भाजपच्या राजकारणातील ‘नॅरेटिव्ह कंट्रोल’ला धक्का बसण्यामागे केवळ प्रचारयंत्रणेची कमजोरी हे कारण नाही. प्रचार आणि प्रत्यक्ष वास्तव यांच्यात वाढत गेलेली दरी हे त्यामागचे अधिक महत्त्वाचे कारण आहे. एखाद्या राजकीय पक्षाचे संदेश, घोषणा आणि समाजमाध्यमांवरील मोहिमा तेव्हाच प्रभावी ठरतात, जेव्हा त्या जनतेच्या अनुभवांशी सुसंगत असतात. प्रत्यक्ष आयुष्यातील अनुभव मात्र वेगळे असतील, तर कोणतेही प्रभावी प्रचारतंत्र फार काळ जनमताला आपल्या बाजूने वळवू शकत नाही. भाजपच्या प्रचारयंत्रणेत बदल करण्याच्या हालचाली याच संदर्भात पाहाव्या लागतील. माहिती-तंत्रज्ञान विभागाच्या नेतृत्वात बदल करून नव्या पिढीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. समाजमाध्यमांवर अधिक सक्रिय होणे, तरुणांच्या भाषेत संवाद साधणे आणि नव्या व्यासपीठांचा वापर वाढवणे हे त्याचे भाग असू शकतात. मात्र, केवळ व्यासपीठ बदलल्याने राजकीय संदेश अधिक परिणामकारक ठरत नाही. तरुणांच्या प्रश्नांना भिडणारे उत्तर नसेल, तर आकर्षक आशयही फार काळ प्रभाव निर्माण करू शकत नाही. विशेषतः नव्या पिढीसमोर रोजगार, शिक्षण, कौशल्यविकास, महागाई, सार्वजनिक सुविधा आणि भविष्यातील सुरक्षितता यांसारखे प्रश्न अधिक ठळकपणे उभे आहेत. शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांपासून तरुण नोकरदारांपर्यंत अनेकांना त्यांच्या दैनंदिन अनुभवातून व्यवस्थेतील त्रुटी जाणवत आहेत. समाजमाध्यमांमुळे या अनुभवांची देवाणघेवाणही क्षणार्धात होते. त्यामुळे केवळ धार्मिक किंवा भावनिक मुद्द्यांभोवती उभे केलेले राजकीय कथानक पूर्वीइतके सहज स्वीकारले जाईलच असे नाही. याचा अर्थ प्रचाराचे महत्त्व संपले आहे असे नाही. उलट, आजच्या राजकारणात माहिती आणि संवादाचे महत्त्व अधिक वाढले आहे. मात्र, प्रचाराला धोरणांची साथ असणे आवश्यक आहे. रस्ते, शिक्षण, आरोग्य, रोजगार, प्रशासनातील पारदर्शकता आणि भ्रष्टाचारावरील नियंत्रण यांसारख्या विषयांवर सरकारची कामगिरी समाधानकारक असेल, तर त्याचे प्रतिबिंब प्रचारातही उमटते. म्हणूनच भाजपसमोरील खरी आव्हानात्मक लढाई प्रचारयंत्रणेची पुनर्रचना करण्याची नसून, प्रचार आणि वास्तव यांच्यातील अंतर कमी करण्याची आहे. नव्या पिढीचे मन जिंकण्यासाठी नवे घोषवाक्य नव्हे, तर विश्वास निर्माण करणारे काम आवश्यक आहे. आशयाशिवाय प्रचार कितीही प्रभावी केला, तरी तो दीर्घकाळ टिकत नाही. राजकीय कथानकाला बळ देणारा खरा आधार शेवटी जनतेच्या अनुभवातूनच तयार होतो.– जगदीश काळे
Check Also
पीडितेला न्याय कधी?
भारतीय कुस्ती महासंघाराचे माजी अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार बृजभूषण शरण सिंह यांना …
पांचजन्य वृत्तपत्र