लेख-समिक्षण

कॅनडाचे ‘वॉरन बफे’

यशाच्या व्याख्या अनेक असतात. कुणासाठी ते पैशात मोजले जाते, तर कुणासाठी प्रतिष्ठेत. परंतु काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे यश केवळ आकड्यांत नाही, तर त्यांच्या मूल्यांमध्ये, त्यांच्या दृष्टीकोनात आणि त्यांच्या जगण्याच्या तत्वांमध्ये दडलेले असते. भारतीय वंशाचे कॅनडियन अब्जाधीश उद्योगपती प्रेम वत्सा हे त्याचे सर्वात जिवंत उदाहरण आहेत.
हैदराबादमधील एका मध्यमवर्गीय शिक्षक कुटुंबात जन्मलेला हा मुलगा, १९७० च्या दशकात केवळ ८ डॉलर्स खिशात घेऊन कॅनडाला गेला. त्यावेळी कुणी स्वप्नातही विचार केला नसेल की, हाच तरुण पुढे जाऊन ‘वॉरेन बफे ऑफ कॅनडा’ म्हणून जगभरात ओळखला जाईल.
आज ७५ वर्षांचे प्रेम वत्सा हे फेअरफॅक्स फायनान्शिअल होल्डिंग्ज या १०० अब्ज डॉलर मालमत्ताधारक बहुराष्ट्रीय समूहाचे प्रमुख आहेत. चार दशकांच्या या प्रवासात त्यांनी एक छोट्या विमा कंपनीला जागतिक दर्जाच्या गुंतवणूक समूहात रूपांतरित केले आहे.
१९५० मध्ये हैदराबाद येथे जन्मलेल्या प्रेम वत्सा यांचे बालपण अत्यंत साधेपणात गेले. त्यांचे वडील शालेय शिक्षक होते. त्यामुळे शिकण्याची, कष्ट करण्याची आणि प्रामाणिकपणाची शिकवण त्यांना घरातूनच मिळाली. वत्सा यांनी हैदराबाद पब्लिक स्कूलमधून शिक्षण घेतले. याच संस्थेतून पुढे सत्या नडेला, शांतनू नारायण आणि अजय बंगा यांसारखे आंतरराष्ट्रीय पातळीवरील दिग्गज पुढे आले.
पुढे त्यांनी आयआयटी मद्रासमधून केमिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. त्यानंतर व्यवस्थापन शिक्षणाची इच्छा होती. आयआयएमच्या प्रवेश परीक्षेत दुसर्‍या प्रयत्नात यश मिळाले, पण नियतीने त्यांच्यासाठी दुसरी वाट ठेवली होती. त्यांचा मोठा भाऊ आधीच कॅनडामध्ये स्थायिक झाला होता आणि वडिलांनी प्रेमला तिथे जाण्याचा सल्ला दिला. वत्सा स्वतः म्हणतात ‡मला भारत सोडायची मुळीच इच्छा नव्हती. पण २२ वर्षांचा असताना तुम्ही वडिलांचे ऐकता.
कॅनडामध्ये त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑन्टॅरिओमधून एमबीए केले. शिक्षणासाठी पैसे उभे करण्यासाठी त्यांनी एअर कंडिशनर आणि फर्नेस विक्रीचे काम केले. या टप्प्यावरच त्यांच्या जीवनात ‘मेहनत आणि नम्रता’ या दोन गुणांचा पाया घट्ट झाला आणि त्याच पायावर नंतर त्यांच्या संपूर्ण यशाची गगनचुंबी इमारत उभी राहिली.
१९७४ मध्ये वत्सा यांना टोरोंटो येथील कन्फेडरेशन लाईफ इन्शुरन्स कंपनीमध्ये रिसर्च अ‍ॅनालिस्ट म्हणून पहिली नोकरी मिळाली. मजेशीर गोष्ट म्हणजे त्या मुलाखतीला फक्त तेच हजर झाले होते. हीच गोष्ट त्यांच्या जीवनात निर्णायक ठरली. इथेच त्यांना गुंतवणुकीचे गुरू जॉन वॉटसन भेटले. त्यांच्या माध्यमातून प्रेम वत्सा यांनी बेंजामिन ग्रॅहम या प्रसिद्ध अर्थतज्ज्ञाच्या वॅल्यू इन्व्हेस्टिंगच्या तत्त्वज्ञानाशी ओळख करून घेतली. कमी किमतीत असलेल्या, पण मजबूत पाया असलेल्या कंपन्यांमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करणे हे या तत्त्वज्ञानाचे सार होते. वत्सा यांनी हे विचार हृदयाशी धरले. जलद नफा, अटकळबाजी किंवा फॅशनप्रमाणे बदलणार्‍या गुंतवणुकीच्या लहरी त्यांना कधी मोहात पाडू शकल्या नाहीत. बाजारातील उलथापालथींपेक्षा कंपनीच्या अंतर्गत मूल्यावर लक्ष द्यायचे हा त्यांचा मूलमंत्र राहिला.

Check Also

दहावी शिकलेला तरुण बनला कोट्यधिश उद्योगपती

जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस शून्यातूनही विश्व निर्माण करू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे …