लेख-समिक्षण

घातक खोडसाळपणाचे आव्हान

एकीकडे देशातील विमानप्रवाशांची संख्या वाढत असताना दुसरीकडे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा सातत्याने ऐरणीवर येत आहे. गेल्या काही दिवसांत बॉम्बच्या धमक्यांमुळे इमर्जन्सी लँडिंग करण्याचे प्रकार घडले. सोशल मीडिया किंवा ईमेलच्या माध्यमातून फसव्या धमक्या दिल्या जात असताना त्यांना चाप कसा बसवावा, हा खरा प्रश्न आहे. बनावट संदेश पकडण्यासाठी आपल्याकडे तंत्रज्ञान उपलब्ध आहे, तरीही सुरक्षा संस्था खोट्या धमक्या देणार्‍यांचा शोध लावू शकत नाही. यामागचे कारण पाहिले तर असा खोडसाळपणा जगाच्या कानाकोपर्‍यात बसून कोठूनही करता येऊ शकतो. समाजकंटक हँडलर हे सोशल मीडियावर अकाऊंट तयार करण्यासाठी व्हर्च्युअली प्रायव्हेट नेटवर्क किंवा डार्क वेब ब्राउजरचा वापर करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. म्हणून त्यांचा आयपी अ‍ॅड्रेसचा शोध लावताना देखील पोलिसांना बराच वेळ लागतो.
वाई प्रवास सुरू करण्यापूर्वी बॉम्बच्या धमकीचा मेल किंवा फोन येणे आणि कालांतराने त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे आढळून येणे या गोष्टी सातत्याने घडत आहेत. काही दिवसांपूर्वी लखनौहून पुण्याला येणार्‍या विमानात बॉम्ब ठेवल्याची ‘एक्स’वरील पोस्ट ही दिशाभूल करणारी असल्याचे निष्पन्न झालेले असताना रविवारी पुणे-जोधपूर इंडिगो विमानात बॉम्ब असल्याचा मेल धडकला. मात्र तपासांती तो मेल गोंधळ निर्माण करणारा असल्याचे स्पष्ट झाले. एकुणातच अशा फसव्या आणि धास्ती निर्माण करणार्‍या मेलमुळे हवाई प्रवाशांत अस्वस्थता निर्माण झाली आहे.
अफवांना कोणीही वाली नसतो आणि त्याला हजार पाय असतात. त्याचवेळी सत्य मात्र शाश्वत असते, कारण त्याला दोनच पाय असतात. अफवांचे पेव तर काही क्षणात वार्‍यासारखे पसरते. दिशाभूल करणार्‍या अफवा चोहुबाजूंनी फिरून घरावर धडकलेल्या असतात. अफवा पसरण्यामागचे कारण समाजिक वृत्ती. आपला समाज हा चांगल्या गोष्टीपेक्षा वाईट गोष्टींना अधिक थारा देत असतो आणि म्हणून अफवांचा बाजार नेहमीच फुललेला असतो. फार जुनी गोष्ट नाही तर दिल्ली, पुण्यासारख्या अनेक महानगरांत एकानंतर एक विमानात बॉम्ब ठेवल्याचा धमकीवजा संदेश देत गोंधळ निर्माण करणार्‍या घटना घडत असून काही ठिकाणी धमक्यांमागे शाळकरी मुले असल्याचे निदर्शनास आले आहे. समाजकंटक एखाद्या भागाबाबत समाजाची संवेदनशील मानसिकता पाहून तेथे बॉम्ब असल्याची खोटीनाटी अफवा पसरवतात आणि गोंधळ निर्माण करतात. परिणामी अशा स्थितीत अफवा वेगाने व्हायरल होते. शाळेत जाणार्‍या पाल्यांच्या सुरक्षेवरून पाल्य नेहमीच सजग असतात त्यामुळे शाळेत बॉम्ब ठेवल्याची सूचना मिळताच ते घरातून शाळेकडे धाव घेतात. सध्या विमानातील प्रवासी धास्तावले आहेत. कारण विमानात एकानंतर एक बॉम्ब ठेवल्याच्या धमक्या मिळत आहेत. या धमक्यांमुळे विमान कंपन्या त्रस्त झाल्या आहेत तसेच प्रवासी देखील घाबरले आहेत.
कोणत्याही विमानाला आपत्कालिन स्थितीत लँडिंग करावे लागत आहे तर कधी कधी विमानाचा मार्ग बदलावा लागत आहे तर काहीवेळा वेगवेगळ्या विमानतळावर उतरावे लागत आहे. त्यांचा तपास केला असता त्यात कोणतेही संशयास्पद असल्याचे निदर्शनास येत नाही. पण तोपर्यंत विमानतळावर पळापळ झालेली असते आणि प्रवाशांचा वेळही वाया गेलेला असतो. शिवाय एअरलाइन्सला इच्छित स्थळी पोचण्यासाठी देखील विलंब होतो. विमान प्रवासी नाही तर रेल्वेलाही अशा प्रकारच्या धमक्यांनी ग्रासले आहे. रेल्वेमार्गावरही कधी कधी गॅस सिलिंडर, लोखंडी गार्डर यासारखी सामग्री आढळून येते आणि यामुळे अपघात हेाऊ शकतो. सणासुदीच्या काळात तर प्रत्येक जण घरी सुरक्षित जावू इच्छित असते. परंतु अशा प्रकारच्या घटनांनी आणि वातावरणामुळे असुरिक्षतता निर्माण झाली आहे. विमान प्रवास तर सर्वात सुरक्षित अणि सुलभ प्रवास मानला जातो. परंतु फसव्या संदेशामुळे आणि धमक्यांमुळे हवेत देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या धमक्या सोशल मीडियावरून व्हायरल केल्या जात आहेत. अशा प्रकारच्या धमक्यांबद्दल थोडाही हलगर्जीपणा दाखविणे चुकीचे राहू शकते. म्हणून विमान कंपन्या कोणत्याच धमक्यांकडे कानाडोळा न करता तपासणीबाबत आग्रही असते.
सोशल मीडिया किंवा ईमेलच्या माध्यमातून फसव्या धमक्या दिल्या जात असताना त्यांना चाप कसा बसवावा, हा खरा प्रश्न आहे. बनावट संदेश पकडण्यासाठी आपल्याकडे तंत्रज्ञान उपलब्ध आहे, तरीही सुरक्षा संस्था खोट्या धमक्या देणार्‍यांचा शोध लावू शकत नाही. यामागचे कारण पाहिले तर असा खोडसाळपणा जगाच्या कानाकोपर्‍यात बसून कोठूनही करता येऊ शकतो. समाजकंटक हँडलर हे सोशल मीडियावर अकाऊंट तयार करण्यासाठी व्हर्च्युअली प्रायव्हेट नेटवर्क किंवा डार्क वेब ब्राउजरचा वापर करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. म्हणून त्यांचा आयपी अ‍ॅड्रेसचा शोध लावताना देखील पोलिसांना बराच वेळ लागतो. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खोट्या प्रोफाईलचा मारा केला जातो. याप्रकारच्या धमक्यांबाबत आता सरकारने कडक धोरण अंगिकारले आहे. गृहमंत्रालयाने विमान कंपन्यांकडून संपूर्ण अहवाल मागितला आहे.
समाजकंटकांकडून प्रवाशांना हानी न पोचविणारे परंतु गमंत वाटणारे कृत्य केले जात असले तरी त्यामुळे विमान कंपन्यांवर आर्थिक बोजा वाढत आहे. विमा कंपन्या अगोदरच अडचणीत सापडलेल्या आहेत. तेलाच्या किंमती वाढत असताना त्याचा ताण प्रवाशांवर येऊ नये आणि कर्मचार्‍यांनाही वेतन देताना अडथळा येऊ नये यासाठी कसरत करावी लागत असताना सुविधांवरही बराच खर्च उचलावा लागत आहे. अशा धमक्यांमुळे कंपन्यांना उड्डाणे वळविणे, सुरक्षेची तपासणी, घिरट्या घालण्यासाठी अतिरिक्त इंधन आणि अडकलेल्या प्रवाशांसाठी हॉटेलमध्ये मुक्कामाची सोय करणे यासारख्या अकस्मिक खर्चांना सामोरे जावे लागत आहे. या बनावट धमक्यांच्या तपासात प्रथमदृष्टया कोणतेही कारस्थान असल्याचे दिसून येत नाही. त्यापैकी बहुतांश कॉल लहान मुले आणि समाजकंटकांनी केल्याचे आढळून आले आहे.
अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी नागरी उड्डयन मंत्रालयाने कडक नियमांची योजना आखली आहे. मंत्रालयाच्या सूत्रानुसार, विमानाच्या सुरक्षेसंदर्भात सुरक्षा यंत्रणांसह विविध भागिदारांच्या बैठकांच्या अनेक चर्चेच्या फेर्‍या झाल्या. मंत्रालयाकडून बॉम्बच्या खोट्या धमक्यांना रोखण्यासाठी कडक नियमांवली तयार केली जात आहे. त्यात आरोपींना ‘नो फ्लाय’ यादीत टाकणे याचा समावेश आहे. यानुसार कोणत्याही दोषी व्यक्तीला विमानातून प्रवास करण्याची मूभा दिली जाणार नाही. ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीशी (बीसीएएस) संबंधित नियमांंसह सध्याच्या नियमांत दुरुस्ती करण्याचा देखील विचार केला जात आहे. या आधारावर दोषींना कडक शिक्षा देता येणे शक्य आहे. विमान प्रवासावरचा लोकांचा विश्वास ढळणार नाही, यासाठी आवश्यक पावले टाकण्याची गरज आहे. दहशत संपविण्यासाठी परिणामकारक तंत्र विकसित करणे देखील महत्त्वाचे आहे. शाळेत देखील यासंदर्भात जनजागृती अभियान राबवायला हवे, जेणेकरून मुले अशा प्रकारचे कृत्य करणार नाहीत. काही मुले आपल्या मित्रांना अडकविण्यासाठी त्यांच्या नावावर हँडल तयार करून विमान कंपन्यांना धमकी देत असल्याचे आढळून आले आहे. अशा गैरकृत्यांना पायबंद घालण्याची आवश्यकता आहे. सरकारने विमानांत एअर मार्शलची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. अलिकडच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अनेक संशयितांची ओळख पटविली असून त्यांना वेळीच वेसण घालणे आवश्यक आहे.-कॅप्टन नीलेश गायकवाड

Check Also

तारक्कासह 11 जहाल नक्षलवादी शरण

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा बसला. मागील 38 वर्षापासून नक्षल चळवळीत सक्रिय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *