बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक मीका सिंह आपल्या गाण्यांसोबतच सढळ हाताने केलेल्या मदतीसाठीही ओळखला जातो. सध्या उत्तर भारतात असलेल्या कडाक्याच्या थंडीत भटक्या कुत्र्यांचे हाल होत असल्याचे पाहून मीका सिंहने त्यांच्या कल्याणासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. मीकाने आपल्या मालकीची 10 एकर जमीन भटक्या कुत्र्यांच्या निवाऱ्यासाठी आणि त्यांच्या देखभालीसाठी दान करण्याचा संकल्प केला आहे.
देशभरात भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर आणि सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या चर्चेमुळे मोठे वादंग निर्माण झाले होते. कुत्र्यांच्या चावण्याच्या वाढत्या घटनांमुळे जनतेमध्ये रोष निर्माण झाला असला तरी नसबंदी लसीकरण आणि त्यानंतर त्यांना पुन्हा त्यांच्या मूळ परिसरात सोडणे हे शास्त्रीय दृष्टिकोनातून महत्त्वाचे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. स्थानिक प्रशासन सध्याच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरल्याचेही न्यायालयाने यावेळी नमूद केले.
मिका सिंहने ‘एक्स’अकाऊंटवर या संदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने भटक्या कुत्र्यांवरील संभाव्य न्यायालयीन कारवाईबद्दल चिंता व्यक्त केली आहे. मिकाने भारताच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाला नम्र विनंती केली की भटक्या कुत्र्यांच्या कल्याणावर विपरित परिणाम होईल असे कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी गांभीर्याने विचार करावा. प्राण्यांच्या हक्कांसाठी नेहमीच आवाज उठवणाऱ्या मिकाने या उदात्त कामासाठी पुढाकार घेतला आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की माझ्याकडे पुरेशी जमीन उपलब्ध असून कुत्र्यांची देखभाल निवारा आणि त्यांच्या कल्याणासाठी मी 10 एकर जमीन दान करण्यास पूर्णपणे तयार आहे. प्राण्यांचे आरोग्य सुरक्षा आणि त्यांच्या निवाऱ्यासाठी आवश्यक त्या सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी त्याने ही जमीन उपलब्ध करून दिली आहे. यासोबतच त्यांच्या देखभालीसाठी आवश्यक असलेल्या मनुष्यबळासाठीही त्याने आवाहन केले आहे.- किर्ती कदम
Check Also
कलाकारांचा आर्थिक संघर्ष
सिनेअभिनेते राजपाल यादव यांच्या आर्थिक संकटाची चर्चा अलीकडे बराच काळ चालली. न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही अनेकांनी …
पांचजन्य वृत्तपत्र