लेख-समिक्षण

सॉफ्टवेअर इंजिनिअर ते फॅशन उद्योजिका

इंदूरच्या एका सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली निधी यादव आज अक्स क्लोथिंग या देशातील लोकप्रिय एथनिक ब्रँडची संस्थापक म्हणून नावारुपाला आलेली आहे.
निधिच्या करिअरचा पहिला टप्पा डेलॉयटमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून गेला. स्थिर, आकर्षक आणि परदेशात जाण्याची संधी असलेली कारकीर्द तिच्यासमोर होती. परंतु, तिला जाणवले की तिची खरी आवड तंत्रज्ञानात नाही, तर फॅशन डिझाईनमध्ये आहे. तिने भारतीय फॅशनविश्वाचा बारकाईने अभ्यास केला. भारतीय महिलांसाठी स्टायलिश, परवडणाऱ्या आणि वारंवार अपडेट होणाऱ्या एथनिक ड्रेसची मोठी मागणी आहे, हे तिने ओळखले. जागतिक ब्रँड झाराप्रमाणे दर 15 दिवसांनी नवीन कलेक्शन आणण्याची कल्पना तिने भारतात आणलीआणि इथेच अक्स क्लोथिंगचा पाया रचला गेला.
2014 मध्ये 3.5 लाख रुपयांच्या छोट्या भांडवलासह सुरु झालेले हे स्वप्न सुरुवातीला तिच्या 2 बीएचके फ्लॅटपुरते मर्यादित होते. तिथेच पॅकेजिंग, इन्व्हेन्टरी, डिझाईन, ऑर्डर मॅनेजमेंट सगळे काम निधि स्वतः करीत होती. तिचा पती सतपाल यादव त्यावेळी जॅबाँगमध्ये ऑपरेशन्स मॅनेजर होता. सुरुवातीच्या सर्व टप्प्यांमध्ये निधीला त्याने पूर्ण आधार दिला. दोघेही आपल्या लहान मुलीसह जयपूरला कपड्यांसाठी सतत जात, डिझाईन्स तपासत आणि नवीन मटेरियल शोधत.
ऑर्डर्स अचानक वाढू लागल्यावर 2015 मध्ये निधिने एक बेसमेंट रेंटवर घेतले आणि उत्पादन वाढवले. त्यानंतर मिंत्रा, जॅबॉन्ग आणि लाईमरोडसारख्या मोठ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर अक्स क्लोथिंगचे कलेक्शन लोकप्रिय झाले. कंपनीचे कामकाज वाढत गेले आणि निधिने जयपूरमधील तीन प्रॉडक्शन युनिट्सशी भागीदारी केली. यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादने पुरवणे तिला शक्य झाले.
ट्रॅक्सनच्या डेटानुसार, आज युवधी ॲप्रल प्रा. लि. मध्ये संस्थापकांची 80 टक्के भागीदारी आहे, ज्यांची एकत्रित नेटवर्थ 86.4 कोटी आहे. गुंतवणूकदारांचा हिस्सा 20 टक्के असून, त्यांची किंमत 21.6 कोटी आहे. 2024 मध्ये कंपनीचा महसूल 300 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. कंपनीचे उद्दिष्ट आगामी वर्षात 500 कोटींचा टप्पा गाठण्याचे आहे.

 

Check Also

दहावी शिकलेला तरुण बनला कोट्यधिश उद्योगपती

जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस शून्यातूनही विश्व निर्माण करू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे …