लेख-समिक्षण

चौंसष्ट घरांची नवीन ‘महाराणी’

नागपूरच्या १९ वर्षीय दिव्या देशमुखने जॉर्जियात आयोजित जागतिक महिला बुद्धिबळ स्पर्धा जिंकत इतिहास घडविला. त्याचवेळी भारतासाठी असा गौरव प्राप्त करणारी पहिली पहिली महिला ठरली. तिच्या वयापेक्षा दुप्पट मोठी असलेल्या कोनरू हम्पीला पराभूत करत जागतिक मान मिळवण्याची बाब दिव्यासाठी महत्त्वाची ठरली. या विजयासह ती ग्रँडमास्टर होणारी भारताची चौथी महिला खेळाडू ठरली आहे.
तत्पूर्वी ग्रँडमास्टरचा मान तिच्याअगोदर कोनरु हम्पी, डी. हरिका आणि वैशाली रमेशबाबू यांनी मिळवलेला आहे. आता दिव्यासमोरचे आव्हान म्हणजे कॅडिडेट्स स्पर्धा जिंकून जगज्जेता होणे. ती जगज्जेती बनली तर भारताकडे पुरुष आणि महिला या दोन्ही गटातील जगज्जेतेपद येईल. काही महिन्यापूंर्वीच डी.गुकेशने पुरुष वर्गात जगज्जेतपद मिळवले आहे. दिव्या देशमुख आणि कोनरु हम्पी यांच्यातील पहिल्या दोन खेळी लासिकल श्रेणीत सारख्याच सुटल्याने टायब्रेकरमध्ये हा सामना पोचला. त्यात रॅपिड खेळीत दिव्याने विजय मिळवत हा गौरव मिळवला आहे. दिव्यासाठी रॅपिड चालीत हम्पीला पराभूत करणे हे अनेकार्थाने महत्त्वाचे होते. काही महिन्यांपूर्वीच डिसेंबरमध्ये हम्पी ही रॅपिड बुद्धिबळमध्ये दुसर्‍यांदा चॅम्पियन ठरली होती. ती रॅकिंगमध्ये पाचव्या स्थानावर आहे आणि दिव्या तर पहिल्या दहा खेळाडूत देखील नव्हती. अर्थात भारताच्या या दोन खेळाडूंनी अंतीम फेरीत धडक मारत चीनच्या वर्चस्वाला काही प्रमाणात धक्का दिला आहे.
भारतात खर्‍या अर्थाने बुद्धिबळ म्हटलं की विश्वनाथन आनंद याचे नाव घेतले जाते. त्याने बोरिस स्पास्कीच्या नेतृत्वाखाली सोव्हियत संघाची (आताचे रशिया) एकाधिकारशाही मोडून भारताला आघाडीचे स्थान मिळवून दिले. परंतु खर्‍या अर्थाने बुद्धिबळात भारतीय वर्चस्वाचा दबदबा डी. गुकेश, प्र्रग्नानंद, एरिगेसी यांच्या नेतृत्वाखालील पिढीने कायम ठेवले. या त्रिकुटामुळे बुद्धिबळातील आघाडीच्या दहा खेळाडूंत पहिल्यांदा भारताचे चार खेळाडू सामील झाले. आता हा सन्मान दिव्याच्या विजयाने महिला वर्गातही मिळेल. हम्पी ३८ वर्षाची असून ती आता करियरच्या शेवटच्या टप्प्यात आहे. परंतु वैशाली रमेशबाबू ही दिव्याप्रमाणेच तरुण असून ही जोडी बुद्धिबळ स्पर्धेत धमाल उडवून देण्याची क्षमता राखून आहे.
दिव्याबबात म्हटले जाते की ती अपघाताने बुद्धिबळपटू झाली. तिची मोठी बहिण बॅडमिंटन खेळत होती आणि तिचे आई वडिलही तिच्यासमवेत जात असत. दिव्या चार पाच वर्षाची असताना ती देखील पालकासमवेत मैदानावर जावू लागली. परंतु बॅडमिंटन खेळताना ती नेटपर्यंत देखील पोचू शकत नव्हती. त्याचवेळी याच हॉलमध्ये बुद्धिबळ खेळणारी मुले असायची. तेव्हा बुद्धिबळात तिचे मन रमले. दिव्याच्या मनात बुद्धिबळाविषयी वाढलेले कुतुहल पाहता वडिल डॉ. जितेंद्र अणि आई नम्रता यांनी देखील तिच्या प्रयत्नांना बळ दिले आणि नवीन उंचीवर नेऊन ठेवले. दिव्याने नागपूरच्या घराजवळील एका अकादमीत प्रवेश घेतला. ती दोन वर्षाचे असतानाच छाप पाडण्यास सुरुवात केली. २०१२ मध्ये दिव्याने पुदुच्चेरीत राष्ट्रीय बुद्धिबळ अंडर ७ जिंकण्याची किमया साधली. या यशानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. २०२० च्या काळात दिव्या भारतीय ऑलिंपियाड संघाची नियमित सदस्य झाली आणि तिचा समावेश देशातील नामांकित खेळाडूंत झाला. त्याचा फायदा म्हणजे तिला विश्वनाथन आनंद यांच्याकडून नियमित टिप्स मिळू लागल्या. तिने बुद्धिबळाच्या ऑलिंपियाडमध्ये पर्सनल बोर्डमध्ये सुवर्णपदकही जिंकले आहे. दिव्याने या यशाची माळ गळ्यात घालण्यापूर्वी झू जिनेर, तान झोंगयी आणि द्रोणावल्ली हरिका यांच्यासारख्या दिग्गजांना पराभूत केले. ती एक जबरदस्त क्षमतेची खेळाडू आहे. तिने मिळवलेले यश हे अचानक नाही. प्रतिभावंत खेळीमुळे तिच्याकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा होती आणि तिने ती साध्य करून दाखविली.- नितीन कुलकर्णी

Check Also

वाढते विमान अपघात आणि प्रशिक्षण संस्था

देशातील हवाई क्षेत्राला सध्या एकामागून एक घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेचे ग्रहण लागल्याचे दिसत आहे. आसाममध्ये झालेल्या …