लेख-समिक्षण

‌‘शेरेटिंग‌’चा मोह टाळाच !

सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आनंदाचे क्षण जगासोबत शेअर करणे ही आता एक सामान्य बाब बनली आहे. विशेषतः पालकांसाठी आपल्या मुलाचे पहिले पाऊल, शाळेचा पहिला दिवस किंवा त्याचे गोड हसू फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर पोस्ट करणे अभिमानास्पद वाटते. मात्र, या ‌‘शेरेटिंग‌’ (शेअरिंग + पेरेंटिंग) मुळे नकळतपणे तुम्ही तुमच्या मुलाच्या सुरक्षिततेला आणि गोपनीयतेला धोक्यात आणत आहात.
1. खासगी माहिती आणि सुरक्षिततेचा प्रश्न
सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमधून गुन्हेगार तुमच्या मुलाची महत्त्वाची माहिती सहज मिळवू शकतात. मुलाच्या शाळेचा गणवेश, घराचा क्रमांक किंवा आसपासचा परिसर यावरून त्यांच्या वास्तव्याचा ठावठिकाणा शोधणे सोपे होते. अशा प्रकारे तुमची एक साधी पोस्ट गुन्हेगारांना मुलाचे लोकेशन ट्रॅक करण्यास मदत करू शकते.
2.‌’डिजिटल किडनॅपिंग‌’ आणि गैरवापर
मुलांच्या फोटोंचा वापर करून बनावट प्रोफाईल तयार करणे किंवा ‌’डिजिटल किडनॅपिंग‌’ करणे हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. काही अनोळखी व्यक्ती तुमच्या मुलाचे फोटो स्वतःचे असल्याचे भासवून पोस्ट करतात. इतकेच नव्हे तर, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) मदतीने या फोटोंमध्ये फेरफार करून त्यांचा डार्क वेबसारख्या घातक ठिकाणी गैरवापर होण्याचा धोका असतो.
3. मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम
सतत ऑनलाइन मिळणारे ‌’लाईक्स‌’ आणि ‌’कमेंट्स‌’ मुलांच्या मानसिक विकासावर परिणाम करू शकतात. मुले स्वतःचे मूल्य बाह्य जगाच्या प्रतिसादावरून ठरवू लागतात. प्रत्येक वेळी ‌’कॅमेरा रेडी‌’ राहण्याच्या दबावामुळे त्यांचे नैसर्गिक बालपण हरवून जाते, ज्याचा परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर होतो.
4. लैंगिक शोषणाचे सावट
मुलांचे निरागस फोटो चोरून ते अलील संकेतस्थळांवर टाकले जाण्याची भीती असते. आजकाल एआय टूल्सच्या माध्यमातून सामान्य फोटोंचे विद्रुपीकरण करणे सोपे झाले आहे. अंघोळ करतानाचे किंवा कमी कपड्यांमधील फोटो डार्क वेबवर शेअर होण्याचे प्रमाण वाढत असून, भविष्यात याचा वापर मुलांना ब्लॅकमेल करण्यासाठी केला जाऊ शकतो.
5. ओळख चोरी (आइडेंटिटी थेफ्ट) ः फोटोंच्या माध्यमातून मुलाचे नाव, जन्म तारीख, शाळा आणि पत्ता अशी महत्त्वाची माहिती उघड होते. गुन्हेगार या माहितीचा वापर करून भविष्यात मुलाच्या नावे कर्ज घेणे किंवा क्रेडिट कार्ड फ्रॉड करणे असे आर्थिक गुन्हे करू शकतात. एका अंदाजानुसार, 2030 सालापर्यंत ओळख चोरीचे अनेक गुन्हे हे थेट ‌’शैरेंटिंग‌’शी संबंधित असतील.
एकूणच, ‌’शैरेंटिंग‌’ ही संकल्पना वरवर पाहता केवळ कौतुक वाटत असली, तरी त्यामागे दडलेले धोके अत्यंत गंभीर आणि दूरगामी परिणाम करणारे आहेत. तुमची आजची एक सावधगिरीची कृती उद्याच्या धोक्यांना रोखण्यासाठी ढाल ठरू शकते, त्यामुळे ‌’लाईक्स‌’पेक्षा तुमच्या मुलाचे सुरक्षित स्मित हास्य अधिक मौल्यवान मानणे केव्हाही श्र्ेयस्कर ठरेल.

Check Also

संकट आले की पळू नका, स्वतःला अपग्रेड करा!

आयुष्याचा सर्वात कठीण प्रश्न कोणता असेल, तर तो बहुधा असा – जेव्हा सगळे काही चुकीचे …