लेख-समिक्षण

नव्या वर्षांत नवा धडाका

नव्या वर्षात धमाकेदार चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर साकारलेला ‘छावा’ चित्रपटापासून ते कंगना राणावतचा ‘इमर्जन्सी’, भूत बंगला, लाहोर-1947 सारखे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. या चित्रपटांतून प्रेक्षकांना ऐतिहासिक कलाकृती तसेच अ‍ॅक्शन थ्रिलर, कॉमेडी आणि सिक्वेलही पाहवयास मिळणार आहे. वेगवेगळ्या पार्श्वभूमीवर तयार झालेले चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या रांगेत आहेत. मोठ्या बजेटच्या चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
मावळत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षात पदार्पण झाले आणि या नववर्षाचा आढावा घेण्यास सुरुवात झाली. आर्थिक घडामोडींबरोबरच मनोरंजन विश्वातही नव्या वर्षात बर्‍याच रंजक घडामोडी घडतील. विशेषतः सिनेसृष्टीत अनेक बहुचर्चित, बहुप्रतिक्षित, बिग बजेट चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहेत. त्यांचा हा आढावा…
इमर्जन्सी: खासदार कंगना राणावत यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेला ‘इमर्जन्सी’ हा एक ऐतिहासिक ड्रामा आहे. 1975 मध्ये भारतात लागू केलेल्या आणीबाणीच्या काळातील राजकीय अशांततेची स्थिती पाहवयास मिळणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून बरेच आक्षेप नोंदविले गेले होते. परंतु नव्या वर्षात या चित्रपटाला मुहूर्त लागला आहे. राणावत यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 17 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.
छावा: छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असणारा ‘छावा’ ही एक ऐतिहासिक कलाकृती आहे. या चित्रपटात विक्की कौशल, रश्मिका मंधाना आणि अक्षय खन्ना यांनी भूमिका साकारली आहे. छावा चित्रपट हा छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य दाखविणारा आणि मराठा साम्राज्यातील त्यांच्या योगदानावर प्रकाश टाकणारा आहे. लक्ष्मण उटेकर यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट चौदा फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे.
सनी संस्कारी की तुलसीकुमारी
2024 मध्ये ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती आणि यात वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांची प्रेमकहानी आहे. हा चित्रपट ‘दुल्हनिया’च्या फ्रंचाईजीचा भाग म्हणून सांगितले जात आहे. शशांक खेतान दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात सान्या मल्होत्रा, रोहित सराफ, अक्षय ओबरॉय आणि मनीष पॉल आहेत. हा चित्रपट 18 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.
सिकंदर: ए.आर. मुरुगादोस दिग्दर्शित ‘सिकंदर’ चित्रपटात सलमान खान, रश्मिका मंधाना आणि काजल अग्रवाल यांची भूमिका आहे. हा अ‍ॅक्शनपॅक्ड चित्रपट आहे. 2025 च्या ईदमध्ये तो प्रदर्शित होईल.
हाऊसफुल्ल-5: ‘हाऊसफुल्ल’ फ्रेंचाईजीचा पाचव्या हप्त्यात म्हणजेच ‘हाऊसफुल्ल-5’ मध्ये अक्षयकुमार, अभिषेक बच्चन, संजय दत्त यासारख्या कलाकार झळकणार आहेत. चित्रपटात कॉमेडी आणि मनोरंजनाचा तडका आहे. हा चित्रपट जून महिन्यात झळकेल.
वॉर-2: 2019 च्या ब्लॉकबस्टर ‘वॉर’चा सिक्वेल असलेल्या वॉर-2 चे दिग्दर्शन अयान मुखर्जीने केले आहे. अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटात ऋतिक रोशन आणि ज्युनिअर एनटीआर आहेत. हा चित्रपट ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होईल.
अल्फा: यशराज फिल्म्सने वायआरएफ स्पाय युनिव्हर्समध्ये प्रथमच साकारलल्यां महिलाप्रधान अ‍ॅक्शन थ्रिलर ‘अल्फा’ चित्रपटासाठी 2025 चा नाताळ सण निश्चित केला आहे. यात आलिया भट्ट आणि शर्वरी महिला सुपर एजंटच्या रुपात दिसतील. ते स्पायवर्सची धुरा सांभाळतील.
सितारे जमीन पर: अभिनेता आमिर खानचा ‘सितारे जमीन पर’ हा त्यांच्या 2007 च्या ब्लॉकबस्टर ‘तारे जमीन पर’चा सिक्वेल आहे. सुपरहिट झालेल्या या चित्रपटात त्याचा सहकलाकार दार्शिल सफारी होता. सितारे जमीन पर या वर्षाच्या मध्यात झळकेल.
थामा: दिनेश विजान दिग्दर्शित हॉरर कॉमेडी चित्रपटात आयुष्मान खुराणाने ‘व्हॅम्पायर’ची भूमिका केली आहे. रश्मिका मंधानाचा समावेश असलेला चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
भूत बंगला, वेलकम टू जंगल, देदे प्यार दे-2 : भूत बंगला हा अक्षयकुमारचा चित्रपट असून त्याचे दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केले आहे. ते चौदा वर्षांनंतर एकत्र आले आहेत. हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित होईल. ‘वेलकम टू जंगल’ हा लोकप्रिय ठरलेल्या ’वेलकम’चा सिक्वेल मानला जात आहे. हा चित्रपट याचवर्षी झळकण्याची शक्यता आहे. यात अक्षयकुमार, संजय दत्त, अर्शद वारसी, दिशा पाटणी, रविना टंडन, लारा दत्ता, परेश रावल, श्रेयस तळपदे यासह अन्य कलाकार आहेत. अजय देवगन, तब्बू आणि रकुलप्रित सिंह यांचा रोमॅटिंक कॉमेडी ‘दे दे प्यार दे-2’ हा चौदा नोव्हेंबरला झळकेल.
लाहोर 1947, द दिल्ली फाइल्स, 120 बहादूर, आझाद: राजकुमार संतोषी दिग्दर्शित आणि सनी देवल-प्रिती झिंटा अभिनित ‘लाहोर 1947’ हा देशभक्तीपर चित्रपट आहे. तो ऑगस्टमध्ये प्रदर्शित होणार आहे. फरहान अख्तरचा 120 बहादूर हा चित्रपट 1962 च्या भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर साकारला आहे. या चित्रपटात मेजर शैतान सिंह (पीव्हीसी) आणि चार्ली कंपनी, तेरा कुमाऊं रेजिमेंटच्या जवानांचे कथानक आहे. चित्रपटात भारतीय जवानांचे शौर्य, धाडस आणि बलिदान दाखविले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रजनीश रजी यांनी केले आहे. या चित्रपटात फरहान अख्तरने मेजर शैतान सिंह यांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 21 नोव्हेबरला येईल. विवेक अग्निहोत्रीचा ‘द दिल्ली फाईल्स: द बंगाल चॅप्टर’ हा पंधरा ऑगस्टला प्रदर्शित होईल. त्याचवेळी अभिषेक कपूरचा मारधाडपट ‘आझाद’ हा अमन देवगन आणि राशा थडानी यांचा पहिलाच चित्रपट होय. तो सतरा जानेवारीला प्रदर्शित होईल
बागी 4, रेड टू, छोरी टू: नव्या वर्षाच्या धमाकेदार चित्रपटांत बागी, रेड आणि छोरी याचे सिक्वेल येतील. टायगर श्रॉफ अभिनित ‘बागी-4’ हा सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित होईल. हॉरर ड्रामा ‘छोरी-2’ देखील याच वर्षात येईल. अजय देवगन आणि वाणी कपूर यांचा ‘रेड-2’ हा 21 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.- सोनम परब

Check Also

गुप्तहेरपटांची कालातीत मोहिनी

बदलत्या राजकीय वास्तवासह, युद्धांच्या स्वरूपासह आणि तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीसह गुप्तहेरपटांचे रूप बदलत गेले; मात्र …