बॉलिवूडमध्ये आता केवळ ‘हिरो’ची चलती राहिलेली नाही. गेल्या काही वर्षांत चरित्र अभिनेत्यांचे (उहरॲरलींशॲ अॲींळीीीं) स्थान कमालीचे भक्कम झाले आहे. एकेकाळी नायकाच्या सावलीत वावरणारे हे कलाकार आता स्वतःच्या खांद्यावर चित्रपट पेलू लागले आहेत. परेश रावल, प्रकाश राज यांच्यापासून ते पंकज त्रिपाठी आणि मनोज बाजपेयींपर्यंतच्या कलाकारांनी हे सिद्ध केले आहे की, अभिनय सकस असेल तर पडद्यावरची ‘स्पेस’ महत्त्वाची नसते, तर भूमिकेची व्याप्ती महत्त्वाची असते.- सोनम परब
—————————————————–
भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळात पडद्यावर केवळ नायकाचेच वलय असायचे आणि इतर कलाकार केवळ त्याला साथ देण्यासाठी असायचे. मात्र, गेल्या काही वर्षांत ही समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. आज प्रेक्षक केवळ ग्लॅमरला नाही, तर अभिनयातील ताकदीला दाद देत आहेत. चित्रपटगृहे असोत वा ओटीटीचे व्यासपीठ, प्रेक्षकांची नजर आता केवळ मुख्य नायकावर खिळलेली नसते, तर कथेला खऱ्या अर्थाने जिवंत करणाऱ्या त्या ’चरित्र अभिनेत्यांच्या’ शोधात असते. ज्यांच्या नावावर चित्रपटाचे तिकीट विकले जात नसे, तेच कलाकार आज आपल्या अभिनयाच्या जोरावर संपूर्ण चित्रपट स्वतःच्या खांद्यावर पेलताना दिसत आहेत. बॉलिवूडमधील या बदलाने केवळ कलाकारांनाच नाही, तर कथेलाही अधिक वास्तववादी आणि प्रगल्भ बनवले आहे.
बॉलीवूडमध्ये चरित्र अभिनेत्यांचे स्थान गेल्या काही वर्षांत लक्षणीयरीत्या मजबूत झाले आहे. जुन्या काळातील चित्रपटांत लहान भूमिका साकारणारे अनेक चरित्र अभिनेते नायकांच्या तोडीस तोड उभे राहत असत. मात्र आज परिस्थिती बदललेली दिसते. आता हेच अभिनेते केवळ पूरक भूमिका न करता कथानकाच्या केंद्रस्थानी येताना दिसत आहेत. परेश रावल, प्रकाश राज, अक्षय खन्ना, गजराज राव, सौरभ शुक्ला हे नव्या काळातील प्रभावी चरित्र अभिनेते ठरले आहेत. या यादीत महानायक अमिताभ बच्चन, अभिनेता पंकज त्रिपाठी आणि अभिनेता मनोज बाजपेयी यांचाही समावेश करावा लागेल.
अलीकडे प्रदर्शित झालेल्या ‘छावा’, ‘हक’, ‘ताजमहल द ट्रू स्टोरी’, ‘तेरे इश्क में’, ‘धुरंधर’ अशा अनेक चित्रपटांच्या यशामुळे चरित्र अभिनेत्यांसाठी नव्या शक्यतांचे दरवाजे खुले झाले आहेत. ज्येष्ठ अभिनेता अनुपम खेर स्पष्टपणे सांगतात की आता तो काळ राहिलेला नाही, जेव्हा केवळ नायकालाच जास्त फुटेज दिले जात असे आणि चरित्र अभिनेत्यांना मर्यादित, वरवरच्या भूमिका करून समाधान मानावे लागत होते. आज चरित्र अभिनेते थेट मुख्य भूमिकेचा दावा करत आहेत आणि तो त्यांना मिळतही आहे. त्यामुळे या कलाकारांचे अस्तित्व आता केवळ सहाय्यक न राहता निर्णायक ठरत आहे.
जुन्या काळातील चित्रपटांकडे पाहिले, तर काही चरित्र अभिनेते प्रमुख नायक-नायिकांच्या बरोबरीने उभे असल्याचे दिसते. महानायक दिलीप कुमार यांच्यासोबत मोतीलाल आणि जॉनी वॉकर यांसारखे प्रभावी चरित्र अभिनेते सहजपणे लक्ष वेधून घेत. त्यानंतरच्या पिढ्यांमध्येही ही परंपरा कायम राहिली. आजही अनेक चरित्र अभिनेते मुख्य भूमिकेला थेट आव्हान देताना दिसतात आणि त्यात अनुभवी दिग्गज कलाकारांचा समावेश आहे.
नव्या काळात परेश रावल, प्रकाश राज, अक्षय खन्ना, गजराज राव हे काही चमत्कारिक करेक्टर आर्टिस्ट म्हणून पुढे आले आहेत. ‘धुरंधर’ या चित्रपटात अभिनेता अक्षय खन्ना यांची भूमिका विशेष चर्चेत आहे. अभिनेता प्रकाश राज यांनी ‘तेरे इश्क में’ या चित्रपटात केलेले अभिनयकौशल्य लक्षवेधी ठरले. ‘हक’ या चित्रपटात वडिलांच्या भूमिकेत अभिनेता दानिश हुसैन यांनी प्रभावी छाप सोडली.
महानायक अमिताभ बच्चन यांनी चरित्र भूमिकांच्या बाबतीत स्वतंत्र उंची निर्माण केली आहे. ‘कल्की’ या चित्रपटाच्या यशातून हे स्पष्ट होते. आता नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ या चित्रपटात ते जटायुच्या भूमिकेत दिसणार आहेत. वयाच्या या टप्प्यावरही आपल्या भूमिकेद्वारे संपूर्ण चित्रपटावर प्रभाव टाकण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनेता नाना पाटेकर, अभिनेता अनिल कपूर, अभिनेता जॅकी श्र्ॉफ आणि अभिनेता अक्षय कुमार हेही अशा आव्हानात्मक भूमिका स्वीकारताना दिसत आहेत. जवळपास साठच्या आसपास पोहोचलेले अभिनेता अक्षय कुमार यांनीही अलीकडील काही चित्रपटांत वेगळा मार्ग स्वीकारला असून ‘भूत बंगला’ या चित्रपटातून ते हा बदल अधोरेखित करताना दिसतील.
अभिनेता पंकज त्रिपाठी हे काही वर्षांपूर्वी अचानक प्रकाशझोतात आले. त्यांनी करेक्टर रोल्समधूनच आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. प्रकाश झा यांच्या ‘अपहरण’ या चित्रपटात ते केवळ पार्श्वभूमीत दिसत होते. मात्र आज त्यांना महत्त्वाच्या आणि सशक्त भूमिका मिळत आहेत.
अभिनेता नाना पाटेकर यांनी कायमच नायकाच्या चौकटीपेक्षा दमदार चरित्र भूमिका पसंत केल्या. ‘अंकुश’, ‘व्हॅक्सिन वॉर’, ‘इट्स माय लाइफ’ आणि ‘वनवास’ हे चित्रपट त्यांच्या अभिनयसमृद्धीची साक्ष देतात. लवकरच ते ‘ओ रोमियो’ या चित्रपटात दिसणार आहेत.
अभिनेता अनिल कपूर यांनी तरुण वयातच के. विश्वनाथ यांच्या ‘ईश्वर’ या चित्रपटात वृद्ध ईश्वरचंद्र विष्णुनाथ ब्रह्मानंद यांची भूमिका साकारून प्रेक्षकांना चकित केले होते. त्यानंतरही ‘एनिमल’ आणि ‘फाइटर’ यांसारख्या चित्रपटांत त्यांनी वेगळ्या धाटणीच्या भूमिका केल्या. शाहरुख खानच्या ‘किंग’ या चित्रपटातही त्यांची उपस्थिती राहणार आहे.
अभिनेता जॅकी श्र्ॉफ यांनी ‘धूम-3’, ‘परिंदा’, ‘काश’, ‘देवदास’, ‘1942: ए लव स्टोरी’ आणि ‘सौदागर’ यांसारख्या अनेक चित्रपटांत प्रभावी चरित्र भूमिका साकारल्या आहेत. ताज्या ‘मैं तेरा तू मेरी’ या चित्रपटात ते वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत.
याशिवाय रंगभूमीची भक्कम पार्श्वभूमी असलेले अनेक कलाकार संधी मिळताच आपल्या अभिनयाचा ठसा उमटवतात. अभिनेता गजराज राव, अभिनेता संजय मिश्र्ा, अभिनेता सौरभ शुक्ला, अभिनेता विजय राज, अभिनेता मुकेश तिवारी आणि अभिनेता मनोज बाजपेयी ही त्यातील काही ठळक नावे आहेत. ओटीटी माध्यमावरही चरित्र अभिनेत्यांनी नायकाच्या स्टारडमला दुय्यम ठरवत आपले मजबूत स्थान निर्माण केले असून अभिनेता जमील खान, अभिनेता जिम्मी शेरगिल आणि अभिनेता रघुवीर यादव यांची नावे विशेष उल्लेखनीय ठरतात.
Check Also
कलाकारांचा आर्थिक संघर्ष
सिनेअभिनेते राजपाल यादव यांच्या आर्थिक संकटाची चर्चा अलीकडे बराच काळ चालली. न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही अनेकांनी …
पांचजन्य वृत्तपत्र