लेख-समिक्षण

अपार संघर्षातून यशाची कहाणी

पेट्रीसिया नारायण यांची जीवनकथा संघर्ष, आत्मविश्वास आणि अपार मेहनतीचे प्रतीक आहे. तामिळनाडूमधील नागरकोइल येथे ख्रिश्चन कुटुंबात जन्मलेल्या पेट्रीसियांनी, वयाच्या 17व्या वर्षी नारायण नावाच्या हिंदू तरुणाशी प्रेमविवाह केला. परंतु, हा निर्णय त्यांच्या जीवनात अनेक आव्हाने घेऊन आला. नवरा व्यसनाधीन आणि अत्याचारी असल्यामुळे, त्यांनी एका वर्षानंतर दोन मुलांसह त्याला सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या वडिलांनी त्यांना परत स्वीकारले, परंतु पेट्रीसियांना स्वतःच्या पायावर उभे राहायचे होते. स्वयंपाकाची आवड असल्यामुळे, त्यांनी घरीच जॅम, लोणची आणि स्क्वॉश बनवून विक्री सुरू केली.
मातेच्या सहकार्याने, त्यांनी चेन्नईच्या मरीना बीचवर एक हातगाडी उभी केली, जिथे चहा, कॉफी, समोसे, कटलेट्स आणि ज्यूस विक्रीस ठेवले. पहिल्या दिवशी फक्त 50 पैसे कमाई झाली, परंतु त्यांनी हार मानली नाही. हळूहळू विक्री वाढली आणि त्यांनी दोन अपंग व्यक्तींना कामावर ठेवले. 1980च्या दशकात, पेट्रीसियांनी स्लम क्लीयरन्स बोर्ड ऑफिससाठी केटरिंग सेवा सुरू केली. यामुळे त्यांची ओळख वाढली. नंतर त्यांनी नॅशनल पोर्ट ट्रस्ट मॅनेजमेंट स्कूल आणि बँक ऑफ मदुराईसाठीही केटरिंग सेवा दिली. 1998 मध्ये, त्या संगीता ग्रुपच्या नेल्सन मणिक्कम रोड रेस्टॉरंटच्या संचालक झाल्या.
2004 मध्ये, त्यांच्या मुलीचा आणि जावयाचा अपघातात मृत्यू झाला. यामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. मुलीच्या स्मरणार्थ, 2006 मध्ये त्यांनी ‘संधीपा’ नावाचे रेस्टॉरंट सुरू केले. आज, त्यांच्या या व्यवसायात 200 हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत आणि दररोज सुमारे 2 लाख रुपयांची उलाढाल होते. त्यांचा वार्षिक टर्नओव्हर सुमारे 100 कोटींहून अधिक आहे. 2010 मध्ये, पेट्रीसिया नारायण यांना ‘वुमन आंत्रप्रेन्योर ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.कठीण परिस्थितीतही हार न मानता यश मिळवण्याची विजिगिषु वृत्ती किती महत्त्वाची असते हे त्यांचा जीवनपट पाहिल्यानंतर लक्षात येते.
आत्मविश्वास, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर कोणतीही व्यक्ती आपल्या स्वप्नांना साकार करू शकते ही बाब वरील उदाहरणावरुन स्पष्ट होत नाही काय?

Check Also

जिद्दीच्या बळावर यशाला गवसणी

तमिळनाडूतील एका सर्वसामान्य तरुणानं सुरुवातीला 25 हजार रुपयांची नोकरी नाकारून अवघ्या 10 हजार रुपयांची इंटर्नशिप …