लेख-समिक्षण

आमिषाबाईंचे टीकास्र

बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलने सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्याच्या पिढीतील अभिनेत्रींवर आणि त्यांच्या प्रसिद्धी मिळवण्याच्या पद्धतींवर सडकून टीका केली आहे. अमिषाच्या मते, वर्षाला केवळ दोन साधारण चित्रपट केल्याने कोणीही सुपरस्टार होत नाही. तिने नमूद केले की, अनेक अभिनेत्री स्वतःकडे एकही एकल ब्लॉकबस्टर चित्रपट नसताना केवळ प्रसिद्धी माध्यमांचा (पीआर) वापर करून स्वतःला मोठे स्टार म्हणून मिरवत आहेत.
अमिषाने ‌‘एक्स‌’वर पोस्ट करत स्पष्ट केले की, जोपर्यंत एखादा कलाकार बॉक्स ऑफिसवर इतिहास घडवणारी कामगिरी करत नाही, तोपर्यंत त्याने स्वतःला सुपरस्टार म्हणवून घेऊ नये. आजच्या काळात 100 कोटींची कमाई करणे ही मोठी गोष्ट राहिलेली नाही, असेही तिने म्हटले आहे. ज्या अभिनेत्रींचे चित्रपट 200 कोटींचा आकडाही पार करू शकत नाहीत, त्या केवळ पीआर टीमला पैसे देऊन स्वतःला प्रथम क्रमांकाच्या अभिनेत्री असल्याचे भासवतात, असा टोला तिने लगावला.
स्वतःच्या कारकीर्दीचा दाखला देताना अमिषा म्हणाली की, ‌‘कहो ना प्यार है‌’, ‌‘गदर‌’ आणि ‌‘गदर 2‌’ सारखे ऐतिहासिक ब्लॉकबस्टर चित्रपट दिल्यानंतरही ती प्रसिद्धीच्या झगमगाटासाठी कृत्रिम साधनांचा वापर करत नाही. केवळ चित्रीकरण स्थळांवर उपस्थित राहणे किंवा सरासरी चित्रपट करणे म्हणजे सुपरस्टार होणे नव्हे, तर जागतिक स्तरावर मोठे हिट चित्रपट देणे ही खरी ओळख असल्याचे तिने ठामपणे मांडले आहे.- जगदीश काळे

Check Also

‌‘गोलमाल 5‌’ च्या चित्रीकरणाला उटीमध्ये सुरुवात

हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी विनोदी फ्रँचायझींपैकी एक असलेल्या ‌‘गोलमाल‌’चा पाचवा भाग सध्या चर्चेत आहे. अभिनेता …