लेख-समिक्षण

पर्यावरणपूरक यशोगाथा

दरवर्षी टिश्यू पेपर, स्वयंपाकघरातील कागदी पुसणी आणि इतर कागदी वस्तूंच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर झाडांची तोड केली जाते. वाढते प्रदूषण आणि नैसर्गिक साधनसंपत्तीवरील ताण लक्षात घेता पर्यावरणाला कमी हानी पोहोचवणारे पर्याय शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. याच विचारातून 2019 मध्ये अलय पटेल आणि अनिरुद्ध शर्मा या दोन मित्रांनी ‌‘बेको‌’ या उद्योगाची स्थापना केली. त्यांचे उद्दिष्ट केवळ नवा उद्योग उभारणे नव्हते, तर दैनंदिन वापरातील प्लास्टिक आणि झाडांपासून तयार होणाऱ्या वस्तूंना शाश्वत पर्याय उपलब्ध करून देणे हे होते. त्यांनी सुरुवात बांबूपासून तयार केलेल्या टिश्यू पेपरच्या निर्मितीने केली. बांबूची वाढ झाडांच्या तुलनेत अत्यंत वेगाने होते. तसेच त्याची लागवड आणि पुनर्निर्मिती सोपी असल्याने तो पर्यावरणपूरक कच्चा माल मानला जातो. त्यामुळे या उत्पादनाला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
यशाची ही वाटचाल पुढे नेत ‌‘बेको‌’ने स्वयंपाकघरातील कागदी पुसणी, प्रसाधनगृहासाठी वापरले जाणारे कागदी गुंडाळे, कचऱ्याच्या पिशव्या, जैवविघटनशील पिशव्या, पर्यावरणपूरक स्वच्छताद्रव्ये, भांडी धुण्याचे द्रव आणि घरगुती स्वच्छतेसाठी लागणाऱ्या विविध वस्तू अशा अनेक विभागांमध्ये विस्तार केला. प्रत्येक उत्पादन तयार करताना पर्यावरणावरील परिणाम कमीत-कमी राहील, याला प्राधान्य देण्यात आले.
अवघ्या काही वर्षांत ‌‘बेको‌’ने भारतातील शाश्वत ग्राहक उत्पादनांच्या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये कंपनीने 111 कोटींची वार्षिक उलाढाल नोंदवली. पर्यावरणपूरक उत्पादनांची वाढती मागणी आणि नावीन्यपूर्ण दृष्टिकोन यांच्या जोरावर ‌‘बेको‌’ ही हरित उद्योगविश्वातील वेगाने पुढे जाणारी भारतीय कंपनी म्हणून उदयास आली आहे. योग्य कल्पना, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि पर्यावरणाबद्दलची बांधिलकी यांच्या बळावर उद्योग आणि निसर्ग यांचा समतोल साधता येतो, याचे ‌‘बेको‌’ हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.

Check Also

वाळवंटातील महादीर्घायुषी वनस्पती

जगातील काही झाडे दिसायला विचित्र असतात, तर काही त्यांच्या अनोख्या गुणधर्मांमुळे उठून दिसतात. वनस्पतीच्या जगात …