अँड्रॉइड फोन गेल्या दोन दशकांपासून आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनले आहेत. मात्र, तंत्रज्ञान कितीही पुढारले असले तरी, सुरुवातीच्या काळातील काही चुकीच्या सवयी आणि गैरसमज आजही वापरकर्त्यांमध्ये कायम आहेत. संगणकाप्रमाणे फोन वापरण्याच्या नादात आपण नकळतपणे आपल्या महागड्या उपकरणाचे आणि वैयक्तिक माहितीचे नुकसान करत असतो.
टास्क किलर ॲप्सचा अनावश्यक वापर
अनेक वापरकर्त्यांना असे वाटते की पार्श्वभूमीवर (बॅकग्राउंड) सुरू असलेले ॲप्स वारंवार बंद केल्याने फोनचा वेग वाढतो आणि बॅटरी वाचते. मात्र, हे पूर्णपणे चुकीचे आहे. अँड्रॉइडची रचना अशा प्रकारे केली आहे की ते रॅम आणि संसाधनांचे व्यवस्थापन आपोआप करते. जेव्हा तुम्ही एखादे ॲप जबरदस्तीने बंद (फोर्स क्लोज) करता, तेव्हा ते पुन्हा उघडताना फोनला अधिक ऊर्जा आणि प्रक्रिया खर्च करावी लागते. यामुळे बॅटरी लवकर संपते. जर एखादे ॲप हँग झाले असेल तरच ते बंद करणे योग्य ठरते, अन्यथा ऑपरेटिंग सिस्टिमला तिचे काम करू देणेच हिताचे असते.
अनोळखी स्त्रोतांकडून ॲप्स डाऊनलोड करणे
अँड्रॉइडमध्ये ‘साईडलोडिंग’ म्हणजेच अधिकृत प्ले स्टोअरबाहेरून ॲप्स घेण्याची सुविधा असली, तरी ती धोक्याची ठरू शकते. गुगल प्ले प्रोटेक्ट अशा ॲप्समधील त्रुटी शोधण्याचा प्रयत्न करते, परंतु इंटरनेटवरील कोणत्याही रँडम वेबसाईटवरून डाऊनलोड केलेले एपीके फाईल्स मालवेअरने युक्त असू शकतात. जर तुम्हाला अधिकृत स्टोअरबाहेरून ॲप घ्यायचेच असेल, तर केवळ एपीके मिरर सारख्या विश्वासार्ह स्त्रोतांचाच वापर करावा.
सुरक्षा अपडेटस्कडे दुर्लक्ष करण्याची चूक
वापरकर्तेअनेकदा अँड्रॉइडच्या मोठ्या आवृत्तीच्या (उदा. 16 कडून 17 कडे) अपडेटची वाट पाहतात, परंतु छोट्या ‘सिक्युरिटी पॅचेस’कडे दुर्लक्ष करतात. हे सुरक्षा अपडेटस् सॉफ्टवेअरमधील त्रुटी आणि हॅकिंगच्या धोक्यांना रोखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. जुन्या फोनमध्ये असे अपडेटस् येणे बंद होते, म्हणूनच अशा फोनचा वापर टाळण्याचा सल्ला दिला जातो. कंटाळवाणे वाटले तरी हे अपडेटस् त्वरित इन्स्टॉल करणे फोनच्या दीर्घायुष्यासाठी गरजेचे आहे.
विचार न करता परवानग्या देणे
नवीन ॲप इन्स्टॉल करताना आपण घाईघाईने लोकेशन, कॉन्टॅक्ट्स आणि कॅमेऱ्याच्या परवानग्या (परमिशन्स) देऊन टाकतो. अनेकदा ॲपच्या कामाशी या परवानग्यांचा कोणताही संबंध नसतो. उदाहरणार्थ, एखाद्या साध्या टॉर्च ॲपला तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टची गरज का असावी? प्रत्येक परवानगी देण्यापूर्वी ती त्या ॲपसाठी आवश्यक आहे का, याचा विचार करणे आवश्यक आहे. अनेक ॲप्स मर्यादित परवानग्यांसह देखील उत्तम काम करू शकतात.
सार्वजनिक ठिकाणच्या यूएसबी पोर्टचा वापर
विमानतळ किंवा कॉफी शॉपमध्ये फोन चार्ज करण्यासाठी उपलब्ध असलेले सार्वजनिक यूएसबी पोर्ट ‘ज्यूस जॅकिंग’चा धोका निर्माण करू शकतात. यूएसबी केबल केवळ वीजच नाही तर डेटा देखील वाहून नेते. अशा वेळी एखाद्या हॅक केलेल्या पोर्टमधून तुमच्या फोनमधील खाजगी माहिती चोरली जाऊ शकते किंवा त्यात व्हायरस सोडला जाऊ शकतो. सुरक्षिततेसाठी स्वतःचा चार्जर वापरून इलेक्ट्रिक सॉकेटमधूनच चार्जिंग करणे किंवा केवळ वीजपुरवठा करणारे डेटा ब्लॉकर्स वापरणे श्र्ेयस्कर ठरते.
Check Also
नकारात्मकतेवर विजय मिळवण्याचा राजमार्ग
मानवी जीवनात चढ-उतार हे येतच असतात आणि अशा वेळी मनाची शांतता भंग पावून नकारात्मक विचारांचे …
पांचजन्य वृत्तपत्र