत सुरक्षा, कोलमडलेली अर्थव्यवस्था आणि सामाजिक स्थैर्य धोक्यात आले आहे. याच मालिकेतील अलिकडच्या घटनेत, पाकिस्तानच्या कोहाट जिल्ह्यात शुक्रवारी जुम्माच्या नमाजादरम्यान दहशतवाद्यांनी प्रथम एका मशिदीजवळ स्फोटकांनी भरलेल्या वाहनाचा भीषण स्फोट घडवून आणला आणि त्यानंतर लागलीच जवळच असलेल्या पोलीस ठाण्यावर हल्ला चढवला. या रक्तरंजित हल्ल्यात किमान एकवीस जणांचा मृत्यू झाला असून शंभरहून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. मृत पावलेल्यांमध्ये बहुतांश पोलीस कर्मचाऱ्यांचाच समावेश आहे. दहशतवादी संघटनांना जन्म देणाऱ्या, त्यांना राजाश्रय देऊन आणि आर्थिक बळ पुरवून त्यांची मुळे मजबूत करणाऱ्या पाकिस्तानला या गोष्टीची जराही जाणीव नव्हती का, की एके दिवशी हाच दहशतवाद उलटून स्वतःवरच प्रहार करेल? तिथल्या राज्यकर्त्यांनी आणि लष्कराने स्वतःच्या संकुचित राजकीय फायद्यासाठी ज्या छुप्या व कपटी धोरणांचा आश्र्य घेतला, त्याचा भीषण परिणाम आज तिथल्या निष्पाप सर्वसामान्य जनतेला भोगावा लागत आहे.
पाकिस्तानमधील दहशतवादी हिंसाचाराची ही भीषण परिस्थिती काही अचानक निर्माण झालेली नाही. तिथल्या धोरणांमध्ये दहशतवादी संघटनांमध्ये भेदभाव करण्याची वृत्ती आणि मानसिकता वर्षानुवर्षेउघडपणे दिसत आली आहे. पाकिस्तानने भारत किंवा अफगाणिस्तानविरुद्ध ज्या दहशतवादी संघटनांना उभे केले, त्यांना सोयीस्करपणे दहशतवादाच्या व्याख्येतून बाहेर ठेवण्यात आले. याउलट, ज्या गटांनी तिथल्या सत्तेच्या ठरवलेल्या चौकटीविरुद्ध जाऊन नवीन संघटना स्थापन केल्या, त्यांनाच फक्त देशाच्या सुरक्षेसाठी धोका मानले गेले.
कोहाटमधील मशिदीजवळील हल्ल्याची जबाबदारी ज्या संघटनेने स्वीकारली आहे, तिची स्थापना गेल्या वर्षीच्या एप्रिलमध्येच झाली होती. यावरून पाकिस्तानच्या भूमीवर नवीन दहशतवादी गट सातत्याने तयार होत असल्याचे स्पष्टपणे सिद्ध होते. आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर पाकिस्तान नेहमीच स्वतःला दहशतवादाचा बळी म्हणून मांडत आला आहे. मात्र, जोपर्यंत तो स्वतःच्या सोयीनुसार दहशतवादाचे ’चांगला’ आणि ’वाईट’ असे विभाजन करत राहील, तोपर्यंत या महाभयंकर संकटातून त्याची मुक्तता होणे अशक्य आहे, हे कटू सत्य त्याला स्वीकारावेच लागेल. दहशतवादासारख्या जागतिक संकटाविरुद्ध एकत्र येताना कोणत्याही देशाने दुटप्पी भूमिका न घेता ठोस आणि प्रामाणिक धोरण स्वीकारणे गरजेचे आहे. पाकिस्तान असो वा अमेरिकेसारखी महासत्ता, स्वतःच्या स्वार्थासाठी नियम आणि धोरणे बदलण्याची प्रवृत्ती ही शेवटी जागतिक शांतता आणि स्थैर्यासाठी घातकच ठरते.- श्रीकांत देवळे
Check Also
‘युपीआय’ ला शुल्कचौकट
ऑनलाईन बँकिंगच्या सुरुवातीच्या काळात आरटीजीएस, एनईएफटीद्वारे पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात ट्रान्स्फर करण्यासाठी शुल्कआकारणी केली …
पांचजन्य वृत्तपत्र