बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता गोविंदा याची पत्नी सुनीता आहुजा ही आपल्या बेधडक आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुनीतांनी आपल्या वैयक्तिक ओळखीबद्दल भाष्य करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. वयाच्या 55 व्या वर्षी आपण केवळ गोविंदाची पत्नी म्हणून नव्हे, तर सुनीता आहुजा म्हणून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करत असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले.
यावेळी त्यांनी राज्यसभेतील जया बच्चन यांच्या गाजलेल्या प्रकरणाचा दाखला दिला. संसदेत जेव्हा जया बच्चन यांचा उल्लेख जया अमिताभ बच्चन असा करण्यात आला होता, तेव्हा त्या संतापल्या होत्या. त्या घटनेचा संदर्भ देत सुनीता म्हणाल्या की, जयाजींनी संसदेत अगदी योग्य भूमिका मांडली होती. त्या जया भादुरी आहेत आणि त्या स्वतः एक दिग्गज अभिनेत्री आहेत. अमिताभजी त्यांच्यासोबत आहेतच, पण प्रत्येकाची स्वतःची एक ओळख असायला हवी.
‘मिस मालिनी’ यांच्याशी संवाद साधताना सुनीता पुढे म्हणाल्या की, आज 55 व्या वर्षी माझ्या नशिबात नाव, इज्जत आणि प्रसिद्धी मिळवणे लिहिले होते. मी गोविंदाची पत्नी आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे, पण वैयक्तिक पातळीवर मी जे नाव कमावले आहे, त्यामुळे आज लोक मला सुनीता आहुजा म्हणून ओळखतात. कधीकधी तर मी विसरून जाते की मी गोविंदाची पत्नी आहे! पती तर आहेच, पण स्वतःची ओळख असणेही तितकेच गरजेचे आहे.- जगदीश काळे
Check Also
गुप्तहेरपटांची कालातीत मोहिनी
बदलत्या राजकीय वास्तवासह, युद्धांच्या स्वरूपासह आणि तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीसह गुप्तहेरपटांचे रूप बदलत गेले; मात्र …
पांचजन्य वृत्तपत्र