लेख-समिक्षण

दिलासा कर्करोगावरील लसीचा

र्करोगाविरोधातील लढाईत जगाला आता एका महत्त्वाच्या शोधाची आशा दिसू लागली आहे. रशियातील शास्त्रज्ञांनी कर्करोगासाठी लस तयार केल्याचा दावा केला असून तिचा पहिला मानवी चाचणी टप्पा यशस्वी झाल्याचे समोर आले आहे. या नव्या घडामोडीमुळे वैद्यकीय क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडू शकतो, असा दावा करण्यात येत आहे. रशियाने तयार केलेल्या या नव्या लसीचे नाव एंटरॉमिस असे असून ती एमआरएनए तंत्रज्ञानावर आधारित आहे. प्राथमिक चाचणी टप्प्यात (फेज १) ही लस शंभर टक्के प्रभावी आणि सुरक्षित ठरली आहे. चाचणीत सहभागी रुग्णांना गंभीर दुष्परिणाम भोगावे लागले नाहीत, उलट ट्यूमर आकुंचन पावले किंवा त्यांची वाढ मंदावली. वैद्यकीय संशोधनाच्या दृष्टीने हे मोठे यश मानले जात आहे.
एमआरएनए तंत्रज्ञानाची कार्यपद्धती
या लसीत लहान एमआरएनए शरीरात सोडले जातात. हे अणु पेशींना विशिष्ट प्रथिन तयार करण्याचे संदेश देतात. ते प्रथिन कर्करोगी पेशींविरुद्ध रोगप्रतिकार यंत्रणेचे प्रशिक्षण करतात. विशेष म्हणजे एंटरॉमिस ही प्रत्येक रुग्णासाठी स्वतंत्ररीत्या बनवली जाते. त्या रुग्णाच्या ट्यूमरमधील अनुवंशिक वैशिष्ट्ये तपासून लस तयार केली जाते. त्यामुळे ती लस केवळ त्या व्यक्तीच्या कर्करोगी पेशींवर हल्ला करते.
कोविड-१९ काळात वापरण्यात आलेल्या एमआरएनए लसीने जसे रोगप्रतिकार यंत्रणेला विषाणूशी लढण्यासाठी तयार केले, त्याच धर्तीवर एंटरॉमिस लस रोगप्रतिकार यंत्रणेला कर्करोगी पेशींना ओळखून नष्ट करण्यास सक्षम करते. परंतु या लसीचे वैशिष्ट्य म्हणजे तिची रचना. त्यामुळे कर्करोग उपचारात ही एक खर्‍या अर्थाने खेळ क्रांतीकारी ठरू शकते. या लसीची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे प्रत्येक रुग्णासाठी ती वेगवेगळी तयार केली जाते. एमआरएनए तंत्रामुळे ती अत्यंत वेगाने विकसित करता येते. कीमोथेरपी किंवा रेडिएशनसारख्या पारंपरिक उपचारांच्या तुलनेत या लसीचे दुष्परिणाम अत्यल्प असतात. त्यामुळे रुग्णाला अधिक चांगली जीवनशैली आणि आराम मिळण्याची शयता आहे.
आता पुढील टप्प्यांमध्ये (फेज २ व ३) मोठ्या प्रमाणावर ही लस तपासली जाणार आहे. तिथेही ती तितकीच प्रभावी आणि सुरक्षित ठरल्यास, भविष्यात कर्करोग हा असाध्य किंवा दुर्धर आजार न राहता नियंत्रित करता येण्याजोगा आजार ठरेल. विशेषतः भारतासारख्या देशात, जिथे कर्करोग झपाट्याने वाढत आहे, ही लस आशेचा किरण ठरू शकते. सुरुवातीला या लसीचे लक्ष्य कोलोरेटल कर्करोग, मेंदूतील ग्लायोब्लास्टोमा आणि डोळ्यातील ऑयुलर मेलानोमा यांसारखे कर्करोग ठेवण्यात आले आहेत. पण जसजसे संशोधन आणि मानवी चाचण्या होत जातील तसतसे ही लस सर्व प्रकारच्या कर्करोगांसाठी प्रभावी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. — प्रा. विजया पंडित

Check Also

वाढते विमान अपघात आणि प्रशिक्षण संस्था

देशातील हवाई क्षेत्राला सध्या एकामागून एक घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेचे ग्रहण लागल्याचे दिसत आहे. आसाममध्ये झालेल्या …