लेख-समिक्षण

इंडोनेशियातील हिंदू मंदिराचा जीर्णोद्धार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांनी बुधवारी इंडोनेशियातील योग्याकार्ता येथे असलेल्या जगप्रसिद्ध प्रम्बानन मंदिर परिसराच्या संवर्धन आणि जीर्णोद्धार प्रकल्पाचा संयुक्तपणे शुभारंभ केला. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट असलेले हे मंदिर परिसर इंडोनेशियातील सर्वात मोठे हिंदू मंदिर आहे. भगवान शिवाला समर्पित असलेले हे 10व्या शतकातील ऐतिहासिक वारसा स्थळ भारत-इंडोनेशियाच्या सामायिक सांस्कृतिक संबंधांचे महत्त्वपूर्ण प्रतीक मानले जाते.
या प्रकल्पाच्या शुभारंभाच्या प्रसंगी पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपल्या जीवनात वारंवार भगवान शिवाशी संबंधित पवित्र स्थळांची सेवा आणि संवर्धन करण्याची संधी मिळणे हे आपले भाग्य आहे. माझा जन्म गुजरातमधील वडनगर येथे झाला, जिथे हाटकेश्वर महादेवाचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. द्वादश ज्योतिर्लिंगापैकी पहिले सोमनाथ मंदिरही गुजरातमध्ये असून त्याच्या विकासात प्रत्यक्ष जबाबदारी पार पाडण्याची संधी त्यांना मिळाली. त्यांनी सांगितले की, माझ्या राजकीय जीवनाचे केंद्रही काशी विश्वनाथ राहिले आहे, जिथे बाबा विश्वनाथांचा आशीर्वाद त्यांना सातत्याने मिळत राहिला आहे.
पंतप्रधान म्हणाले की, केदारनाथ धामच्या पुनर्निमार्णानंतर आणि उज्जैन येथील महाकालच्या विकासानंतर आता जवळपास 1000 ते 1200 वर्षे जुन्या ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याशी संबंधित या महान सांस्कृतिक वारशाच्या पुनरुज्जीवन कार्याचा शुभारंभ करणे ही त्यांच्यासाठी अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. त्यांनी सांगितले की, या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचे सौभाग्य मिळाल्याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो. इंडोनेशिया दौऱ्यात मला येथील हवा आणि जनजीवनात भारतीय संस्कृतीचा तोच सुगंध जाणवत आहे, जो भारताच्या भूमीवर अनुभवायला मिळतो. त्यांनी या वारशाचे जवळपास 1200 वर्षे जतन केल्याबद्दल इंडोनेशियाच्या जनतेचे आणि वेगवेगळ्या कालखंडात येथे शासन करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
त्यांनी सांगितले की, जगाच्या कोणत्याही भागात गेल्यास भारताच्या सांस्कृतिक वारशाची झलक नक्कीच दिसून येते. प्रम्बानन मंदिर हे दक्षिण-पूर्व आशियातील भारतीय सांस्कृतिक वारशाच्या सर्वात महत्त्वपूर्ण ओळखींमधील एक आहे. मंदिर परिसरात भगवान शिव, माता दुर्गा आणि भगवान गणेश यांच्या मूर्ती स्थापित आहेत तसेच शतकानुशतके येथे श्रद्धेने पूजा-अर्चना होत आली आहे. मग ते ल्हासापासून कैलास मानसरोवरची यात्रा असो किंवा इंडोनेशियातील पवित्र प्रम्बानन मंदिर असो, प्रत्येक ठिकाणी महामृत्युंजय मंत्र आणि ‌‘ॐ नम: शिवाय‌’चा उच्चार ऐकायला मिळतो. त्यांनी सांगितले की, हे दृश्य अत्यंत भावनिक करणारे होते. जागतिक वारसा स्थळ म्हणून या भव्य मंदिर परिसराच्या पुनरुज्जीवनानंतर मोठ्या संख्येने भारतीय श्रद्धाळू आणि पर्यटक येथे दर्शनासाठी येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, त्यांना स्वत: या मंदिरात दर्शन आणि पूजा करण्याचे सौभाग्य मिळाले, ज्याला त्यांनी आपल्या जीवनातील अत्यंत चैतन्यपूर्ण आणि अविस्मरणीय क्षण असल्याचे म्हटले. त्यांनी परमेश्वराकडे भारत आणि इंडोनेशियाच्या मैत्रीला अधिक दृढ करण्यासाठी, दोन्ही देशांतील नागरिकांच्या कल्याणासाठी आणि दोन्ही देशांच्या वेगवान विकासासाठी प्रार्थना केली. त्यांनी विश्वास व्यक्त केला की, वर्ष 2029 पूर्वी या पुनरुज्जीवन प्रकल्पाचे काम पूर्ण होईल आणि हे पूर्ण झाल्यानंतर मी पुन्हा एकदा प्रम्बानन मंदिराच्या दर्शनासाठी नक्की येईल.

Check Also

शुध्दीकरण मोहीमेचा धडाका

महाराष्ट्रात अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफडीए) पदावर तुकाराम मुंडे यांची नियुक्ती झाल्यापासून राज्यातील भेसळखोरीच्या साम्राज्याला …