लेख-समिक्षण

अंधश्रद्धेचा अंधार

एकविसाव्या शतकात विज्ञान आणि तंत्रज्ञानाने मानवी जीवन आमूलाग्र बदलले असतानाही अंधश्रद्धेची मुळे समाजाच्या मनात खोलवर रुजलेली आहेत. अमरावतीतील डोमा येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थिनींमध्ये भूतबाधेची अफवा पसरून शेकडो विद्यार्थ्यांनी वसतिगृह सोडणे, ही केवळ एका आश्रमशाळेतील घटना म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही. भीती, अफवा आणि अज्ञान यांचा संगम झाला की सुशिक्षित समाजही तर्काचा आधार सोडून अंधविश्वासाच्या आहारी जाऊ शकतो, याचे हे अस्वस्थ करणारे उदाहरण आहे. त्यामुळे अशा घटनांकडे केवळ करमणुकीचा किंवा अंधश्रद्धेचा विषय म्हणून न पाहता, त्यामागील मानसिक, सामाजिक आणि शैक्षणिक कारणांचा शोध घेणे आवश्यक आहे.
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील डोमा येथील शासकीय आश्रमशाळेत घडलेली घटना ही केवळ एका वसतिगृहातील भीतीची कथा नाही, तर ती आपल्या अंधारात चाचपडणाऱ्या सुशिक्षित समाजाचा आरसा आहे. रात्रीच्या वेळी घुंगरांचे आवाज ऐकू येणे, काही विद्यार्थिनींनी अस्वाभाविकपणे हसणे – रडणे आणि त्यानंतर भूतबाधेच्या अफवेने वसतिगृहातील 810 पैकी 608 विद्यार्थ्यांनी तिथून पळ काढणे, ही घटना एकविसाव्या शतकात, तंत्रज्ञानाच्या शिखरावर असलेल्या जगात घडते आहे, यावर विश्वास बसणे कठीण जावे. परंतु, ही घटना केवळ एका दुर्गम आणि आदिवासी भागापुरती मर्यादित आहे असे मानून हात झटकणे ही स्वतःचीच फसवणूक ठरेल. कारण अंधश्रद्धेचे मूळ हे भौगोलिक दुर्गमतेत नसून माणसाच्या मानसिक रचनेत आणि अज्ञानात आहे. आरोग्य यंत्रणा आणि मानसोपचार तज्ज्ञांनी केलेल्या तपासणीत ही घटना मास हिस्टेरिया आणि तीव्र मानसिक ताणाचे फलित असल्याचे स्पष्ट झाले आहे. जेव्हा एखादी व्यक्ती, विशेषतः लहान मुले किंवा किशोरावस्थेतील मुली तीव्र मानसिक दबावाखाली असतात, तेव्हा भीतीची भावना एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे वाऱ्यासारखी पसरते.
डोमा आश्रमशाळेत नेमके हेच घडले. चार मुलींच्या अस्वाभाविक वर्तनाने निर्माण झालेली भीतीची ठिणगी संपूर्ण वसतिगृहात पसरली आणि त्याला भूत-खेतांच्या कल्पित कहाण्यांचे इंधन मिळाले. झाड तोडल्यामुळे संतप्त झालेले आत्मे, मंदिराचे भंग पावलेले पावित्र्य किंवा मृत तरुणाचा भटकणारा आत्मा या सर्व स्थानिक लोककथा आणि अफवांनी या भीतीला खतपाणी घातले. अज्ञाताची भीती निर्माण झाली की, माणूस तर्काचा त्याग करतो आणि आपल्याला अत्यंत सोपे वाटतील असे जादुई अथवा आपल्या सोयीचे नियम व उतारे किंवा उपाय शोधू लागतो. अज्ञान म्हणजे केवळ माहितीची कमतरता नसते; तर ते एक असे अज्ञात जाळे आहे, जे माणूस स्वतःभोवती विणतो आणि शेवटी स्वतःच त्यात अडकून पडतो. काळे मांजर आडवे जाणे हा अपशकुन मानण्यापासून ते भूत उतरवण्यासाठी अमानुष मारहाण करणे येथपर्यंत आणि एखाद्या गंभीर आजाराच्या रूणावर उपचार करण्याऐवजी त्याचे आजारपण घालवण्यासाठी त्याला चटके देण्यापर्यंतच्या व अगदी पैशाचा पाऊस पाडण्यापर्यंतच्या प्रथा व त्यावर ठेवला जाणारा विश्वास या अज्ञानातूनच जन्माला येतो आणि मग अशाच अज्ञानी व्यक्तींच्या समूहाद्वारे त्याला तिखट मसाला लावून त्याचे मार्केटींग केले जाते. परंतु, सर्वात चिंतेची बाब म्हणजे केवळ अशिक्षितच नव्हे, तर अतिबुद्धिमान आणि उच्चशिक्षित लोकही या जाळ्यात तितक्याच सहजतेने अडकतात. वास्तविक हुशार व्यक्ती त्यांच्यापेक्षा कमी बुद्धिमत्तेच्या लोकांपेक्षा फारशा वेगळ्या नसतात, फरक एवढाच असतो की, त्या आपल्या अंधश्रद्धांचे समर्थन करण्यासाठी अधिक चतुर आणि तार्किक वाटणारे युक्तिवाद करत असतात. त्याकरता अवजड आणि वजनदार शब्दांचा वापर करून समोरच्यावर आपल्या कथित विद्वत्तेची छापही सोडण्याचा ते प्रयत्न करतात आणि दुर्दैवाने बऱ्याचदा त्यांचे हे प्रयत्न यशस्वी होतात आणि या शहाण्यांच्या मागे इतर जणही वेडे होण्यासाठी रांग लावतात. वैज्ञानिक प्रगती आणि उच्च बुद्धिमत्ताही माणसाच्या मूलभूत भावनिक गरजा व त्यातून उपजणारे अज्ञान नष्ट करू शकत नाही हे वास्तव वारंवार अधोरेखित होते.
आयुष्यात अचानक जेव्हा एखाद्या मोठ्या संकटाचा किंवा अनिश्चिततेचा सामना करावा लागतो, भयाने पछाडले जाते तेव्हा तार्किक विचार बाजूला पडतात आणि माणूस अत्यंत आचरट, भंपक आणि ज्याला निरर्थक म्हणता येते अशा गोष्टींचा आश्रय घेतो किंबहुना अशा गोष्टींनाच शरण जात लोटांगण घालतो. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील दरी अत्यंत पुसट असते. श्रद्धा असणे वाईट नाही. एखादा शास्त्रज्ञ अथवा नामवंत शल्य चिकित्सक अनुक्रमे त्यांच्या नव्या प्रयोगाच्या अथवा शल्य चिकित्सेच्या अगोदर ईश्वराची करूण भाकतो येथपर्यंत ठीक. अर्थात त्यांनीही तसे करू नये कारण तो त्यांच्या विज्ञानाधिष्ठीत शिक्षणाचा एकप्रकारे उपहासच असतो असे बरेच टीकाकार सांगतात. पण तरीही त्यांची श्रद्धा म्हणून ते मान्य केले जाऊ शकते. तथापि, ही उच्चविद्याविभूषित मंडळी आपल्या अत्यंत महत्त्वाच्या मोहिमेपूर्वी अथवा ऑपरेशनपूर्वी अंगठ्या – गंडेदोऱ्यांवर आणि बाबा-बुवांवर विश्वास ठेवू लागले की मग सगळे बिघडते.
डोमा आश्रमशाळेतील घटनेनंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी आणि नंतर काही लोकप्रतिनिधींनी तिथे जाऊन विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले, ही स्वागतार्ह बाब आहे. परंतु, अशा घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा, मुळात अशा अफवांना खतपाणी मिळणार नाही अशी सामाजिक आणि शैक्षणिक व्यवस्था निर्माण करणे ही काळाची गरज आहे. डोमा आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी वसतिगृहात परतणे ही अज्ञानाकडून पुन्हा प्रकाशाकडे जाणाऱ्या प्रवासाची चाचणी ठरावी.-प्रसाद पाटील

Check Also

तंत्रज्ञान कपन्यांना दणका

डिजिटल तंत्रज्ञानाच्या या युगात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. व्हॉट्सॲपवरील …