लेख-समिक्षण

अंतरीच्या जिद्दीने गाठले यशाचे शिखर

वाराणसीच्या मातीतील एका सामान्य ट्रक चालकाच्या कन्येने आज आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. 17 वर्षांच्या रंजना यादवची ही कथा केवळ एका खेळाडूची यशोगाथा नसून, ती एका मुलीने आपल्या दिवंगत आईला दिलेल्या वचनाची आणि वडिलांच्या कष्टाला दिलेल्या उत्तराची साक्ष आहे.
ऑक्टोबर 2025 मध्ये बहरीन येथे झालेल्या आशियाई युवा ॲथलेटिक्स स्पर्धेत रंजनाने 5,000 मीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकले. या यशाचे रहस्य सांगताना ती भावूक होते. शर्यतीच्या शेवटच्या टप्प्यात जेव्हा तिची शक्ती क्षीण होत होती, तेव्हा तिला आपल्या आईच्या शब्दांची आठवण झाली. ‌’स्वतःवर विश्वास ठेव‌’ हा आईचा मंत्र तिला नवी उभारी देऊन गेला. जुलै 2024 मध्ये कर्करोगाशी झुंज देणाऱ्या आईचे निधन झाले, परंतु रंजनाने त्या दुःखालाच आपली ताकद बनवले.
रंजनाचे वडील राजकुमार यादव हे आजही कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी आणि कर्ज फेडण्यासाठी ट्रक चालवतात. महिनाकाठी 15 ते 20 हजार रुपये मिळवण्यासाठी त्यांना रात्रंदिवस रस्ते तुडवावे लागतात. आपल्या वडिलांना या कष्टाच्या विळख्यातून बाहेर काढणे, हेच रंजनाचे प्रमुख ध्येय आहे. भोपाळच्या मध्य प्रदेश राज्य ॲथलेटिक्स अकादमीत प्रशिक्षक शिव कुमार प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली ती आता जागतिक स्तरावरील स्पर्धांसाठी सज्ज होत आहे.
आगामी हाँगकाँग येथील आशियाई कनिष्ठ स्पर्धा आणि अमेरिकेतील जागतिक 20 वर्षांखालील अजिंक्यपद स्पर्धेत रंजनाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. तिची मानसिक प्रबळता आणि जिद्द पाहता, ती या स्पर्धांमध्येही भारताची मान उंचावेल, असा विश्वास क्रीडा विश्वात व्यक्त होत आहे.
एका छोट्या गावातून सुरू झालेली ही ‌’रेसवॉकिंग‌’ची वाटचाल आता सुवर्णपदक नक्कीच पटकावेल असे वाटत नाही काय?

Check Also

जिद्दीच्या बळावर यशाला गवसणी

तमिळनाडूतील एका सर्वसामान्य तरुणानं सुरुवातीला 25 हजार रुपयांची नोकरी नाकारून अवघ्या 10 हजार रुपयांची इंटर्नशिप …