शिकण्याला वयाचे कोणतेही बंधन नसते, हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो. इंदूरच्या सुषमा प्रदीप मोघे यांनी हे वाक्य प्रत्यक्षात उतरवत नकारात्मक विचार करणाऱ्यांपुढे आदर्श उभा केला आहे. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी संपादित केलेले यश देशभरातील तरुण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. एका सेवानिवृत्त शिक्षिकेने आपल्या जिद्दीच्या जोरावर एम. ए. मराठी साहित्य या पदव्युत्तर अभ्यासक्रमात थेट विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावला आणि सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. इंदूरच्या देवी अहिल्या विश्वविद्यालयाच्या पदवीदान समारंभात त्यांना हा बहुमान मिळाला, तेव्हा संपूर्ण सभागृहाने उभे राहून त्यांच्या जिद्दीला सलाम केला.
तब्बल चार दशके शिक्षिका म्हणून ज्ञानदानाचे पवित्र कार्य केल्यानंतर, सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य त्या अत्यंत शांततेत आणि सुखात घालवू शकल्या असत्या. मात्र, आपल्या मातृभाषेविषयी, म्हणजेच मराठी साहित्याविषयी असलेले त्यांचे प्रेम आणि ओढ त्यांना शांत बसू देईना. याच काळात विद्यापीठाने प्रवेशासाठीची कमाल वयोमर्यादा काढून टाकण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या सुवर्णसंधीचा फायदा घेत सुषमा यांनी थेट महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यांची अभ्यासातील चिकाटी आणि समर्पण वाखाणण्याजोगे होते. आजच्या संगणकीय युगात आणि वयाच्या या टप्प्यावर तीन तास सलग लिहिणे हे एक मोठे आव्हान होते. यावर मात करण्यासाठी त्यांनी परीक्षेपूर्वी दररोज दोन तास लिहिण्याचा सराव केला, जेणेकरून मुख्य परीक्षेत तीन तासांचा मोठा पेपर लिहित असताना कोणताही त्रास होणार नाही. या परिश्र्माचे फळ त्यांना सुवर्णपदकाच्या रूपाने मिळाले.
मध्य प्रदेशच्या राज्यपालांच्या हस्ते जेव्हा त्यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात आले, तो क्षण उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. विशेष म्हणजे, सुषमा मोघे यांच्याकडे आधीपासूनच रसायनशास्त्रातील एम. एस्स’ ही पदवी आणि संगीतातील एक पदवी आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावरही त्या थांबलेल्या नाहीत; तर आजही त्या विविध साहित्याचे मराठीत भाषांतर करून साहित्य विश्वात आपले अमूल्य योगदान देत आहेत.
Check Also
स्मार्टफोनच्या साथीने बनला कोट्यधीश
जिद्द, योग्य कल्पना आणि बदलत्या काळाची अचूक ओळख असेल तर यशासाठी मोठ्या भांडवलाची गरज नसते, …
पांचजन्य वृत्तपत्र