दोन दशकांपूर्वी आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री रिमी सेन सध्या एका वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे. एकेकाळी बॉलिवूडमधील मोठ्या चित्रपटांचा भाग असलेली रिमी आता चंदेरी दुनियेपासून दूर असून तिने दुबईमध्ये रिअल इस्टेट एजंट म्हणून आपल्या नवीन करिअरची सुरुवात केली आहे.
रिमीच्या प्रवासाची सुरुवात सुपरस्टार आमिर खान याच्यासोबतच्या एका गाजलेल्या जाहिरातीतून झाली होती. या जाहिरातीने तिला रातोरात घराघरांत पोहोचवले. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये एकामागून एक हिट चित्रपटांची रांग लावली. हंगामा, धूम, गोलमाल आणि फिर हेरा फेरी यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमधील तिच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. अक्षय कुमार, अजय देवगण आणि अभिषेक बच्चन यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत काम करूनही रिमीने अचानक सिनेसृष्टीपासून अंतर राखले होते.
चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतल्यानंतर रिमीने आता आपला मोर्चा व्यवसायाकडे वळवला आहे. जागतिक स्तरावर रिअल इस्टेटसाठी प्रसिद्ध असलेल्या दुबई शहरात ती आता मालमत्ता सल्लागार म्हणून काम पाहत आहे. ग्लॅमरस विश्वातील झगमगाट सोडून तिने निवडलेल्या या नवीन वाटेमुळे तिचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. रिमीच्या मते, आयुष्यात नवीन आव्हाने स्वीकारणे आवश्यक असते आणि याच भूमिकेतून तिने या क्षेत्राची निवड केली आहे. – किर्ती कदम
Check Also
कलाकारांचा आर्थिक संघर्ष
सिनेअभिनेते राजपाल यादव यांच्या आर्थिक संकटाची चर्चा अलीकडे बराच काळ चालली. न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही अनेकांनी …
पांचजन्य वृत्तपत्र