आजच्या डिजिटल युगात, जिथे रिल्स आणि शॉर्ट व्हिडिओंची सरबत्ती सतत सुरू असते, तिथे दोन तासांहून अधिक काळ मूक चित्रपट पाहणे म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध जाण्यासारखे आहे. किशोर पांडुरंग बेळेकर दिग्दर्शित ‘गांधी टॉक्स’ हा असाच एक धाडसी प्रयोग आहे, जो मौनालाच आपली भाषा बनवतो आणि संवादहीनतेला शक्तिशाली कथनाचे साधन म्हणून वापरतो. हा चित्रपट केवळ निव्वळ मनोरंजन नाही, तर तो एक असा अनुभव आहे जो आपल्याला आपल्याच अंतर्मनात घेऊन जातो आणि आपल्या जगण्याच्या पद्धतीवर मूलभूत प्रश्नचिन्ह उभे करतो.
– विकास परसराम मेश्राम
मुंबई हे स्वप्नांचे शहर म्हणून ओळखले जाते, पण त्याचबरोबर ते अहोरात्र संघर्षाचे शहरही आहे. लोकल ट्रेनचा कर्कश आवाज, वाहनांचे हॉर्न, बांधकामाची सतत होणारी खटपट आणि लाखो लोकांच्या महत्त्वाकांक्षांचा गजबज यामुळे हे शहर कधीच थांबत नाही किंवा विसावत नाही. पण ’गांधी टॉक्स’ या गोंगाटातून शांततेचे काही क्षण शोधतो आणि त्यातूनच आपली कथा सांगतो. दिग्दर्शकाची नजर मुंबईवर अत्यंत प्रेमळ आहे आणि कॅमेरा थेट चाळींच्या अरुंद गल्ल्यांमध्ये, समुद्रकिनाऱ्यावर, रस्त्यावरच्या चहाच्या टपऱ्यांवर आणि गगनचुंबी इमारतींच्या सावलीत थांबतो. हे शहर विरोधाभासांनी भरलेले आहे. एका बाजूला चकाकणारे टोलेजंग टॉवर्स आहेत, तर दुसऱ्या बाजूला झोपडपट्ट्यांची गर्दी आहे. श्र्ीमंती आणि गरिबी इतक्या जवळ राहतात की त्यांच्यातली भिंत जवळजवळ अदृश्य वाटते, तरीही ती भिंत इतकी मजबूत आहे की दोन जगांतले लोक एकमेकांना रोज पाहतात पण कधीच भेटत नाहीत. मुंबई या चित्रपटात केवळ एक पार्श्वभूमी नाही, तर ती एक महत्त्वाचे पात्र आहे. समुद्राच्या लाटांसारखी ती सर्वांना आपल्या छातीशी धरते – मग ते कष्टाळू मजूर असोत, स्वप्न पाहणारे तरुण असोत किंवा निराश झालेले कलाकार असोत.
विजय सेतुपतीने साकारलेला महादेव हा एक सामान्य माणूस आहे, पण त्याच्या साधेपणातच त्याची असामान्यता दडलेली आहे. चाळीत आपल्या आजारी आईसोबत राहणारा आणि बेरोजगारीशी झगडणारा हा युवक माणुसकी कधीच गमावत नाही. रोज सकाळी उठून कामाच्या शोधात भटकणे, नाकारले जाणे आणि आर्थिक अडचणींशी दोन हात करणे हा त्याचा नित्यक्रम आहे. पण यातही तो आपली मानवता जपतो आणि हीच त्याची सर्वात मोठी ताकद ठरते.
चित्रपटातील एक प्रसंग जिथे तो चोरी करायला गेल्यावर आपल्या चपला घराबाहेर काढतो, तो अत्यंत बोलका आहे. हे दृश्य दोन गोष्टी स्पष्टपणे अधोरेखित करते. पहिली म्हणजे, मध्यमवर्गीय मूल्यसंस्कार इतक्या खोलवर रुजलेले असतात की अनैतिक कृत्यातही त्याची झलक दिसते. दुसरी गोष्ट म्हणजे, गरिबी माणसाला चोरीला भाग पाडू शकते, पण त्याचे संस्कार सहजासहजी हिरावून घेऊ शकत नाही. आजारी आईजवळ डोके ठेवून झोपलेला महादेव हे दृश्य हृदयद्रावक आहे. एक प्रौढ माणूस जो बाहेरच्या जगाशी लढा देतो, पण आईच्या कुशीत येताच पुन्हा लहान मूल बनतो.
अरविंद स्वामीने साकारलेला मोहन बोसमन हा महादेवच्या अगदी विरुद्ध टोकाचा माणूस आहे. एक प्रसिद्ध बिल्डर, संपन्न कुटुंब, प्रतिष्ठा आणि सत्ता यांचे प्रतीक असलेला हा माणूस जीवनाच्या शिखरावर आहे. पण आयुष्य कधी कधी एका क्षणात उलथापालथ करून टाकते. अपघातात पत्नी आणि मुलीचा मृत्यू होणे ही त्याच्या दुःखाची केवळ सुरुवात असते. त्यानंतर आईचे निधन, कायदेशीर अडचणी आणि व्यवसायातील अडथळे त्याच्या जीवनाचा पायाच कोलमडून टाकतात.
एकेकाळी ज्याचा शब्द कायदा होता, तो आता असहाय्य आणि एकाकी आहे. पैसा त्याच्याजवळ अमाप आहे पण समाधान नाही; सुविधा आहेत पण सुख नाही. लोक त्याच्याभोवती गराडा घालून आहेत, पण मनाच्या जवळचे कोणीही नाही. बोसमनचे पतन पाहणे अत्यंत वेदनादायक आहे, कारण तो मूळतः दुष्ट नाही. तो फक्त असा एक माणूस आहे ज्याला नियतीने मोठे धक्के दिले आहेत. अरविंद स्वामीने त्याच्या डोळ्यांतील शून्यपणा आणि हालचालींमधील थकवा अत्यंत संयमाने व्यक्त केला आहे.
महादेव आणि बोसमन हे दोन वेगवेगळ्या विश्वातील माणसे आहेत. एकाजवळ काहीच नाही, तर दुसऱ्याजवळ सर्व काही आहे. पण दोघांनाही एका वळणावर जाणवते की आयुष्य केवळ पैशावर चालत नाही. महादेवला जगण्यासाठी पैसा हवा आहे, तर बोसमनकडे पैसा असूनही जगण्याचे ठोस कारण उरलेले नाही. जेव्हा त्यांच्या वाटा एकमेकांना छेदतात, तेव्हा समजते की दुःख हे वैश्विक आहे. ते श्र्ीमंतांना सोडत नाही आणि गरिबांनाही नाही. फरक फक्त एवढाच की दोघेही वेगवेगळ्या कारणांसाठी तुटलेले असतात आणि दोघांनाही जीवनाचा खरा अर्थ शोधायचा असतो.
‘पैसा बोलतो’ या संकल्पनेला ‘गांधी टॉक्स’ या शीर्षकातून विडंबनात्मक रूप देण्यात आले आहे. भारतीय चलनावरील महात्मा गांधींचा चेहरा जो सत्य, अहिंसा आणि साधेपणाचे प्रतीक आहे, तोच आज सत्ता, भ्रष्टाचार आणि आर्थिक विषमतेचे चिन्ह बनला आहे. ज्या गांधीजींनी सांगितले होते की पृथ्वीवर सर्वांच्या गरजा पूर्ण करायला पुरेसे साधन आहे पण एकाचीही लालसा पूर्ण करायला नाही, त्याच गांधीजींचा चेहरा आज पैशावर आहे. तो पैसाच आज ठरवतो की कोण मोठा आणि कोण लहान; कोणाला न्याय मिळणार आणि कोणाचे शोषण होणार. पण चित्रपट केवळ व्यंग करून थांबत नाही, तर एक आशाही दाखवतो. प्रामाणिकपणा, सहानुभूती आणि त्याग ही गांधीवादी तत्त्वे आजही लोकांमधे जिवंत आहेत, फक्त ती शोधण्याची आणि जोपासण्याची गरज आहे.
मौन आणि संगीताची जुगलबंदी
या चित्रपटाची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याचे ’मौन’. आजच्या काळात दोन तासांहून अधिक वेळ संवाद नसणे ही कल्पनाच भीतीदायक वाटते, पण हा चित्रपट सिद्ध करतो की शब्दांशिवायही कथा अत्यंत प्रभावीपणे सांगता येते. मौनातच कितीतरी गोष्टी लपलेल्या असतात. एक नजर, एक छोटेसे हसू किंवा एक अश्र्ू संपूर्ण कथानक उलगडून दाखवतात. ए. आर. रहमान यांचे संगीत या मौनाला जणू आवाज देते. संगीत केवळ पार्श्वभूमी म्हणून काम करत नाही, तर ते कथेचा अविभाज्य भाग बनते. प्रत्येक भावना संगीताच्या तालावर अधिक तीव्र होते.
हा चित्रपट केवळ वैयक्तिक कथा नाही, तर ते एक सामाजिक भाष्य आहे. भ्रष्ट पोलीस व्यवस्था, लाचलुचपत, गरिबी-श्र्ीमंतीमधील वाढती दरी आणि मध्यमवर्गीयांचा रोजचा संघर्ष यावर चित्रपट प्रकाश टाकतो. महादेवला नोकरी मिळत नाही कारण त्याच्याकडे वशिला नाही, तर बोसमन श्र्ीमंत असूनही कायदेशीर कचाट्यात अडकतो. पैसा हाच आजचा मापदंड बनला आहे आणि मानवी मूल्ये कुठवरी मागे पडली आहेत. चित्रपट असे सुचवतो की व्यवस्था बिघडलेली आहे आणि त्यात सुधारणा करणे आवश्यक आहे.
विजय सेतुपती या चित्रपटाचा प्राण आहेत. त्यांच्या अभिनयात एक प्रकारची सहजता आणि प्रामाणिकपणा आहे. महादेवचे पात्र त्यांनी इतके जिवंत केले आहे की तो पडद्यावरून उतरून आपल्या शेजारी बसल्याचा भास होतो. अरविंद स्वामी यांनी आपली भूमिका अत्यंत संयतपणे वठवली आहे. अदिती राव हैदरी, सिद्धार्थ जाधव, उषा नाडकर्णी आणि महेश मांजरेकर यांसारख्या दिग्गज कलाकारांनी चित्रपटाला अधिक उंचीवर नेऊन ठेवले आहे.
दिग्दर्शक किशोर बेळेकर यांनी भारतीय सिनेमाचे जनक दादासाहेब फाळके यांना या माध्यमातून एक प्रकारे मानवंदना दिली आहे. फाळकेंच्या काळातील मूक चित्रपटांची परंपरा या चित्रपटाने आधुनिक संदर्भात पुन्हा जिवंत केली आहे. चार्ली चॅप्लिन आणि बस्टर कीटन यांच्या चित्रपटांची आठवण करून देणारा हा चित्रपट भारतीय संदर्भात सत्यजित रे आणि कमल हासन यांच्या ’पुष्पक’ ची छाया दाखवतो, तरीही तो स्वतःची वेगळी ओळख जपतो.
‘गांधी टॉक्स’ हा चित्रपट म्हणजे केवळ कलाकृती नसून एक प्रकारचे ध्यान आहे. तो आपल्याला सांगतो की आपण किती गोंगाटात जगतो आहोत आणि आपल्याला शांततेची किती गरज आहे. मौन भीतीदायक वाटते कारण त्यात आपले स्वतःचे विचार ऐकू येतात आणि आपल्याला आपल्या आयुष्याचा आरसा दिसतो. हा चित्रपट मनाला शांत करतो आणि अंतर्मुख व्हायला लावतो. पैसा महत्त्वाचा असला तरी मानवी मूल्ये त्याहून अधिक श्र्ेष्ठ आहेत, हे यातून सिद्ध होते. शब्दांशिवाय सांगितलेली ही कथा आपल्या मनावर दीर्घकाळ रेंगाळत राहते आणि चित्रपटाची एक नवी भाषा आपल्याला शिकवून जाते
Check Also
कलाकारांचा आर्थिक संघर्ष
सिनेअभिनेते राजपाल यादव यांच्या आर्थिक संकटाची चर्चा अलीकडे बराच काळ चालली. न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही अनेकांनी …
पांचजन्य वृत्तपत्र