लेख-समिक्षण

नियमित अभ्यासच गरजेचा!

सध्या कॉलेज कॅम्पसमध्ये ‌‘एक्झाम फीव्हर‌’ची चर्चा रंगू लागली आहे. कारण परीक्षा आता जवळ येत आहेत. खरे पाहता परीक्षा ही भीती नसून केवळ स्वतःच्या अभ्यासाचे मूल्यमापन करण्याची पद्धत आहे. पण बहुतेक विद्यार्थी वर्षभर आजचा अभ्यास उद्यावर ढकलतात. परिणामी, परीक्षेच्या तोंडावर अभ्यासाचा डोंगर उभा राहतो. चांगली तयारी करण्यासाठी रोज सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी वेळापत्रक बनवून सर्व विषयांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. ज्या विषयात तुम्ही थोडे कच्चे आहात त्याला अधिक वेळ द्या आणि ज्या विषयांची तयारी चांगली आहे त्यांना तुलनेने कमी वेळ दिला तरी चालेल.
अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप
सर्वात आधी प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम नीट समजून घ्या आणि तो लिहून काढा. त्यानंतर शिक्षक, वरिष्ठ विद्यार्थी किंवा मित्रांच्या मदतीने मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका जमा करा. यामुळे परीक्षेत प्रश्न विचारण्याच्या पद्धतीची तुम्हाला चांगली ओळख होईल.
वर्ग आणि कोचिंगवर लक्ष केंद्रित करा
परीक्षेच्या काळात शाळेत किंवा कोचिंग क्लासेसमध्ये जे विशेष तास घेतले जातात, त्यांचा पुरेपूर लाभ घ्या. सर्व पिरीयड्स उपस्थित राहा, शिक्षकांच्या व्याख्यानांकडे पूर्ण लक्ष द्या आणि स्वतःला समजतील अशा पद्धतीचे नोट्स तयार करा. नोट्स अशा असाव्यात की नंतर त्या वाचल्यावर तुम्हाला संपूर्ण विषय पटकन आठवेल.
संयम आणि नीटनेटकेपणा
अभ्यासासाठी तुमचे मन शांत आणि संयमित असणे गरजेचे आहे. अभ्यासाची एक जागा निश्चित करा. विषयाशी संबंधित सर्व पुस्तके, वह्या, पेन, पेन्सिल आणि संदर्भ ग्रंथ सोबत घेऊनच अभ्यासाला बसा, जेणेकरून तुम्हाला वारंवार उठावे लागणार नाही.
संपूर्ण धडा वाचा
केवळ प्रश्नोत्तरे पाठ करण्यापेक्षा संपूर्ण धडा वाचण्यावर भर द्या. यामुळे जर एखादी गोष्ट विसरलात तरी विषयाचे आकलन झाल्यामुळे तुम्ही स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहू शकाल.
स्टीकी नोट्सची मदत
इतिहासातील महत्त्वाच्या सालावल्या, तारखा किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितातील सूत्रे विद्यार्थी वारंवार विसरतात. अशा गोष्टींसाठी स्टीकी नोट्स तयार करा आणि तुमच्या अभ्यासाच्या टेबलासमोर किंवा भिंतीवर चिकटवा. दिवसातून अनेकदा त्यावर नजर पडल्यामुळे त्या गोष्टी सहज लक्षात राहतील.
परीक्षेच्या वातावरणाचा सराव
वेळोवेळी एखाद्या विषयाचा पेपर घेऊन घरीच परीक्षेसारखे वातावरण निर्माण करा. पालकांकडून किंवा शिक्षकांकडून सराव प्रश्नपत्रिका काढून घ्या आणि खोली बंद करून, घड्याळ समोर ठेवून ती सोडवा. यामुळे वेळेचे नियोजन आणि लिहिण्याचा वेग वाढवण्यास मदत होईल.

Check Also

पांढऱ्या केसांवर तेलचिकित्सा

आजकाल कमी वयातच केस पांढरे होणे ही स्रियांमधील एक सामान्य समस्या बनली आहे. पूर्वी वय …