अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून 87 जागांच्या महापालिकेत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. निकालानुसार भाजपने सर्वाधिक 25 जागा जिंकत पहिल्या क्रमांकावर मजल मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी 11 जागांवर यश मिळवले आहे. अकोल्यात भाजप तर चंद्रपूर महापालिकेत काँग्रेस पहिल्या क्रमांकावर आहे.
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीत संपूर्ण राज्यात भाजपने वर्चस्व सिद्ध केले आहे. मुंबईत पहिल्यांदाच भाजपचा महापौर बनणार आहे. 25 वर्षांनंतर मुंबईतून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची सत्ता गेली आहे. पुण्यातही भाजपने एकहाती सत्ता मिळविली आहे, तर पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला सत्ता मिळाली असली तरी दोन्ही राट्रवादी काँग्रेसने दुसऱ्या क्रमांकाच्या तुल्यबळ जागा जिंकल्या आहेत. हे पाहता अमरावती शहरात भाजपला फारसे यश मिळालेले नाही.
अमरावती मनपामध्ये भाजपने 25 जागा जिंकल्या आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी 11 जागांवर विजय मिळवला असून हा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे. काँग्रेस 15 जागा जिंकल्या आहेत. शिवसेना तीन, राष्ट्रवादी (शरद पवार)ने तीन जागा, युवा स्वाभिमान पक्षाने तीन जागा जिंकल्या आहेत. एमआयएमने तीन जागांवर विजय मिळवत आपली उपस्थिती ठळकपणे दाखवून दिली आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे गट) ला एक जागा आणि बसपाने एक जागा जिंकत खाते उघडले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला या निवडणुकीत एकही जागा मिळवता आली नसल्याने चित्र अजून अस्पष्ट आहे.
या निकालामुळे अमरावती महापालिकेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली असून सत्ता स्थापन करण्यासाठी आघाड्या, युती आणि पाठिंब्याचे राजकारण रंगणार असल्याचे संकेत आहेत. महापौरपद कोणाच्या हाती जाणार, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. निवडणूक निकालानंतर विविध पक्षांच्या नेत्यांच्या बैठका सुरू झाल्या असून येत्या काही दिवसांत अमरावतीच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतमोजणीत भाजपने 102 जागा जिंकत महापालिकेवर पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केले आहे. एकूण 38 प्रभागांतील 151 जागांपैकी भाजप तब्बल 102 जागा आणि त्याचा मित्रपक्ष शिवसेना (शिंदे)ने दोन जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसने 34 जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) एक, शिवसेना (ठाकरे) एक, एमआयएमनेही चार आणि बसपाने तीन जागा जिंकल्या आहेत. या निकालांमुळे नागपूर महापालिकेत भाजपची सत्ता आली आहे. या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून नागपूरच्या राजकारणात भाजपची पकड आणखी मजबूत झाल्याचे चित्र आहे.
शिवसेनेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर या प्रभाग क्रमांक 199 मधून उमेदवार होत्या. त्यांच्या विरोधात शिंदेंच्या शिवसेनेच्या रुपल कुसळे उभ्या होत्या. मात्र त्यांचा पराभव झाला असून ठाकरेंच्या शिवसेनेतील किशोरी पेडणेकर विजयी झाल्या आहेत. प्रतिभा धंगेकर यांचा पराभव झाला असून सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर या विजयी झाल्या आहेत. प्रभाग क्रमांक 23 मध्ये 2 राष्ट्रवादी आणि 2 भाजप उमेदवार विजयी झाले आहेत. तुरुंगातून निवडणूक लढवून दोन्ही आंदेकर सासू-सून विजयी झाल्या आहेत.
Check Also
पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा
केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू …
पांचजन्य वृत्तपत्र