दीपक सभरवाल यांनी दिल्ली विद्यापीठातून बीकॉम, आयसीएमए आणि एमबीए पदवी घेतली होती. त्यानंतर त्यांनी टाटा, पेप्सी आणि जनरल इलेट्रिकसारख्या दिग्गज कंपन्यांमध्ये २० वर्षांहून अधिक काळ काम केले. परंतु, कॉर्पोरेट मिटिंग्स आणि पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनमधील आयुष्य त्यांना पूर्ण समाधान देत नव्हते.
२०१७ मध्ये दीपक यांनी आपले वीस वर्षांचे कॉर्पोरेट करिअर सोडले आणि ऑर्गेनिक शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा प्रवास राजस्थानातील पुष्कर येथे अरावलीच्या पर्वतांमध्ये सुरू झाला. तेथे त्यांच्याकडे काही शेती होती, जिथे त्यांनी पहिल्यांदा ऑर्गेनिक शेती सुरू केली.
दीपक आणि त्यांची पत्नी दर वीकेंडला दिल्लीहून पुष्करला येत आणि शेतीमध्ये काम करीत. एका दिवशी त्यांनी पाहिले की, त्यांच्या शेतात वापरल्या जाणार्या कीटकनाशकावर पॉयझन लिहिलेले होते. हीच घटना दीपकसाठी टर्निंग पॉईंट ठरली. त्यादरम्यान त्यांची आई कर्करोगग्रस्त झाली होती. या अनुभवाने दीपक यांचा विचार पक्का झाला.
२०१८ मध्ये दीपक यांनी अर्थी टेल्स ऑर्गेनिक ही कंपनी स्थापन केली. ते या कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ही कंपनी केमिकल-मुक्त शेती व प्रक्रिया करण्यासाठी कार्यरत आहे. पुष्करच्या शेतीपासून त्यांनी आवळा, लिंबू, चिकू यांसारख्या फळांची लागवड केली. शिवाय, हिमाचल प्रदेश आणि राजस्थानमधील इतर शेतकर्यांकडून ऑर्गेनिक उत्पादन खरेदी केले जाते. दलालांना वगळून थेट शेतकर्यांना पंधरा ते वीस टक्के जास्त दर दिला जातो.
आज या कंपनीमध्ये सुमारे ५० टक्के महिला काम करतात. दिल्ली-एनसीआर मधील ५०० कुटुंबे आणि संपूर्ण भारतातील १० हजार लोकांना ऑर्गेनिक उत्पादने पोहोचत आहेत. दीपकचा विश्वास आहे की, जैविक शेती माती, पर्यावरण आणि आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांच्या कथेमुळे हे दिसते की, मेहनत आणि योग्य उद्देशाने मोठा बदल साधता येतो.
दीपक सभरवालची यांची ही यशोगाथा नवतरुणांना मंत्र देणारी आहे. ठाम इच्छाशक्ती आणि ध्येय ठरवून प्रयत्न केल्यास कोणत्याही क्षेत्रातून सामाजिक आणि आर्थिक बदल घडवता येतो. त्यांनी शेतीला केवळ जीविकेचे साधन नाही तर आरोग्यदायी, पर्यावरणपूरक आणि टिकाऊ उद्योग म्हणून बदलले आहे.
Check Also
जिद्दीच्या बळावर यशाला गवसणी
तमिळनाडूतील एका सर्वसामान्य तरुणानं सुरुवातीला 25 हजार रुपयांची नोकरी नाकारून अवघ्या 10 हजार रुपयांची इंटर्नशिप …
पांचजन्य वृत्तपत्र