लेख-समिक्षण

सौर विकिरणांचा परिणाम

ज्या काळात इथियोपियाच्या दिशेने उसळलेल्या ज्वालामुखीच्या प्रचंड धुरामुळे विमानसेवेसमोर अडथळे उभे राहिले होते, त्याच वेळी सूर्यकिरणांमधून निर्माण होणाऱ्या तीव्र विकिरणामुळे जगभरात परिचित असलेल्या सुमारे साडेसहा हजार एअरबस ए320 विमानांच्या सॉफ्टवेअरमध्ये अनाकलनीय बिघाड दिसू लागला आणि अनेक उड्डाणे स्थगित करावी लागली. 30 ऑक्टोबर रोजी न्यूयॉर्ककडे उड्डाण करणाऱ्या जेटब्लूच्या विमानाला आलेल्या विकिरणाच्या धक्क्यामुळे विमानात अचानक झटके बसले, त्याची उंची झपाट्याने कमी झाली आणि पंधरा प्रवासी जखमी झाले. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आणि चौकशीअंती हे स्पष्ट झाले की त्रुटी एलिव्हेटर ॲण्ड एइलरॉन कॉम्प्युटरएलॅकया महत्त्वपूर्ण नियंत्रण प्रणालीशी निगडित आहे. ही प्रणाली विमानाची पिच आणि रोल नियंत्रित करते; त्यामुळे उड्डाणावेळी नोज वर आणि अवतरणावेळी खाली राहावी, यासाठी हीच प्रमुख जबाबदार आहे. या प्रसंगी मात्र उड्डाणादरम्यान विमानाची नोज अनपेक्षितपणे खाली झुकली होती.
एअरबसच्या ए320 कुटुंबातील जवळपास अकरा हजारांहून अधिक विमाने सध्या कार्यरत आहेत आणि या संख्येचा अर्थ असा की जगातील जवळजवळ निम्मी विमानसेवा या समस्येला तोंड देण्याच्या स्थितीत आहे. सूर्य विकिरणामुळे आधुनिक विमानांना असा गंभीर फटका बसणे धक्कादायक असले, तरी ते अभूतपूर्व नाही. 1994 मध्ये आलेल्या तीव्र सौर वादळाने कॅनडाच्या एनीक2 उपग्रहाला निष्क्रिय केले होते आणि त्या काळात अनेक विमानांच्या संप्रेषण व नेव्हिगेशन प्रणालींमध्ये बिघाड नोंदवले गेले होते. 2008 मध्ये क्वांटस एअरवेझच्या ए330 विमानात एअर डाटा इनर्शियल रेफरन्स युनिटमध्ये विकिरणामुळे बिघाड निर्माण होऊन विमान अचानक खाली गेले होते. त्या वेळीही जगभरातील विमान कंपन्यांना व्यापक सॉफ्टवेअर सुधारणा व संचालन बदलावे लागले होते. या घटना अंतराळ हवामान, विमानन इलेक्ट्रॉनिक्स आणि उड्डाण सुरक्षा या परस्पर गुंफलेल्या विषयांच्या किती गुंतागुंतीच्या आहेत, याची जाणीव करून देतात. एलॅक प्रणालीचे अद्ययावतीकरण विमानाच्या आवृत्तीवर अवलंबून आहे. जुन्या विमानांत संपूर्ण यंत्रणा बदलावी लागते, तर नवीन विमानांत सॉफ्टवेअर सुधारण्यासाठी काही तास पुरेसे असतात. तथापि, जवळपास हजार विमानांना सुधारण्यासाठी अनेक आठवडे लागण्याची शक्यता आहे. सूर्यावरील कोरोनल मास इजेक्शन किंवा सौर ज्वालेमुळे उगम पावणाऱ्या ऊर्जासमृद्ध कणांमुळे, तसेच गॅलॅक्टिक कॉस्मिक किरणांमुळे 28,000 फूटांपेक्षा अधिक उंचीवर उड्डाण करणारी व्यावसायिक विमाने अत्यंत संवेदनशील ठरतात. या कणांच्या धडकेत विमानातील मायक्रोप्रोसेसर किंवा मेमरी चिप्समध्ये सिंगल इव्हेंट अपसेट निर्माण होऊन डाटा बिघडतो. त्यामुळे विमान अनियंत्रितपणे ‌‘पिचडाउन‌’ होण्याचा धोका निर्माण होतो आणि उड्डाण सुरक्षिततेला गंभीर आव्हान उभे राहते.
सौर वादळांमुळे जीपीएस/जीएनएसएस संकेतांची अचूकता कमी होते, आयनमंडलात तीव्र अस्थिरता निर्माण होते आणि उच्च वारंवारतेचे रेडिओ संचार काही वेळा पूर्णपणे ठप्प होतात. ध्रुवीय मार्गावरील किंवा महासागरीय दीर्घ-अंतराच्या उड्डाणांना अशा वेळी मोठा धोका निर्माण होतो. विमानातील कर्मचारी आणि प्रवाशांवरील विकिरणप्रभाव सामान्यतः नियंत्रित असला, तरी तीव्र वादळांच्या काळात विमान कंपन्यांना मार्गांतर करावे लागते. भारतात अद्याप या परिणामांचा थेट फटका जाणवलेला नसला, तरी डीजीसीएने सर्व भारतीय विमानसंस्थांना तातडीने सॉफ्टवेअर अद्ययावत करण्याचे निर्देश दिले आहेत. या घटनेमुळे अंतराळ हवामानाचा विमानन प्रणालींवर होणारा परिणाम, तसेच भविष्यात अधिक रेडिएशन-प्रतिरोधक यंत्रणा विकसित करण्याची गरज, याबाबत जागरूकता वाढली आहे. — प्रसाद पाटील

Check Also

वाढते विमान अपघात आणि प्रशिक्षण संस्था

देशातील हवाई क्षेत्राला सध्या एकामागून एक घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेचे ग्रहण लागल्याचे दिसत आहे. आसाममध्ये झालेल्या …