लेख-समिक्षण

‌‘ब्ल्यू इकॉनॉमी‌’तील कारकिर्द

वैद्यकीय शिक्षण, जैवतंत्रज्ञान, कृषीशास्त्र किंवा पर्यावरणशास्त्र हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना परिचित असतात. मात्र, गेल्या काही वर्षांत वेगाने महत्त्व प्राप्त करणारे मत्स्यशास्त्र हे क्षेत्र अनेकांच्या दृष्टीने अजूनही अपरिचित आहे. भारताला लाभलेला सुमारे 7,500 किलोमीटरचा समुद्रकिनारा, नद्या, तलाव, धरणे आणि वाढती मत्स्यउत्पादनाची गरज यामुळे मत्स्यव्यवसाय हा देशाच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा घटक ठरला आहे. नीती आयोगाच्या माहितीनुसार, भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मत्स्यउत्पादक देश असून देशातील सुमारे 3 कोटी नागरिकांची उपजीविका या क्षेत्रावर अवलंबून आहे. त्यामुळे ‌‘ब्ल्यू इकॉनॉमी‌’च्या विकासात मत्स्यशास्त्राची भूमिका अधिक महत्त्वाची बनत आहे.
मत्स्यशास्त्र म्हणजे केवळ मासेमारीचा अभ्यास नव्हे. जलचर सजीवांचे जीवशास्त्र, मत्स्यसंवर्धन, प्रजनन, जलसंपत्तीचे व्यवस्थापन, मत्स्यपालन, सागरी परिसंस्था, मत्स्यरोग नियंत्रण, अन्नप्रक्रिया आणि तंत्रज्ञान अशा अनेक विषयांचा या शाखेत समावेश होतो. जीवशास्त्र, पर्यावरणशास्त्र, आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन यांचा संगम असलेले हे बहुआयामी क्षेत्र आहे. शाश्वत पद्धतीने मत्स्यउत्पादन वाढविणे आणि जलसंपत्तीचे संवर्धन करणे हा या शाखेचा मुख्य उद्देश आहे.
या क्षेत्रातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारा विभाग म्हणजे मत्स्यपालन. नियंत्रित वातावरणात मासे, कोळंबी आणि इतर जलचरांचे संगोपन करून उत्पादन वाढविण्याचे तंत्र विद्यार्थ्यांना शिकवले जाते. जैवफ्लॉकसारख्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे कमी पाण्यात अधिक उत्पादन घेणे शक्य होत आहे. मत्स्यपालनात पाण्याची गुणवत्ता, योग्य खाद्यव्यवस्था, रोगप्रतिबंधक उपाय आणि उत्पादन व्यवस्थापन यांना विशेष महत्त्व दिले जाते.
मत्स्यशास्त्राचा दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे जलचर जैवविविधतेचे संवर्धन. विविध माशांच्या प्रजाती, त्यांचे अधिवास, प्रजनन आणि पर्यावरणातील त्यांचे महत्त्व यांचा अभ्यास करून संकटग्रस्त प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी संशोधन केले जाते. याशिवाय मत्स्य प्रक्रिया आणि सागरी अन्नतंत्रज्ञान या शाखेत मासे सुरक्षित पद्धतीने साठवणे, प्रक्रिया करणे, दर्जा तपासणे तसेच मूल्यवर्धित उत्पादने विकसित करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. गोठवलेले मासे, मासळीपासून तयार होणारे स्नॅक्स, मासे तेल आणि तत्काळ शिजवता येणारी उत्पादने ही या क्षेत्रातील काही उदाहरणे आहेत.
बारावीनंतर विज्ञान शाखेतील विद्यार्थी बी.एफ.एस्सी. (बॅचलर ऑफ फिशरीज सायन्स) हा 4 वर्षांचा पदवी अभ्यासक्रम करू शकतात. या अभ्यासक्रमात मत्स्यजीवशास्त्र, मत्स्यपालन, मत्स्यपोषण, जलचरांचे आरोग्य, मत्स्यव्यवस्थापन आणि सागरी अन्नतंत्रज्ञान यांसारखे विषय शिकवले जातात. त्यानंतर एम.एफ.एस्सी. (मास्टर ऑफ फिशरीज सायन्स) पदवीद्वारे मत्स्यपालन, मत्स्य आनुवंशिकी, मत्स्यसंपदा व्यवस्थापन, सागरी जीवशास्त्र आणि जलचर आरोग्य व्यवस्थापन अशा विशेष शाखांमध्ये उच्च शिक्षण घेता येते. याशिवाय मत्स्यपालन, मत्स्यबीज निर्मिती, शोभेच्या माशांचे संगोपन आणि सागरी अन्नप्रक्रिया यांसारख्या विषयांतील अल्पकालीन पदविका अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत.
देशातील अनेक नामांकित संस्थांमध्ये मत्स्यशास्त्राचे शिक्षण दिले जाते. त्यामध्ये आयसीएआर-केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था, मुंबई, केरळ मत्स्य व महासागर अध्ययन विद्यापीठ, तामिळनाडू डॉ. जे. जयललिता मत्स्य विद्यापीठ तसेच कर्नाटक पशुवैद्यकीय, पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ या संस्थांचा समावेश होतो.
मत्स्यशास्त्रातील पदवीधरांसाठी करिअरच्या संधीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. मत्स्य अधिकारी, मत्स्यपालन तज्ज्ञ, सागरी अन्नतंत्रज्ञ, सागरी जीवशास्त्रज्ञ, संशोधक, गुणवत्ता नियंत्रण अधिकारी तसेच मत्स्य प्रक्रिया उद्योगांमध्ये तज्ज्ञ म्हणून काम करता येते. याशिवाय स्वतःचा मत्स्यपालन व्यवसाय, कोळंबी शेती, मत्स्यबीज निर्मिती, शोभेच्या माशांचे संगोपन किंवा मत्स्य सल्लागार म्हणूनही उद्योजकतेच्या संधी उपलब्ध आहेत.

Check Also

उद्योजक बनणाऱ्या तरुणांसाठी…

स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न अनेक तरुण पाहतात. मात्र, कल्पना असणे आणि ती यशस्वी उद्योगात …