चित्रपटसृष्टीत भव्यदिव्य सेट, तगडी स्टारकास्ट आणि कोट्यवधींचा बजेट म्हणजेच सिनेमा हिट होण्याचे सूत्र, असा एक समज वर्षानुवर्षेचालत आला आहे. मात्र, आशयघन कथा आणि सशक्त अभिनय यांच्या जोरावर अल्प बजेटमध्ये तयार झालेले चित्रपटही बॉक्स ऑफिसवर चमत्कार घडवू शकतात, हे ‘हनुमान अंश’ या चित्रपटाने सिद्ध करून दाखवले आहे. 7 ऑगस्ट रोजी अत्यंत शांततेत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने सुरुवातीच्या दिवसांत धीम्या गतीने सुरुवात केली असली, तरी अवघ्या काही आठवड्यांतच बॉक्स ऑफिसवरील कमाईचे सर्व गणित बदलून टाकले आहे.
केवळ दोन कोटी रुपयांच्या अत्यंत तुटपुंज्या बजेटमध्ये साकारलेला हा चित्रपट आता तब्बल 200 कोटी रुपयांच्या निव्वळ कमाईच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी अवघी दहा लाखांची कमाई करणाऱ्या या चित्रपटाला पहिल्या आठवड्यात जेमतेम एक कोटीचा टप्पा ओलांडता आला होता. दुसऱ्या आठवड्यात तर सिनेमागृहांतील शो कमी झाले आणि कमाई चाळीस लाखांवर आली. मात्र, प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळताच तिसऱ्या आठवड्यापासून चित्रपटाच्या कमाईचा आलेख वेगाने उंचावला. तिसऱ्या आठवड्यात 10.40 कोटी, चौथ्या आठवड्यात 61 कोटी, तर पाचव्या आठवड्यात थेट 90.25 कोटींची घसघशीत कमाई या चित्रपटाने केली.
चित्रपटाच्या प्रदर्शनाला 37 दिवस उलटून गेल्यानंतरही प्रेक्षकांचा प्रतिसाद कमी झालेला नाही. 37 व्या दिवशी 7 हजार 449 शोच्या माध्यमातून या चित्रपटाने एकाच दिवसात 18.50 कोटींचा व्यवसाय केला. चित्रपटाचे एकूण ग्रॉस कलेक्शन 227 कोटींवर पोहोचले असून, परदेशातील बाजारातही या चित्रपटाने 9.50 कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर या चित्रपटाचा एकूण गल्ला 236.50 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
विशाल चतुर्वेदी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट आध्यात्मिक गुरू नीम करौली बाबा यांच्या जीवनप्रवासावर आधारित आहे. लक्ष्मण दास यांचा नीम करौली बाबा बनण्यापर्यंतचा प्रवास यामध्ये अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. शोभिनव सत्या यांनी यामध्ये नीम करौली बाबांची मध्यवर्ती भूमिका साकारली असून, चंदन के आनंद, पूर्णिमा तिवारी आणि अनिल रस्तोगी यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडल्या आहेत. निर्मात्यांसाठी हा चित्रपट अत्यंत फायदेशीर ठरला असून, सिनेरसिकांमध्ये याची तुफान चर्चा सुरू आहे.- राधिका बिवलकर
Check Also
अल्लू अर्जुनचा ट्रिपल रोल
दक्षिणेचा सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि प्रसिद्ध दिग्दर्शक एटली यांच्या आगामी ‘राका’ या चित्रपटाची सध्या सिनेविश्वात …
पांचजन्य वृत्तपत्र