मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या 24 वर्षीय शुभम वाडकर या तरुणाने जागतिक फॅशन विश्वात केलेली कामगिरी केवळ कौतुकास्पद नाही, तर प्रेरणादायी आहे. सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी घेतल्यानंतर अवघ्या 30 हजार रुपये पगाराची नोकरी सोडून त्याने ’रॅम्प’वर पाऊल ठेवले आणि आज तो जागतिक ब्रँड्सचा चेहरा बनला आहे.
शुभमने सिव्हिल इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर एका बांधकाम कंपनीत नोकरी स्वीकारली होती, जिथे त्याला वार्षिक 3.6 लाख रुपये पगार मिळत असे. मात्र, कॉलेजमध्ये असताना सहज म्हणून सुरू केलेले मॉडेलिंग त्याला साद घालत होते, त्यामुळे अवघ्या सहा महिन्यांत नोकरीचा राजीनामा देऊन त्याने पूर्णवेळ मॉडेलिंगमध्ये उतरण्याचा धाडसी निर्णय घेतला.
2024 मध्ये शुभमने जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवला असून मिलानमधील प्रसिद्ध ’जॉर्जिओ अरमानी’ रॅम्पवर चालण्याची संधी मिळवणारा तो मोजक्या भारतीय मॉडेल्सपैकी एक ठरला आहे. त्याने आतापर्यंत अरमानीसाठी पाच वेळा रॅम्प वॉक केला असून, या ब्रँडच्या एका मोठ्या जाहिरात मोहिमेतही तो चमकला आहे. सध्या तो मिलान आणि पॅरिस फॅशन वीकमधील एक अत्यंत व्यस्त आणि लोकप्रिय चेहरा बनला आहे.
शुभमच्या आर्थिक प्रगतीचा आलेख थक्क करणारा असून एकेकाळी महिन्याला 30 हजार रुपये कमावणारा हा तरुण आता एका दिवसाचे 5 लाख रुपयांहून अधिक मानधन घेतो. मोठ्या जाहिरात मोहिमांसाठी त्याला साधारण 5,000 ते 6,000 युरो इतके शुल्क मिळते.
शुभमने सोशल मीडियावर शेअर केलेला एक व्हिडिओ सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने आपले दोन विरुद्ध पैलू दाखवले आहेत, ज्यात एकीकडे तो हेल्मेट घालून बांधकाम साईटवर काम करताना दिसतो, तर दुसरीकडे झगमगत्या दिव्यांच्या प्रकाशात मिलानच्या रॅम्पवर चालताना दिसतो. या ‘ट्रान्सफॉर्मेशन’ व्हिडिओने लाखो तरुणांना आपल्या आवडीच्या क्षेत्राचा ध्यास घेण्याची प्रेरणा दिली आहे हे खरे नाही काय?
Check Also
दहावी शिकलेला तरुण बनला कोट्यधिश उद्योगपती
जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस शून्यातूनही विश्व निर्माण करू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे …
पांचजन्य वृत्तपत्र