लेख-समिक्षण

बाळ एक,जन्म दोनदा!

एकाच जन्मात पुन्हा जन्माला येण्याची इच्छा कुणाला नसते? मुठीतून वाळू घसरत जावी, तसं आयुष्य हातातून निसटून जात असतं आणि योजलेल्या अनेक गोष्टी वेळच्या वेळी होत नाहीत. अनेक गोष्टी थोडक्यात हुकतात. कर्तृत्व असूनही यश हुलकावणी देत राहतं. अशा वेळी प्रत्येकाला वाटतं, आयुष्य पुन्हा पहिल्यापासून सुरू करता आलं तर..! परंतु आपण निसर्गनियमाच्या विरोधात जाऊ शकत नाही. मागे वळू शकत नाही आणि आहे त्यात समाधान मानून आपल्याला पुढेच जात राहावं लागतं. या पार्श्वभूमीवर, कुठेतरी चूक झाली म्हणून आयुष्यात ‘बॅक स्पेस’ बटण दाबण्याचं भाग्य कुणाच्या नशिबात आलं तर..? पण केवळ काळालाच नव्हे तर एका मोठ्या संकटाला हुलकावणी देण्यासाठी दोनदा जन्माला येण्याचं भाग्य एका तान्हुल्याला नुकतंच लाभलं. संकटाचा वेळीच झालेला उलगडा, त्यावर मात करण्यासाठी घेतलेला धाडसी निर्णय आणि विज्ञानावरचा विश्वास यामुळं हे शक्य झालं. अर्थात, आपण दोनदा जन्माला आलो, हे त्या बाळाला मोठेपणी आठवणारसुद्धा नाही; पण जन्मापूर्वीच असलेला धोका कसा टाळला, याची गोष्ट त्याचे आईवडील त्याला निश्चित सांगतील. घटना आहे ब्रिटनमधली. ऑक्सफर्डमधील शिक्षिका लूसी इसाक वीस आठवड्यांच्या गर्भवती होत्या, तेव्हा चमत्कार वाटावा अशी शस्त्रक्रिया त्यांच्यावर झाली. अर्थात, धोका दिसला त्यावेळी गर्भ बारा आठवड्यांचा होता. काळ आलाच होता; पण वेळ आलेली नव्हती.
बत्तीस वर्षांच्या लूसी यांना ऑवेरियन कॅन्सर अर्थात अंडाशयाचा कर्करोग असल्याचं त्यांच्या नियमित अल्ट्रासाउंड तपासणीत आढळून आलं. उपचारांसाठी बाळाच्या जन्मापर्यंत वाट पाहिली तर कर्करोग वेगानं पसरत जाईल, अशी भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आणि सर्वच मार्ग खुंटले. गर्भाची वाढ बरीच झालेली असल्यामुळं ‘की-होल सर्जरी’ करणं शक्य नव्हतं. त्यामुळं शस्त्रक्रियेचा वेगळाच मार्ग अवलंबावा लागेल, असं डॉक्टरांचं म्हणणं पडलं. अशा प्रकारच्या दुर्मिळ शस्त्रक्रियेचं धाडस लूसी आणि त्यांचे पती अ‍ॅडम यांनी दाखवलं तेव्हा नियतीच्या पटावरील सोंगट्याच्या जागाच बदलल्या. पंधरा डॉक्टरांच्या टीमवर या दाम्पत्याने विश्वास ठेवल्यामुळं चमत्कार झाला. या आगळ्यावेगळ्या सर्जरीदरम्यान लूसी यांचं गर्भाशय तात्पुरतं काढावं लागणार होतं… अर्थातच गर्भासह! मात्र, गर्भाच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाच्या रक्तवाहिन्या गर्भाशयाला जोडलेल्या अवस्थेतच ठेवाव्या लागणार होत्या. शस्त्रक्रिया सुरू असताना लूसी यांचं गर्भाशय काढून ते उबदार आवरणात झाकून ठेवलं गेलं. तापमान कमी होऊ नये, याची खबरदारी घेताना हे आवरण दर वीस मिनिटांनी बदलावं लागत होतं. एकीकडे गर्भाची काळजी घेतली जात असतानाच कर्करोगावर शस्त्रक्रिया सुरू होती.
लूसी यांच्या प्रजननसंस्थेतील अवघड जागी वाढलेल्या कर्करोगग्रस्त ऊती डॉक्टरांनी हटवल्या. तोपर्यंत बाळ गर्भाशयासह आईच्या शरीराबाहेर होतं. त्यानंतर गर्भासह बाळ पुन्हा आईच्या कुशीत विसावलं. कर्करोगग्रस्त ट्यूमरच्या तपासणीत तो ‘ग्रेड टू कॅन्सर’ असल्याचं निष्पन्न झालं. परंतु पाच तास चाललेल्या या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेमुळं आता बाळाच्या जिवाचा धोका टळलेला होता. गर्भाची पूर्ण वाढ झाल्यानंतर सहा पाउंड पाच औंस वजनाच्या बाळाने धरतीवर पुन्हा जन्म घेतला. थोडक्यात, नशीब आपल्याला हातात नसतं; पण संकटकाळी विज्ञानावर विश्वास ठेवला, तर ते बदलूही शकतं.-हिमांशु चौधरी

Check Also

दिलासादायक माघार

केंद्र सरकारने बहुचर्चित ‌‘ऊस (नियंत्रण) आदेश 2026‌’ चा मसुदा तूर्त मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. …