लेख-समिक्षण

‌‘नाही‌’ म्हणण्याची ताकद मोठी!

साधारणपणे समाजात ‌’हो‌’ म्हणण्याला सकारात्मक आणि ‌‘नाही‌’ म्हणण्याला नकारात्मक मानले जाते. मात्र, जेव्हा विषय स्वतःच्या भविष्याचा आणि करिअरचा येतो, तेव्हा ‌‘नाही‌’ म्हणणे हे अधिक सकारात्मक आणि फलदायी ठरते. आयुष्यात आपल्याला काय करायचे आहे, यापेक्षा आपल्याला काय ‌‘करायचे नाही‌’ हे स्पष्ट असणे यशासाठी अत्यंत आवश्यक आहे. अनेकदा आपण केवळ आव्हाने स्वीकारण्याच्या नावाखाली किंवा कोणाला दुखावायचे नाही म्हणून चुकीच्या पर्यायांना ‌‘हो‌’ म्हणतो आणि आयुष्यभर त्यात अडकून पडतो. ऑक्सफर्डमध्ये झालेल्या एका संशोधनानुसार, जगात साठ टक्क्यांहून अधिक लोक असे काम करत आहेत जे त्यांना मुळीच आवडत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे योग्य वेळी ‌‘नाही‌’ म्हणण्याचे धाडस न दाखवणे. याउलट, जगातील नव्वद टक्के यशस्वी लोक तेच काम करत आहेत जे त्यांना मनापासून आवडते.
यशस्वी करिअरचा पाया हा ‌‘काय करायचे‌’ यावर नाही, तर ‌’काय टाळायचे‌’ यावर उभा असतो. ज्या दिवशी तुम्हाला हे समजते की मला अमुक गोष्ट करायची नाही, त्याच क्षणी तुमच्या समोरचे ध्येय अधिक स्पष्ट होते. करिअरमध्ये ‌‘हो‌’ म्हणणे सोपे असले तरी त्याचे होणारे नुकसान मोठे असू शकते. यशस्वी लोक प्रत्येक संधीवर उडी मारत नाहीत किंवा प्रत्येक सल्ल्‌‍याला आदेश मानत नाहीत. त्यांच्याकडे ‌‘फोकस‌’ आणि ‌’सेल्फ कंट्रोल‌’ म्हणजेच आत्मनियंत्रण असते. ‌’नाही‌’ म्हणणे हे अनेकांना असामाजिक वाटते, पण जर तुम्ही वेळेवर ‌‘नाही‌’ म्हटले नाही, तर भविष्यात आजारपण, अपयश किंवा पश्चात्तापाच्या रूपाने आयुष्य तुम्हाला ‌’नाही‌’ म्हणायला भाग पाडते.
खऱ्या यशासाठी स्वतःला प्रत्येक ठिकाणी सिद्ध करण्याची गरज नसते. लोकांच्या अपेक्षांचे ओझे वाहण्यापेक्षा आपली क्षमता तिथेच वापरा जिथे त्याची खरोखर गरज आहे. ‌’लोक काय म्हणतील‌’ या भीतीला जेव्हा तुम्ही तुमच्या निर्णयातून वजा करता, तेव्हा तुमचे निर्णय अधिक अचूक होऊ लागतात. योग्य गोष्टी निवडणे म्हणजे चुकीच्या गोष्टी सोडणे होय. चुकीच्या सवयी, चुकीचे मित्र आणि चुकीची दिशा सोडण्याचे धाडस ज्याच्याकडे असते, त्याच्यासाठी यशाचे दरवाजे आपोआप उघडतात. म्हणूनच, आजच एका कागदावर तुम्हाला कोणत्या गोष्टी मनापासून आवडत नाहीत आणि कोणत्या लोकांमुळे तुम्हाला अस्वस्थ वाटते, याची यादी बनवा आणि ठामपणे सांगा की, मी आता हे करणार नाही. हेच तुमच्या खऱ्या यशाचे पहिले पाऊल असेल.

Check Also

पांढऱ्या केसांवर तेलचिकित्सा

आजकाल कमी वयातच केस पांढरे होणे ही स्रियांमधील एक सामान्य समस्या बनली आहे. पूर्वी वय …