लेख-समिक्षण

ऑपरेशन ‘आत्मघात ’

सिनेमात अनेक अतार्किक प्रसंग पाहायला मिळतात. किंबहुना तर्कसंगत नसल्यामुळंच ते अधिक मनोरंजक बनतात. अशा तर्कशून्यतेविषयी व. पु. काळे एका कथेत म्हणतात, ‘हिरोने आरशात बघून स्वतःच्या ब्रेन ट्यूमरचं ऑपरेशन केलं, असं जरी दाखवलं असतं तरी मी विश्वास ठेवला असता.’ आधीच वास्तवापासून दूर असलेल्या प्रसंगावर केलेली ही अतिशयोक्ती. म्हणजे वास्तवापासून आणखी दूर! परंतु आरशात बघून नव्हे, तर चक्क यू-ट्यूबवर बघून माणसं स्वतःचं ऑपरेशन करू लागलीयेत, हे मात्र भयानक वास्तव! वृंदावनच्या राजाबाबू नावाच्या इसमानं आपलं पोटाचं ऑपरेशन स्वतःच केलं आणि साहजिकच ‘आपल्या डिगर्‍यांचं काय करायचं,’ असा प्रश्न डॉक्टर मंडळींना पडला. साध्या सर्दी-खोकल्यापासून वेट-गेन, वेट-लॉसवर इंटरनेटवरून सल्ले घेणारे आणि स्वतःच्या प्रकृतीवर ‘प्रयोग’ करणारे असंख्य लोक आपण आसपास पाहतो. परंतु आता ऑपरेशन कसं करायचं, हे इंटरनेटवर पाहून स्वतःवर ‘प्रयोग’ सुरू झाले असतील, तर ते अत्यंत गांभीर्यानं घेतले पाहिजेत. अ‍ॅलन मस्क यांच्या ‘ग्रॉक’ या चॅट जीटीपीवर सरकारकडून तातडीने हरकत नोंदवली गेली; पण तीच तत्परता दुर्दैवाने अशा संवेदनशील विषयात दाखवली जात नाही. ‘वैद्यकीय सल्ल्याशिवाय स्वतःवर प्रयोग करणं आरोग्यास अपायकारक आहे,’ असा वैधानिक इशारा देणंही इंटरनेटवरील कन्टेन्ट क्रिएटर्सना बंधनकारक नाही. शेअर बाजाराशी संबंधित गुंतवणुकीविषयीही सावधगिरीचा इशारा द्यावा लागतो; मग गंभीर वैद्यकीय बाबी दुर्लक्षित का?
उत्तर प्रदेशच्या वृंदावनमधील राजाबाबूंना पोटदुखीचा त्रास होता. प्राप्त माहितीनुसार, त्यांचं अपेंडिक्सचं ऑपरेशन पूर्वी झालेलं होतं. परंतु ऑपरेशन झालं, ती जागा सतत दुखत होती. त्यांनी वेगवेगळ्या डॉक्टरांकडून वेगवेगळी औषधं घेऊन पाहिली. परंतु आराम पडला नाही. अखेर त्यांनी यू-ट्यूबवरील माहितीचा आधार घेतला, असं याविषयी प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमध्ये म्हटलंय. बत्तीस वर्षांचे राजाबाबू यांनी बीबीएचं शिक्षण घेतलंय. म्हणजेच, वैद्यकीय पेशाशी त्यांचा दूरान्वये संबंध नाही. पोटदुखी संपत नाही म्हटल्यावर ‘ऑपरेशन कसे करावे,’ या विषयावरचा व्हिडिओ त्यांनी यू-ट्यूबवर पाहिला. त्यासाठी लागणार्‍या साहित्याची यादी केली. ते साहित्य दुकानातून आणलं. अ‍ॅनस्थेशिया देण्यासाठी लागणारं इंजेक्शन स्वतःच स्वतःला टोचून घेतलं आणि ऑपरेशनची जागा बधिर होताच पुढील प्रक्रिया सुरू केली. पोटाच्या दुखर्‍या भागावर सर्जिकल ब्लेडच्या साह्यानं त्यांनी सात सेंटिमीटरचा छेद घेतला. नंतर स्वतःच्या हातानं पोटाच्या आत ‘चाचपणी’ केली. परंतु आत नेमकी काय गडबड आहे, हे त्यांना समजणं शक्यच नव्हतं. मग गडबडीने त्यांनी आपल्या पोटाला स्वतःच टाके घातले. पण भुलीच्या इंजेक्शनचा असर हळूहळू ओसरू लागला.
वेदना व्हायला लागल्यावर राजाबाबू घराबाहेर येऊन ओरडू लागले. त्यांचा पुतण्या आणि अन्य नातेवाइकांनी त्यांना तातडीनं जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. सुदैवानं त्यांचे प्राण वाचले. 2023 या एकाच वर्षात आरोग्याशी संबंधित साठ लाख व्हिडिओ यू-ट्यूबवर अपलोड झाल्याचं सांगितलं जातं. त्याचप्रमाणं घरबसल्या स्वतःच आपल्या आजाराची कारणं शोधून उपाय करणार्‍यांचं प्रमाण पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक झालंय. आपल्या देशात आरोग्यसुविधा अपुर्‍या आहेत, हे खरंच आहे; परंतु इंटरनेटवर पाहून ‘प्रयोग’ करणं म्हणजे जिवाशी खेळणं. व्यक्ती तितक्या प्रकृती, हे लक्षात ठेवलं पाहिजे. -हिमांशु चौधरी

Check Also

वाढते विमान अपघात आणि प्रशिक्षण संस्था

देशातील हवाई क्षेत्राला सध्या एकामागून एक घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेचे ग्रहण लागल्याचे दिसत आहे. आसाममध्ये झालेल्या …