नव्या वर्षाच्या प्रारंभीच एक विचित्र बातमी तुमच्या वाचनात आली असेल. एका आंतरराष्ट्रीय विमानाने 2025 मध्ये उड्डाण केलं आणि 2024 मध्ये लँडिंग केलं. ही उलटी गंगा कशी वाहिली? खरं तर ती रोजच वाहते. नववर्षाच्या पहिल्या दिवशी ती उठून दिसली, एवढंच! जगभरात वेगवेगळ्या देशांत वेगवेगळे ‘टाइम झोन’ आहेत, हे तर सर्वांना ठाऊक आहेच. म्हणूनच हाँगकाँगहून एक जानेवारीला निघालेलं विमान जेव्हा लॉस एंजलिस शहरात उतरलं तेव्हा तारीख होती 31 डिसेंबर. जगभरात ‘टाइम झोन’ ठरवले गेले ते ‘इंटरनॅशनल डेटलाइन’ या काल्पनिक रेषेच्या आधारे. पॅसिफिक महासागराच्या मधोमध असणारी ही रेषा पृथ्वीच्या दोन भागांना वेगवेगळ्या तारखांमध्ये विभागणारी आहे. ही रेषा ओलांडून पूर्वेकडून पश्चिमेला आल्यास आदल्या दिवशीची तारीख असते आणि पश्चिमेकडून पूर्वेला आल्यास एक दिवस पुढची तारीख असते. 31 डिसेंबरला उड्डाण करणार्या विमानाची चर्चा होण्याचं कारण असं, की त्यातील प्रवाशांनी नववर्षाचा जल्लोष दोनदा साजरा केला. एकदा हाँगकाँगमध्ये आणि पुन्हा लॉस एंजलिसमध्ये! सरत्या वर्षाला दोनदा निरोप देण्याचं भाग्य या विमानातल्या प्रवाशांना लाभलं. पृथ्वीला दोन भागांत विभागणारी ही काल्पनिक रेषा सरळ नाही. विविध देशांच्या भौगोलिक रचनेनुसार ती वेडीवाकडी जाते. हाँगकाँग ते लॉस एंजलिस विमानाच्या या अनोख्या प्रवासामुळं ‘टाइम ट्रॅव्हल’ ही संकल्पना मात्र पुन्हा चर्चेत आली. ास्तविक ‘टाइम ट्रॅव्हल’ ही काल्पनिक गोष्ट आहे; मात्र भौतिकशास्त्र ती अमान्य मात्र करत नाही. कधीतरी आपल्याला भूतकाळात, भविष्यकाळात प्रवास करता येईल, अशी खात्री शास्त्रज्ञांना वाटते. आपण सर्वजण लांबी, रुंदी आणि उंची अशा त्रिमितीय जगात जगतो. म्हणजेच, जग आपल्याला त्रिमितीय दिसतं. परंतु अशा अनेक मिती किंवा आयाम असू शकतात, या गृहितकावर आधारलेली ही संकल्पना आहे. पृथ्वी ज्या वेगानं स्वतःभोवती आणि सूर्याभोवती फिरते, त्यामुळं आपले दिवस-रात्र, महिने-वर्ष निश्चित होतात. परंतु पृथ्वीपासून दूर ब्रह्मांडात इतरत्र काळाचं हेच गणित कायम राहत नाही. आयाम बदलला, की काळाचं आणि वेगाचं गणित बदलणार. या आयामांचा स्पर्श आपल्याला झाला, तर आपण भूतकाळात किंवा भविष्यकाळात जाऊ शकतो, असा विचार मांडला जातो. काहींच्या मते तर काळ ही सदैव वाहती राहणारी गोष्ट असल्यामुळं वर्तमानकाळ अस्तित्वातच नसतो. आलेला क्षण लगेच भूतकाळात जमा होतो. म्हणजे केवळ भूतकाळ आणि भविष्यकाळच शाश्वत आहेत, असा हा विचार. या संकल्पनेवर आधारित अनेक ‘सायन्स फिक्शन’ लिहिली गेली आणि चित्रपटांमधून पडद्यावरही झळकली.
‘टाइम ट्रॅव्हल’ ही संकल्पना ‘द टाइम मशीन’ या कादंबरीच्या माध्यमातून 1895 मध्ये प्रथम चर्चेत आली. एच. जी. वेल्स हे या कादंबरीचे लेखक. अर्थात, त्यापूर्वीही अशा अनेक कथा लिहिल्या गेल्या. झोपी गेलेल्या माणसाला वेगळ्याच काळात जाग येते, असं चित्रण बर्याच कथांमधून केलं गेलं. आजतरी ही ‘फॅण्टसी’ आहे. परंतु भविष्यात असं होणारच नाही, असं भौतिकशास्त्र मानत नाही. हाँगकाँग-लॉस एंजलिस विमानाच्या उड्डाणानिमित्तानं चर्चेत आलेला ‘टाइम ट्रॅव्हल’ कधीतरी आपल्याला करता येईल, उलटसुलट प्रवास शक्य होईल, अशी आशा करूया.
Check Also
आजचा दिलासा, उद्याचे ओझे?
रुपयावरील दबाव कमी करण्यासाठी परदेशातून डॉलर देशात आणणे हा तातडीचा उपाय असू शकतो; परंतु त्यासाठी …
पांचजन्य वृत्तपत्र