लेख-समिक्षण

मालिकाविश्वाला रामराम

दिवंगत अभिनेते निळू फुले यांच्या कन्या गार्गी फुले-थत्ते यांनी अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. गार्गी फुले यांनी अनेक लोकप्रिय मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. मात्र, आता त्यांनी अचानक मराठी मालिकाविश्वातून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी अचानक मालिकांमध्ये काम न करण्याचा निर्णय घेतल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत गार्गी या चित्रपटसृष्टीत आल्या. या क्षेत्रातील कामामुळे त्यांना लोकप्रियता देखील मिळाली. ‘तुला पाहते रे’ मालिकेतील त्यांच्या कामाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. आता त्यांनी मालिकाविश्वातून निवृत्ती घेत व्यवसायात नशीब आजमवण्याचा निर्णय घेतला आहे.
गार्गी या मालिकांमध्ये काम न करता आता स्वतःचा व्यवसाय सांभाळणार आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वीच Solitude Holiday नावाने ट्रॅव्हलिंग अ‍ॅप लाँच केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून लोकांना आवडत्या कलाकारांसोबत फिरायला मिळणार आहे.
मालिकाविश्वातून निवृत्ती घेण्याबद्दल बोलताना गार्गी फुले थत्ते यांनी स्वेच्छेनं निवृत्ती घेतल्याचे सांगितले. याबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, 10 वर्षेकुटुंबापासून खूप लांब राहिले आहे. कलाकारांसाठी मालिकेचं शेड्यूल खूप विचित्र झाले आहे. मालिकेमध्ये काम करण्याची जर तुमच्यात आवड असेल तरच तुम्ही मराठी मालिकाविश्वात काम करावे. बाकीच्या दृष्टीने आरोग्य असो अथवा इतर गोष्टी, खूप त्रास होतो.’
दरम्यान, गार्गी यांनी ‘तुला पाहते रे’सह ‘राजा राणीची गं जोडी’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’, ‘इंद्रायणी’, ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या लोकप्रिय मालिकांमध्येही काम केले आहे.- अपर्णा देवकर

Check Also

कलाकारांचा आर्थिक संघर्ष

सिनेअभिनेते राजपाल यादव यांच्या आर्थिक संकटाची चर्चा अलीकडे बराच काळ चालली. न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही अनेकांनी …