लेख-समिक्षण

भुवयांची ठेवण हवी चेहऱ्याच्या आकारानुसार

चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी भुवयांचा आकार अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतो. भुवयांना दिलेला योग्य आकार चेहऱ्यावरील हावभाव अधिक स्पष्ट करतो. तज्ज्ञांच्या मते, जर आपण चेहऱ्याच्या रचनेनुसार भुवयांचा आकार निवडला, तर त्यामुळे चेहरा अधिक स्वच्छ आणि उठावदार दिसण्यास मदत होते. मात्र, चुकीचा आकार निवडला गेला, तर संपूर्ण लूक बिघडू शकतो. ब्यूटी एक्स्पर्ट पूजा गोयल यांनी विविध फेसकटनुसार भुवयांचे कोणते प्रकार उठावदार दिसतात, यावर मार्गदर्शन केले आहे.
ज्या महिलांचा चेहरा गोल आकाराचा असतो, त्यांचा चेहरा थोडा लांब दिसण्यासाठी भुवयांना ‌’हाय आर्च‌’ म्हणजेच उंच वळण असणे गरजेचे असते. मऊ आणि हलकी वक्रता असलेल्या लांब भुवया अशा चेहऱ्याला संतुलित लूक देतात. ज्यांचा चेहरा चौकोनी म्हणजेच स्क्वेअर शेप असतो, त्यांची जबड्याची रेषा थोडी स्पष्ट आणि कपाळ रुंद असते. अशा महिलांनी सॉफ्ट आर्च किंवा हलकी वक्रता असलेल्या भुवया ठेवाव्यात, जेणेकरून चेहऱ्याचा कडकपणा कमी होईल. त्यांनी कधीही अगदी फ्लॅट किंवा बॉक्सी आकार निवडू नये, कारण त्यामुळे जबड्याची रेषा अधिक टोकदार दिसू लागते.
ओव्हल किंवा अंडाकृती चेहरा हा सर्वात नैसर्गिकरित्या संतुलित मानला जातो. अशा आकाराच्या चेहऱ्यावर भुवयांचा कोणताही आकार शोभून दिसतो, तरीही नैसर्गिक लूकसाठी हलका आर्च किंवा मऊ वळण असलेल्या भुवया उत्तम ठरतात. ज्यांचा चेहरा लांबट आहे, त्यांनी चेहरा रुंद दिसावा यासाठी भुवयांची लांबी थोडी जास्त ठेवावी. अशा चेहऱ्यावर भुवयांचे वळण कमी असावे आणि लांबीवर जास्त भर द्यावा, ज्यामुळे चेहऱ्याची लांबी कमी भासते. हार्ट शेप फेस असलेल्या महिलांचे कपाळ रुंद आणि हनुवटी टोकदार असते. हे संतुलन साधण्यासाठी भुवयांचा आकार गोल असावा आणि थ्रेडिंग करताना कपाळाची रुंदी संतुलित दिसेल असा प्रयत्न करावा. ज्यांचा चेहरा डायमंड आकाराचा असतो, त्यांचे गाल सर्वात रुंद असतात. अशा चेहऱ्यावर वक्र किंवा गोल आकाराच्या भुवया अधिक सुंदर दिसतात. अशा महिलांनी कधीही भुवयांना खूप जास्त टोकदार किंवा शार्प आर्च देऊ नये, कारण त्यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य झाकोळले जाऊ शकते.

Check Also

‌‘ब्ल्यू इकॉनॉमी‌’तील कारकिर्द

वैद्यकीय शिक्षण, जैवतंत्रज्ञान, कृषीशास्त्र किंवा पर्यावरणशास्त्र हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना परिचित असतात. मात्र, गेल्या काही वर्षांत …