लेख-समिक्षण

फडणवीस व उद्धव यांची पुन्हा युती?

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागणार असताना भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. स्वत: फडणवीस रात्री 12 वाजता गाडी चालवत ’मातोश्री’वर जाऊन त्यांनी ठाकरेंशी दोन तास चर्चा केल्याचा दावा करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी ’एक्स’वर व्हिडिओ शेअर करत यासंबंधी दावा केला आहे. यासंबंधी ठाकरे गट किंवा भाजपकडून कुठलीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
’एक्स’वर व्हिडिओ शेअर करत सिद्धार्थ मोकळे म्हणाले की, शिवसेना खासदार संजय राऊत हे 25 जुलै रोजी रात्री दोन वाजता 7 डी मोतीलाल मार्ग या ठिकाणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना भेटले. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः गाडी चालवत एकटेच मातोश्री बंगला येथे गेले, दोन तास त्यांची बैठक झाली आहे. दुसर्‍या दिवशी 6 ऑगस्टला उद्धव ठाकरे दिल्लीला गेले. जाताना सोबत कोण-कोण होते, तिथे जाऊन त्यांनी कोणाकोणाच्या भेटी घेतल्या आणि काय-काय ठरले, हे त्यांनी जनतेला सांगावे, असे आवाहन मोकळे यांनी केले. वंचित बहुजन आघाडीला मिळालेली माहिती आम्ही जनतेसमोर ठेवत आहोत. आरक्षणवादी मतदारांना भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष हे आरक्षणविरोधी असल्याचे पक्कं माहिती आहे. मात्र याच आरक्षणवादी मतदारांनी उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांना मतदान केले आहे. महाराष्ट्रातील गेल्या पाच वर्षातील घडामोडी पाहिल्या, तर काही उलटसुलट राजकीय घडामोडी घडल्या, तर आरक्षणवादी मतदारांची फसवणूक होऊ नये, यासाठी ही माहिती जनतेसमोर ठेवत असल्याचे मोकळे यांनी सांगितले.
दुसरीकडे भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीच्या 100 उमेदवारांची पहिली यादी तयार करण्यात आली आहे. सह्याद्री अतिथिगृहावर नुकतीच भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत जागावाटपाचे सूत्र अंतिम झाल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत 10 ऑक्टोबरला नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन घोषणा होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीची पहिली उमेदवार यादी विजयादशमीच्या मुहूर्तावर जाहीर होण्याचे संकेत मिळत आहेत. मात्र महायुती यात आघाडी घेण्याची शक्यता आहे. पितृपक्षाच्या काळात उमेदवारांची घोषणा, जागावाटप जाहीर करणे या गोष्टींना ब्रेक लागला होता. मात्र घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी महायुती उमेदवार यादीचा मुहूर्त साधण्यात येत आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर महायुतीच्या 100 उमेदवारांची पहिली यादी निश्चित झाल्याची शक्यता आहे. यामध्ये भाजपाचे 50, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 36, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 14 उमेदवारांची नावे आहेत. पहिल्या यादीत बहुतांश विद्यमान आमदारांचा समावेश राहील. याशिवाय स्टार प्रचारकांच्या नावांवर देखील बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी आधीपासूनच सुरु झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांचे नेते तयारीला लागले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आहेत. इच्छुक उमेदवारांनीही कंबर कसली असून राजकीय नेत्यांच्या ’उड्या’ही सुरु झाल्या आहेत. दरम्यान, मागील काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये लागलेला निर्णयांचा धडाका पाहता विधानसभा निवडणुकांची घोषणा आठवडाभरात होण्याच्या शक्यतेला बळ मिळत आहे. 10 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्राबरोबरच झारखंड राज्याच्या विधानसभा निवडणुकांची घोषणाही होऊ शकते. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी दावा केला की, शिवसेना खासदार संजय राऊत हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना भेटले. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः गाडी चालवत एकटेच मातोश्री बंगला येथे गेले, दोन तास त्यांची बैठक झाली.

Check Also

भाजप, संघाची माफी न मागण्याचा निर्धार

प्रचंड गदारोळानंतर बुधवारी लोकसभेत ‌‘सार्वजनिक परीक्षा (अनुचित साधनांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक, 2026‌’ मंजूर करण्यात आले. …