लेख-समिक्षण

तुमचंही मूल शाळेत उदास असतं?

साधारणतः दुसरी ते चौथी इयत्तेत जाईपर्यंत मुलांच्या शिक्षणाबाबत, शाळेत जाण्याबाबत पालकांना प्रचंड काळजी असते. यातील सर्वांत मोठे आव्हान असते ते मुलाला शाळेपर्यंत पोहोचवणे. दुसरे असते न रडता. तिसरे असते घरामध्ये शांत वातावरण राखून मुलाचं सकाळचं सगळं आवरणं. यादरम्यान होणार्‍या चुका मुलांवर नकारात्मक परिणाम करतात.
तुमचंही मूल शाळेतून आल्यावर उदास, गप्प आणि हरवलेलं असतं का? किंवा टीचर्सकडून वारंवार ऐकावं लागतं का की मूल अभ्यासात लक्ष देत नाहीये? याचे उत्तर हो असेल तर त्याकडे फक्त एकाग्रतेची कमतरता आहे, असे मानू नका. यामागे तुमच्या सकाळच्या सवयीही कारणीभूत असू शकतात!
१. घाईघाईत नाश्ता करणे
सकाळी जवळपास प्रत्येक घरात मुलांना शाळेत सोडण्याची लगबग सुरू असते. यामध्ये आईचा भर असतो तो ‘खाऊन जा बाबा’. मूल घाईघाईत खात असेल आाणि तेही जास्त गोड पदार्थ खात असेल तर याचा थेट परिणाम त्याच्या ऊर्जेवर आणि एकाग्रतेवर होतो. त्यामुळे शुगर लेव्हल अचानक वाढते किंवा कमी होते आणि मूल सुस्त बनंतं. मुलांचा मेंदू या वयात विकसित होत असतो, त्यामुळे त्यांना योग्य पोषणाची नितांत गरज असते. यासाठी त्यांना प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्वे आणि चांगला फॅटस्युक्त नाश्ता द्या. यामुळे त्यांचं रक्तातील साखरेचं प्रमाण स्थिर राहील आणि एकाग्रतेत सुधारणा होईल.
२. झोपेची कमतरता
लहान मुलांना मोठ्यांपेक्षा जास्त झोपेची गरज असते. जर मुलाला फक्त साडेसात ते आठ तास झोप मिळाली असेल तर ते सकाळी चिडचिडं होऊ शकतं आणि शाळेत शिक्षकांचे शिकवणे किंवा सूचना नीट लक्षपूर्वक ऐकू शकत नाहीत. म्हणून मुलाला दररोज पुरेशी झोप देणं आणि वीकेंडलाही झोपण्याचं व उठण्याचं ठराविक वेळापत्रक राखणं महत्त्वाचं आहे. चांगल्या झोपेसाठी सातत्यपूर्ण रुटीन ठेवा.
३. शाळेला जाण्यापूर्वी टीव्ही किंवा मोबाइल पाहणे
जर मूल सकाळी शाळेला निघण्याआधी टीव्ही किंवा मोबाइलवर वेळ घालवत असेल, तर त्याचा मेंदू सतत स्क्रीनकडे आकर्षित होतो. स्क्रीन बंद केल्यावर त्याला पुन्हा एकाग्र होण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे शाळेत पोहोचल्यावरही लासरूममध्ये त्याला नीट लक्ष केंद्रित करणं कठीण जातं.
४. सकाळची घाईगडबड आणि ओरडणे
जर तुम्ही दररोज सकाळी मुलाला युनिफॉर्म घालताना, तयारी करताना, नाश्ता करताना ओरडत असाल तर मुलाच्या मनावर तणाव आणि चिंतेचं वातावरण तयार होतं. अशा अवस्थेत मेंदूला शांत होऊन अभ्यासात लक्ष देणं अवघड होतं. मुलासाठी सकाळची वेळ शय तितकी शांत आणि प्रेमळ ठेवा.
५. शरीराला पाणी न मिळणं कधी कधी मुलांना तहान लागली असते पण ते ती ओळखू शकत नाहीत. जर सकाळपासून त्यांना पुरेशी पाणी पिण्याची सवय नसेल, तर डिहायड्रेशनमुळे मेंदू योग्यरीत्या काम करू शकत नाही आणि एकाग्रतेत अडचण येते. त्यामुळे, मुलाला सकाळपासूनच थोडं थोडं करून पाणी प्यायला लावा.
६. आणखी एक मुद्दा म्हणजे पालकांकडून होणारी तुलना ‘पाहिलेस ना शेजारच्या रोहनला? त्याला नेहमीच शंभर पैकी शंभर गुण मिळतात!’ अशा प्रकारची तुलना मुलांच्या मनात न्यूनगंड निर्माण करते. त्यांच्यात असुरक्षिततेची भावना वाढते आणि मग अभ्यासात मन लागत नाही. प्रत्येक मूल वेगळं असतं, त्याच्या गतीने प्रगती करू द्यावी. पण काही पालक आपल्या अपूर्ण आकांक्षा मुलांवर लादतात. ही दडपणाची भावना त्यांच्या शिकण्याच्या आनंदावर पाणी फिरवते. तू काहीही कामाचा नाहीस, तू शिकूच शकत नाहीस असे वाय मुलांचं मनोधैर्य खच्ची करतात. अशा नकारात्मक बोलण्याने ते आत्मविश्वास गमावतात आणि पर्यायाने अभ्यासापासून दूर जातात.
मुलं जेव्हा शाळेत एखादी अडचण अनुभवतात, तेव्हा त्यांना कुणाशी तरी बोलायचं असतं. जर पालकांनी संवादासाठी उघडं वातावरण तयार केलं नाही, तर मुले स्वतःमध्ये हरवून जातात आणि अभ्यासात रस गमावतात.

Check Also

पांढऱ्या केसांवर तेलचिकित्सा

आजकाल कमी वयातच केस पांढरे होणे ही स्रियांमधील एक सामान्य समस्या बनली आहे. पूर्वी वय …