लेख-समिक्षण

उंचीचे रहस्य

मुलीसाठी वरसंशोधन करताना आपल्याकडे उत्पन्न आणि कुंडलीबरोबरच अनेक बाबी तपासल्या जातात. सगळ्यात पहिली बाब असते मुलाची उंची. मुलापेक्षा मुलगीच उंच असेल तर इतर बाबी जुळूनसुद्धा चर्चा पुढे सरकत नाही. सरासरीपेक्षा अधिक उंची असलेल्या मुलीच्या आईवडिलांना ‘हिचं कसं होणार?’ अशी चिंता लागून राहिलेली असते. जगभरात वेगवेगळ्या वंशांचे लोक राहतात आणि त्यांची सरासरी उंची कमी-अधिक असते. परंतु एका बाबतीत संपूर्ण मानवजात एकसारखी आहे, ती म्हणजे पुरुषांची सरासरी उंची महिलांपेक्षा अधिक असणं. वास्तविक, अशा अनेक प्राणिप्रजाती आहेत, ज्यात नरापेक्षा मादीची उंची अधिक असू शकते आणि इतरही अनेक बाबतीत ती नरापेक्षा सरस असू शकते. माणसाच्याच बाबतीत पुरुषांची सरासरी उंची स्त्रियांपेक्षा अधिक का असते? हे गूढ उकलण्याचा प्रयत्न प्रत्येक काळात झाला असला, तरी आता या प्रश्नाला शास्त्रीय उत्तर मिळालंय.
महिला आणि पुरुषांच्या शारीरिक संरचनेतील प्रमुख भेद म्हणून उंचीकडे बोट दाखवलं जातं. परंतु हा भेद जनुकीय कारणांमुळं निर्माण झालेला आहे, असं ताजं संशोधन सांगतं. पुरुष आणि महिलांच्या सरासरी उंचीत सामान्यतः पाच इंचांचं अंतर असतं, असा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला आणि त्यानंतर त्याचं कारण शोधायला सुरुवात केली. अमेरिका आणि ब्रिटनमधील दोन गटांनी सुमारे दहा लाख लोकांच्या गुणसूत्रांचं विश्लेषण केल्यानंतर एका विशिष्ट जनुकाचा शोध लागला. ‘प्रोसिडिंग्ज ऑफ नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस’मध्ये प्रसिद्ध झालेल्या या संशोधनानुसार, एसएचओएस म्हणजे शॉर्ट स्टेचर होमोबॉस या जनुकामुळं स्त्री-पुरुषांच्या उंचीत फरक दिसून येतो. एस आणि वाय अशा दोन्ही क्रोमोजोममध्ये हा घटक आढळून येतो. महिलांमध्ये केवळ एस क्रोमोजोम असतो तर पुरुषांमध्ये एस आणि वाय असे दोन्ही क्रोमोजोम असतात. त्यामुळं एसएचओएस या घटकाचं प्रमाणही पुरुषांमध्ये अधिक असतं आणि त्यामुळं ते अधिक उंच बनतात.
एसएचओएस हा घटक शरीरातील हाडांच्या वाढीशी संबंधित असतो. पुरुषांना तो निसर्गतःच जास्त मिळतो. केवळ स्त्री-पुरुषांच्या उंचीतील तफावतीचं कारण शोधून या संशोधनाला पूर्णत्व मिळालं नसतं. माणसा-माणसाच्या उंचीतील फरकासही हाच घटक कारणीभूत आहे, हे सिद्ध करायचं होतं. त्यामुळं वेगवेगळ्या उंचीच्या व्यक्तींचे क्रोमोजोम तपासण्यात आले. ज्या व्यक्तींमध्ये एकच एस आणि एकच वाय क्रोमोजोम होता, त्यांची उंची तुलनेनं कमी भरली. त्या तुलनेत ज्यांच्याकडे वाय क्रोमोजोम अधिकचा होता, त्यांची उंची अधिक भरली. अधिकचा एस क्रोमोजोम असणार्‍यांच्या बाबतीत हे घडलं नाही, कारण एसएचओएस केवळ वायमध्येच आढळतो. तपासणी करण्यात आलेल्या दहा लाख लोकांपैकी १२२५ लोक असे होते, ज्यांच्या शरीरात एस किंवा वाय गुणसूत्र एकतर गायब होते किंवा अतिरिक्त होते. वाय गुणसूत्राचा अभाव असलेल्या व्यक्तींमध्ये आरोग्यविषयक समस्याही तुलनेनं अधिक आढळून आल्या. अतिरिक्त एस असलेल्या व्यक्तींची उंची सरासरीइतकीच होती तर अतिरिक्त वाय असलेल्यांची उंची मात्र सरासरीपेक्षा अधिक भरली. एसएचओएस घटकाच्या या खेळामुळं स्त्री-पुरुषांच्या उंचीत फरक जाणवत असला, तरी कर्तृत्वाशी या घटकाचा अर्थातच काहीही संबंध नाही. त्यामुळं स्त्रिया त्यांची ‘उंची’ प्रत्येक क्षेत्रात विविध मार्गांनी दाखवून देत आहेत.

Check Also

दिलासादायक माघार

केंद्र सरकारने बहुचर्चित ‌‘ऊस (नियंत्रण) आदेश 2026‌’ चा मसुदा तूर्त मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. …